Sunday, December 1, 2013

फेस्टिव्हलवर प्रभाव दिग्दर्शिकांचा!

अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आणि तरुण तेजपालची बातमी आगीसारखी सगळीकडे पसरली. इफ्फीच्या मिडिया सेंटरमध्ये महोत्सवासाठी देशभरातून आलेल्या पत्रकारांना आयती बातमी मिळाली. एकीकडे तरुण तेजपाल प्रकरणातील ताज्या घडामोडी कानावर पडत होत्या तर दुसरीकडे इफ्फीविविध सिनेमांमधून अत्याचार- बलात्कार सारख्या घटनांवर आवाज उठवणाऱ्या नायिका दिसत होत्या. एकीकडे भासमान जगातील चित्र तर दुसरीकडे जळजळीत वास्तव विचार करायला भाग पडत होतं. जणूकाही आजूबाजूला घटणाऱ्या घटनांचेच पडसाद पडद्यावर बघायला मिळत होते. जे फक्त सिनेमा बघायला आणि त्याचा आस्वाद घ्यायला आले होते ते आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करू शकत होते. एकूण काय तर इफ्फीचे सुरुवातीचे दिवस तरुण तेजपालने गाजवले. दर वर्षी महोत्सवाचा एक वेगळा चेहरा त्यात दाखवल्या जाणारया चित्रपटांमधून दिसून येत असतो. यावर्षी महोत्सवाचा कॅटलॉग हातात पडताच हा चेहरा स्पष्टपणे स्पष्टपणे दिसून आला. महायुद्धाची पार्श्वभूमी, महिला केंद्रित चित्रपट यावर आधारित चित्रपट यावर्षीच्या महोत्सवाचा चेहरा होते. ७४ देशांमधले दाखवण्यात आलेल्या ३७४ चित्रपटांमध्ये बहुसंख्य चित्रपट महायुद्धाची पार्श्वभूमी आणि महिला केंद्रित विषय हाताळल्याचे ठळकपणे दिसत होते. 'जागतिक सत्य' म्हणावे असे हे सूत्र वेगवेगळ्या देशांमधील, भाषांमधील चित्रपटांमधून बघायला मिळाले. युद्ध -महायुद्धाची पार्श्वभूमी आणि नाते संबंध जर्मनी - ज्यू संबंध, छोट्या छोट्या देशांना पोहोचलेली झळ, इराक - इराण-अमेरिका संबंधाची पार्श्वभूमी, युद्धजन्य परिस्थिती आणि अशा परिस्थितीत जगणारी माणसं, लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार यांना सामोरं जाताना जगण्याची धडपड करणाऱ्या महिला आणि मुलं या साऱ्यांचे चित्रण 'इन हायडिंग', 'युरोपा युरोपा', 'लास्ट ऑफ अनजस्ट', 'द जर्मन डॉक्टर', 'अ पीस इन हेवन', 'विव्हा बेलारूस' या चित्रपटांमधून बघायला मिळाले. जर्मनीच्या अत्याचारापासून स्वतःला बचावू न शकलेला पोलंड सारखा छोटासा देश. या देशातून दोन चित्रपटांना प्रवेश मिळाला आणि दोन्ही चित्रपट महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित होते. दिग्दर्शक यान किडावा ब्लोन्स्की यांनी ' इन हायडिंग' या सिनेमात नझी अत्याचार, ज्यू नां करावे लागलेले पलायन त्यातून भेटलेली नव नवीन माणसं, तयार झालेली नवीन नाती याचं अप्रतिम चित्रण या सिनेमा मध्ये केले आहे. युद्धाची पार्श्वभूमी असताना मानवी नाते संबंध रंगवण्याची कसब या दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने सांभाळली आहे. 'विव्हा बेलारूस' हा ही पोलंडचा युद्धाचीच पार्श्वभूमी असलेला सिनेमा. रशियन सैनिकांनी सोव्हिएत मधील छोट्या छोट्या देशांवर केले हुकुमशाही पद्धतीचे अत्याचार, त्याचा प्रतिकार करणारे कलाकार - लेखक - पत्रकार मंडळी आणि त्यांना अज्ञातवासाची भोगावी लागलेली शिक्षा, त्यांच्या अभिव्यक्तीवर आलेली गदा, सक्तीने लष्करात भरती व्हावे लागणे या सगळ्या गोष्टी भारतातील आणीबाणीच्या काळाची आठवण करून देतात. मार्गरेटा व्हान ट्रोटा या दिग्दर्शिकेने '' हानाह अरेंट' या तिच्या चित्रपटामधून दुसरे महायुद्ध, नाझींच्या कारवाया याचे वेगळेपाने चित्रण केले आहे. एक शिक्षिका जी पुढे पत्रकाराचा पेशा स्वीकारून नाझींच्या कारवायांवर नजर ठेवत असते. त्यांच्या छावण्यामध्ये जाऊन त्यांची सगळी रहस्य जगासमोर आणते. खूप नाट्यमयरित्या चित्रपटाची कथा पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शिका यशस्वी झाली आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका मार्गरेटा व्हान ट्रोटा हि 'फेमिनीस्ट फ़्लिममेकर' म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रपटातील नायिका हि सामन्यातून असामन्य ठरून जाते. ते या चित्रपटातही जाणवते. हानाह सारखी सशक्त नायिका या चित्रपटात उभी करून युद्धात महिलांचा सहभाग वेगवेगळ्या पातळीवर कसा होता हे देखील दाखवून दिले आहे. महिला प्रश्नांची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न इफ्फीमध्ये खूप सारे चित्रपट महिला प्रश्नांवर आधारित होते. विशेषतः इराण आणि अफगणीस्तान मधील चित्रपट हे तिथल्या महिलांची स्थिती मांडणारे होते. अफगणीस्तानचे दिग्दर्शक अतिक रहिमी यांच्या 'द पेशन्स स्टोन', इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह चा ' हुश्श… गर्ल्स डोंट स्र्किम ' आणि मोरोक्को -फ्रांस मधील दिग्दर्शक मोहमद अहेद बेन्सुदा यांचा 'बिहाइंड क्लोज डोअर', अफगणीस्तानमधील सेदिक अबेदी यांचा ' अ मन डिझायर फॉर अ फिफ्थ वाईफ' या सिनेमांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अफगणीस्तानचे दिग्दर्शक अतिक रहिमी यांच्या 'द पेशन्स स्टोन' या चित्रपटातील नायिका तालिबानी सैनिकांच्या कारवायांमध्ये कोमात गेलेला तिचा नवरा, घरातच त्याच्यावर करावे लागणारे उपचार यासारया परिस्थितीत त्याच्या जवळ व्यक्त होण्याची तिला मिळालेली संधी याचे अतिशय सुंदर चित्रण दिग्दर्शक रहिमी यांनी केले आहे. नवरयाशी कधीच मोकळेपणे वागायला मिळालेलं नसतं. नवऱ्याचा हवा तसा सहवास मिळालेला नसतो. त्याला कायम घाबरून राहण्यातच आयुष्य जात असतं अशा वेळेस तिचा होणारा कोंडमारा, मन मोकळं करण्याची तळमळ. याचे दर्शन या चित्रपटात बघायला मिळते. चित्रपटाची कथा खूप वेगळी ठरते. या कथेत दगडाला महत्व दिले आहे. आपल्याला आवडलेल्या एखाद्या मौल्यवान दगडाकडे तू आपलं मन मोकळं कर असा सल्ला देणारी नायिकेची आत्या आणि आत्याच्या सांगण्यावरून कोमात असलेल्या नवरारुपी ' दगडा' ला आयुष्यातील सर्व गुपितं सांगणारी नायिका या साऱ्याची सुरेख मांडणी दिग्दर्शकाने या चित्रपटात केली आहे आणि याला गोल्डशिफ्ट फरहानी या अभिनेत्रीच्या उत्तम अभिनयाची जोड मिळाल्यामुळे चित्रपत एकदम जमून गेलाय. इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह चा ' हुश्श… गर्ल्स डोंट स्र्किम ' आणि मोरोक्को -फ्रांस मधील दिग्दर्शक मोहमद अहेद बेन्सुदा यांचा 'बिहाइंड क्लोज डोअर' या दोन्ही चित्रपटांमधून महिलांचे होणारे लैंगिक शोषण, अत्याचार दाखवण्यात आले आहे. महिलांच्या समस्यांमध्ये सर्वत्र समानता आहे जे चित्रण भारतातील सिनेमांमध्ये बघयला मिळते तेच इराण, अफगणीस्तान, फ्रांस, जपान अशा जगातील नकाशावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या देशांमध्ये बघायला मिळते इफ्फीवर दिग्दर्शिकांचा प्रभाव उक्रेनच्या व्हिक्टोरिया ट्रोफिमेंको, इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह, भारतातील वीणा बक्षी, इटलीमधील इमा दांते, कानडाच्या लुईस अर्चमबोउल्त, फ्रांसच्या निकोल ग्रासिया, नेदरलंडच्या नानुक लिओपोल्ड, सर्बियाच्या जेलेना बाजिक जोसीस, फ्रांसच्या इव्हा पेर्वोलोविक, बेल्जियमच्या डेल्पीन लेहेरीसी, कानाडाच्या चोल रोबिचाउद, इनग्रिड विनेगर, फ्रांसच्या काटेल क़ुइलिवेर, अर्जेन्टिनाच्या लूइसा प्यूएझो, रशियाच्या अलेक्सझाड्रा स्ट्रेलयाना, चिलीच्या मार्सेला सैद, फिलिपिन्सच्या हानाह अस्पिया, जर्मनीच्या अना झोहरा बेर्राचेद, इंडोनेशियाच्या मौली सूर्या, जर्मनीच्या मार्गरेटा व्हान ट्रोटा, डेन्मार्कच्या सुसान बीर, फ्रांसच्या क्लाअर डेनिस, पोलंडच्या मल्गोर्झाता स्झूमोवस्का, फ्रान्सच्या अक्षेल रोपेर्त, मेक्सिकोच्या क्लौडिया सांते लूस, ग्रीसच्या ओल्गा मलेआ, पेंनी पनियाटोपौलू,एलिना पसकौ, मारिया डोउझा, भारतातील रुथ झाबवाला, सुमित्रा भावे या बत्तीस दिग्दर्शिकांच्या चित्रपटांचा समावेश या महोत्सवात होता. फक्त महिलांचेच विषय न हाताळता सामाजिक, राजकीय विषयांवर आधारित चित्रपट या दिग्दर्शिकांनी हाताळलेले आहेत. निर्मात्या म्हणूनही असंख्य महिलांची नावे या महोत्सवाच्या निमित्ताने पुढे आली. काही चित्रपटांनी निराशा केली इफ्फीमध्ये असेही काही चित्रपट होते कि त्यांची निवड कोणत्या आधारावर केली गेली अशी शंका अनेकांच्या मनात येउन गेली . ना चांगल्या कथेचा बेस,सुमार दिग्दर्शन आणिक गोष्टींच्या उणीवा यामुळे चित्रपट रसिकांना आवडला नाही. चित्रपट सुरु असतानाच अनेकजण उठून जायचे. निवड समितीवर तोंडसुख घेणारेही अनेकजण इथे भेटले. भरगच्च कार्यक्रम, चांगले चित्रपटांचे पुन्हा प्रक्षेपण न होणे, तिकीट पद्धत, हॉल भरला म्हणून आत न सोडणे, व्यवस्थापनात ढिसाळ पणा या साऱ्यामुळेहि अनेकजण त्रस्त झाले. सर्वात जास्त त्रास झाला तो तिकीट काढण्याच्या व्यवस्थेचा आणि तिकीट नाही म्हणून लावाव्या लागलेल्या भल्या मोठ्या रांगेचा. तिकीट पद्धत कशासाठी? हा प्रश दर वर्षी उभा राहतो पण त्यावर उपाय काही निघत नाही. गर्दी खूप पण दर्दी कमी जगभरातून- देशभरातून वेगवेगळ्या राज्यांतून आलेले चित्रपट समीक्षक, आस्वादक यांच्याबरोबरीने सिनेमा स्कूलमधील असंख्य विद्यार्थी इफ्फीसाठी आले होते. जवळजवळ सर्व चित्रपट ‘हाउसफूल’ व्हायचे इतकी गर्दी व्हायची. पण सिनेमा सुरू झाल्यानंतर केवळ १० ते १५ मिनिटे बसून लगेच उठून जाणारे अनेकजण बघायला मिळाले. ज्या सिनेमामध्ये सेक्सने भरलेली भरपूर दृश्य आहेत अशा सिनेमांना जास्त गर्दी हे समीकरणच बनून गेले होते. सिनेमा स्कूलचे विद्यार्थी नेमकं सिनेमातील काय बघायला आले होते असा प्रश्‍न पडत होता. चांगल्या सिनेमांकडे पाठ आणि भरपूर ‘हॉट सीन’ असलेल्या सिनेमांना गर्दी अशी जाणवणारी परिस्थिती यावर्षीच्या महोत्सवात होती.

Sunday, August 11, 2013

सत्तेतील सहभागाचे आशादायक चित्र

त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमुळे एक महत्वाचा बदल झाला. महिलांना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिका - महानगरपालिका यामध्ये ३३ % आरक्षण मिळाल्यामुळे त्या सत्तेत प्रत्यक्ष सहभागी झाल्या. हा निर्णय सहजासहजी पचवणे शक्य नव्हते. विशेषतः राजकारणातील पुरुषांकडून या निर्णयाबाबत उलट सुलट बोललं जाऊ लागलं. सत्तेत नव्याने सहभागी होणाऱ्या महिलांना सतत या न त्या कारणाने 'टार्गेट' केलं जाऊ लागलं. १९९३ साली समंत झालेल्या या घटना दुरुस्तीला यावर्षी बरोबर वीस वर्ष पूर्ण झाली. हा वीस वर्षाचा काळ खूप महत्वाचा होता. या काळात अनेक चढ उतार महिलांना अनुभवायला मिळाले. पडल्या शिवाय पोहायला येत नाही असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. ३३% आरक्षण मिळालं नसतं तर आज राजकारणात जेवढ्या महिलांचा प्रत्यक्ष सहभाग आहे तो असला असता का? असा प्रश्न पडतो. सुरुवातीचा खडतर काळ - आरक्षण मिळालं पण महिला पुढे यायला तयार नव्हत्या. राजकारण हे आपलं काम नाही हि मानसिकता जोपासणाऱ्या महिलांना त्या कोषातून बाहेर काढण्याचं मोठ्ठ काम स्वयंसेवी संस्थानी केलं. कुटुंबातून न मिळणारे प्रोत्साहन, गावातील प्रस्थापित राजकारण्यांची वाटणारी भीती, आपण हे काम करू शकणार नाही याचा स्वतःच्याच मनात असेलला न्यूनगंड या साऱ्यांमुळे सुरुवातीच्या काळात आरक्षण मिळून देखील महिला राजकारणात सहभागी होण्यास घाबरत होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी प्रस्थापित राजकारणी कुटुंबातील महिलेलाच यात पुढे करण्यात आले. तिच्यासाठी देखील हे सगळं नवीनच होतं. आरक्षण मिळण्यापूर्वी महिलांचे प्रबोधन होणे गरजेचे होते ही बाब देखील शासकीय पातळीवर याच काळात लक्षात आली आणि शासकीय यंत्रणेतून महिलांना प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी राहिली शिवाय या कामासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून सातारा, सांगली आणि सोलापूर या भागातील ग्रामपंचायत - जिल्हापरिषद मधील महिला सदस्यांसाठी त्या त्या भागात प्रशिक्षण कार्यक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केला होता. यात एक सत्र त्यांना कामात येणाऱ्या अडचणींच होतं. स्वतः कलेक्टर, जिल्हापरिषद अध्यक्ष या सत्रात उपस्थित राहून महिला सदस्यांच्या अडचणी जाणून घेत होते. सुरुवातीला वाटलं की कदाचित महिला काही बोलणारच नाहीत, त्यांना बोलतं करावं लागेल. पण महिला फक्त बोलल्याच नाही तर खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी समोर मांडल्या. पुरुष सदस्य आणि महिला सदस्य यांच्यात केला जाणारा भेदभाव. बी. डी. ओ कडून मिळणारे असहकार्य, अनेक महत्वाच्या समस्या वारंवार मांडून देखील त्याची दखल न घेणं. ज्या विकास कामांसाठी निधी मागितला असतो त्यासाठी न देता भलत्याच वेगळ्या कामासाठी निधी मिळणं अशा अनेक समस्या या महिला सांगत होत्या. या समस्यांच्या माध्यमातून या सर्व महिलांची क्रियाशीलता जाणून आली. राजकारणातील त्यांचा सहभाग हा केवळ नावापुरता राहिलेला नाही हे दिसून येत होतं. विकास प्रकल्पांना अधिक प्राधान्य - मध्यंतरी एका राष्ट्रीय संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचं सर्व्हेक्षण केलं होतं. निवडून आलेल्या महिलांनी आपापल्या भागात कशा प्रकारचे काम केलं आहे? त्यांचा भर प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या कामावर आहे? आणि केलेल्या कामामुळे कोणता मोठा बदल घडून आला आहे? पुरुष सदस्यांच्या तुलनेत महिला सदस्यांचे काम कसे आहे? साधारणपणे या मुद्द्यांचा शोध घेणे हा सर्व्हे करण्यामागचा हेतू. भारतातील काही प्रमुख राज्यांमध्ये आणि त्यातून काही निवडक जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे घेण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ६७% महिला प्रतिनिधींचे काम हे पुरुष सदस्यांपेक्षा अधिक चांगले असल्याचे, ६२% महिला प्रतिनिधी या दृश्यात्मक विकासाला अधिक प्राधान्य देणाऱ्या आणि ५८% महिला प्रतिनिधींनी आपापल्या भागात प्रत्यक्ष विकास कामे केल्याचे या सर्व्हेमधून पुढे आले. मगरसांगवी हे सोलापूर जिल्ह्यातील छोटंसं गाव. या गावात अनेक वर्षांपासून पारधी कुटुंब राहतात. प्रत्यक्ष गावात म्हणता येणार नाही गावकुसाच्या बाहेर या पारधी कुटुंबांची पालं आज हि आहेत. जेव्हा पारधी पुनर्वसन प्रकल्प सुरु झाला तेव्हा या कुटुंबांसाठी रेशनकार्ड - जातीचा मिळावा यासाठी खूप झगडावं लागलं हि गोष्ट आहे १९९२-९३ मधील आणि बरोबर दहा वर्षानंतर याच पारधी कुटुंबातील तोळाबाई शिंदे हि महिला मगरसांगवी ग्रामपंचायतीची सरपंच झाली. शाळेत न गेलेली तोळाबाई निवडून आल्यावर ती हे सगळं काम कसं करू शकणार अशी अनेकांनी शंका काढली. परंतु सरपंच पद भटक्या विमुक्त जमातींसाठी आरक्षित असल्यामुळे तोळाबाईचीच निवड झाली. मुलगी शिकलेली असल्यामुळे मुलीला हाताशी धरून तिने अनेक गोष्टी शिकून घेतल्या आणि चांगलं काम करून दाखवलं. गावातल्या पायाभूत गरजांना अधिक प्राधान्य दिलं. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असल्यामुळे त्यासाठी पाण्याची टाकी बांधण्याचं काम सूरु केलं. टीका करणारे आजूबाजूला होतेच पण तोळाबाईने आपल्या कामातून त्यांचं तोंड बंद केलं. मगरसांगवीची सरपंच होण्याची संधी तोळाबाईंना दोन वेळा मिळाली. रस्त्यापेक्षा पिण्याच्या पाण्याच्या सोयीला महत्व, गावातील देऊळ बांधून देण्यापेक्षा शाळेची इमारत बांधणे महत्वाचे, बाग-बगीचावर खर्च करण्यापेक्षा आरोग्याबाबतच्या सोयी करण्यावर महिला प्रतिनिधी अधिक प्राधान्य देतात असे दिसून आले आहे. याशिवाय ग्रामसभेत हजर राहून महत्वाचे मुद्दे मांडण्यामध्ये महिलां प्रतिनिधी अग्रेसर आहेत. राजकारणात एक वेगळा पायंडा घालण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. सुरुवातीच्या काळात निवडणूक लढवायला तयार नसलेल्या महिला आज स्वतःहून निवडणुकीला उभ्या राहतात. निवडणुकीचा जाहीरनामा तयार करतात. जाहीरनाम्यात स्थानिक प्रश्नांना हात घालतात. वीस वर्षानंतर राजकारणातील महिलांच्या सहभागाचा आढावा घेत असताना निश्चितच काही चांगले बदल झालेले या उदाहरणांवरून दिसून येतात. तरीही अजून त्यांना बराच पुढचा पल्ला गाठायचाय. मनस्विनी प्रभुणे manswini-prabhune.blogspot.com

Sunday, July 28, 2013

मैत्रीचे ऋणानुबंध..

कधी कोणाशी कसे ऋणानुबंध जुळतील हे सांगता येत नाही. माधवी देसाई यांच्याशी असलेले मैत्रीचे ऋणानुबंध असेच काहीसे खूप अनपेक्षितपणे जुळले. खरंतर त्या माझ्या आज्जीच्या वयाच्या होत्या पण या मैत्रीच्या नात्यात त्यांचं वय कधी जाणवलंच नाही. बी.ए किंवा एम.ए ला असताना आम्हाला स्त्री लिखित आत्मचरित्रांचा समीक्षात्मक अभ्यास असा विषय होता. त्यावेळेला माधवीताईचे 'नाच ग घुमा' वर सविस्तर चर्चा ऐकली होती. आपल्याला शिकवणारी व्यक्ती कोणत्या दृष्टिकोनातून ती साहित्यकृती शिकवते त्यावर आपलही एक मत तयार होतं असा तो विद्यार्थी दशेतील काळ होता. त्यावेळेला पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीती देशपांडे यांचे ' आहे मनोहर तरी', विद्याधर पुंडलिक यांच्या पत्नी रागिणी पुंडलिक यांचे 'साथसंगत', प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी कमल पाध्ये यांचे ' बंध-अनुबंध' इत्यादी आत्मचरित्र अभ्यासाला होती आणि वेगवेगळ्या अर्थाने ती गाजतही होती. या आत्मचरित्रांमध्ये आपल्या आवडत्या लेखकाचे त्याच्या पत्नीने केलेले विश्लेषण अनेकांना आवडले नव्हते. त्यांच्या मनात असलेल्या प्रतिमेला यानिमित्ताने धक्का बसला होता आणि यात माधवी देसाई यांचं ' नाच ग घुमा ' हे देखील होतं. आम्हाला शिकविणाऱ्या प्राध्यापिका या रणजित देसाई यांच्या साहित्याच्या निस्सीम वाचक त्यामुळे माधवी देसाई यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राकडे त्या थोड्या पूर्वग्रहदुषित नजरेने बघायच्या आणि त्यांच्या शिकवण्यातून ते आमच्या पर्यंत पोहोचायचं. त्याचा फारसा परिणाम आमच्यावर झाला नाही. ती लेखकाची पत्नी आहे म्हणून तिच्या साहित्यकृतीचे मूल्यमापन त्याच निकषांवर न करता ती एक स्त्री आहे तिचंही काही वेगळं मत असू शकतं या दृष्टीकोनातून त्या-त्या आत्मचरित्रांकडे बघितलं असता त्या आत्मचरित्राचे वेगळेपण आणि महत्व लक्षात येऊ शकते. हे मनाशी पक्के असल्यामुळे यातील कोणत्याही लेखिकेबद्दल कोणताही पूर्वग्रह आमच्या मनात तयार होऊ शकला नाही. माधवी देसाई या त्यातील एकच. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वाटलं नव्हतं कि माधवीताईशी स्न्हेहाचे - जिव्हाळ्याचे संबंध जुळतील. ' नाच ग घुमा' वाचत असतना मनात अनेक प्रश्न उभे राहायचे आणि फक्त नाच ग घुमाच ' नाही तर वर उल्लेख केलेल्या सर्वच आत्मचरित्र वाचताना त्या त्या लेखिकेच्या संदर्भात काही न काही प्रश्न मनात येतात मात्र माधवीताईना ते प्रश्न विचारण्याची संधी मला मिळाली. कधी त्यांच्याशी बोलून तर दिवाळी अंकाला त्यांनी दिलेल्या लेखांमधून हि उत्तरं मिळत गेली. त्यांच्या आयुष्याचे अनेक वेगवेगळे आयाम होते. त्या त्या कोनातून बघितलं तर आयुष्याचा तो तुकडा खूप निराळाच वाटून जायचा. काचकवड्यांच्या नक्षीप्रमाणे किंवा कॅलिडीओस्कोप जसा फिरवू तशी प्रत्येक वेळेस वेगळीच नक्षी साकारते त्याप्रमणे त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या तुकड्यांमधून दिसायचं. कधी जमून आलेले तर कधी न जमलेले. मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांना चित्रतपस्वी म्हणाले जाते ते भालजी पेंढारकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीला पेंढारकर यांच्या त्या कन्या होत्या. चित्रपटसृष्टीतील अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या संबंधीच्या खूप वेगळ्या आठवणी त्यांनी जपून ठेवल्या होत्या ज्या त्यांच्याशी बोलताना अनेकदा ऐकायला मिळायच्या. त्या आठवणी शब्दबद्ध करायला हव्या होत्या असं आता वाटतंय. त्यांना कधीही भेटलं तरी त्या कायम पांढरीशुभ्र साडी आणि डोक्यावर पदर अशाच वेशात असायच्या. अगदी अलीकडच्या काळात त्यांना घरात गाऊन घातलेलं बघितलंय पण तो देखील पांढराशुभ्र ! एकदा गप्पा मारत असताना न राहवून या पांढरी साडी आणि डोक्यावरून किंवा दोन्ही खांद्यावरून पदर घेण्याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या ' भालजी म्हणजे माझे बाबा… यांना कायम असाच पेहराव आवडायचा. त्या काळात त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व स्त्री कलाकार कटाक्षाने पांढरी साडीच नेसायच्या. बाबांना आवडायचं म्हणून मी देखील नेसू लागले… आणि मीच काय पण लता मंगेशकर, सुलोचनाताई या त्यावेळेला भालजींबरोबर कोल्हापूरच्या स्टुडीओमध्ये काम करणाऱ्या अन्य महिलांवरही भालजींच्या या विचाराचा प्रभाव होता त्यामुळे त्याही पांढरी साडी नेसू लागल्या. आणि आणखी एक रहस्य आहे ज्याची तुला कदचित अतियोशक्ती वाटेल पण राजकपूरवर देखील भालजींच्या नायिका, त्यांच्या आसपास असणाऱ्या महिलांचा प्रभाव होता. पृथ्वीराज कपूर आणि भालजी यांची खूप चांगली मैत्री होती. सुट्ट्यांमध्ये पृथ्वीराज कपूर आपल्या सर्व कुटुंबियांसमवेत कोल्हापूरला पन्हाळयाला यायचे. राज कपूर तेव्हा खूप लहान होता. आमच्या घरातील सर्व स्त्रिया तेव्हा खास करून पांढरी साडी नेसायच्या. माझी आई लीला पेंढारकर हि देखील पांढरी साडी नेसायची. छोटा राजचं कायम ती लाड - कौतुक करायची. तो हि तिच्या मागे-पुढे असायचा. या सगळ्याचा परिणाम म्हण किंवा प्रभाव… त्याच्या नायिकांचा एक तरी शॉट पांढऱ्या साडीत असायचा.' माधवीताई बरोबर अचानकपणे राज कपूरचं एक रहस्य समजून गेलं. त्यांच्याशी गप्पा त्या याच असायच्या. मी पहिल्याच दिवाळी अंकाची तयारी करत होते. त्यावर्षीचा दिवाळी अंकाचा विषय होता 'आई'. एका प्रसिद्ध अशा अभिनेत्रीची मुलगी म्हणून माधवीताईचा लेख मला महत्वाचा वाटला. वयाची पाच - सहा वर्ष होई पर्यंत त्यांना माहित नव्हतं कि आपल्या घरात कधी तरी अधून - मधून येणारी, सुंदर दिसणारी हि स्त्री म्हणजे आपली आई आहे. कळत नव्हतं तेव्हापासून त्या त्यांच्या आज्जीकडे होत्या आणि त्यांची आई म्हणजे लीलाबाई सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना मुलांना भेटायला वेळ मिळायचा नाही. कधी घरी आलेली असताना दारा मागून आपल्या आईला न्याहाळताना त्यांना माहितच नव्हतं कि हि आपली आई आहे. इतकाही आईचा सहवास त्यांना मिळत नव्हता. आई - मुलीचं नातं मला खूप वेगळं वाटलं. दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यावर माधवीताईकडे गेले होते. आपल्या आई बद्दलच्या भावना त्यांना व्यक्त करायला मिळालं याचं त्यांना एवढं समाधान वाटत होतं की बोलताना त्यांना खूप भरून आलं होतं. त्यावेळची स्तब्धता - शांतता न बोलताही आई आणि मुलीच्या नात्याबद्दल बरंच काही बोलून गेली. बांदिवडेतील (बंदोडा) महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असलेलं 'नर्मदा' हे त्यांचं घर ही माझी खूप आवडती जागा. या घराच्या ओसरीत बसलं कि समोर महालक्ष्मी मंदिरातील दीपस्तंभ दिसतो. मंदिरात येणारी जाणारी वेगवेगळ्या प्रकरची माणसं दिसतात. मी त्यांना खुपदा मजेने म्हणायचे ' माधवीताई मला दत्तक घ्या ना. म्हणजे मला हे घर मिळेल… इथे राहायला मिळेल.' त्या जागेचा खूप मोठा इतिहास आहे. त्यांचं पहिलं लग्न गोव्यातील आणि बांदिवडेतील जमीनदार काटकर कुटुंबात झालं होतं. आपल्या पहिल्या पतिच्या निधनानंतर त्यांना वाटणीमधून हे घर मिळालं. ज्याला त्यांच्या सासूचं नाव आहे. त्यांचं दुसरं लग्न रणजित देसाई यांच्या बरोबर झालं जे फार काळ टिकलं नाही. ' माझ्या सासू बाई खूप दूरदृष्टी असलेल्या बाई होत्या. माझ्या आयुष्यात येणारी वादळं कदाचित त्यांना आधीच जाणवली होती. त्यामुळे मला किमान डोक्यावर छप्पर तरी असावं म्हणून त्यांनी हे घर माझ्या नावावर केलं असावं. म्हणूनच मी याच घरात शेवटचा श्वास घ्यावा… हीच माझी आता इच्छा आहे.' असं एकदा ओसरीत गप्पा मारत असतना आणि घराचा इतिहास सांगत असताना त्या बोलून गेल्या. मी त्यांच्या या वास्तूच्या प्रेमातच होते. पणजीमधील पत्रकार मैत्रीण कालिका बापट आणि लीना वेरेकर यांना घेऊन माधवीताईच्या घरी गेले होते. त्या दोघीही त्यांना पहिल्यांदाच भेटणार होत्या. त्यांचा अगत्य मी खुपदा अनुभवलं होतं. नुसती उभ्या - उभ्या भेटून जाणार आहे असं जरी आधी सांगून ठेवलं असलं तरी त्या कधीही भरपेट खायला घातल्याशिवाय सोडायच्या नाही. त्याही दिवशी असंच झालं. साग्र-संगीत असा त्यांनी स्वतः केलेला स्वयंपाक बघून या दोघी चकित झाल्या. सुंगटाचे हुमण, तळलेले बांगडे, वेल्ल्या आणि सोलकढी असा बेत त्यांनी केला होता. या वयातही त्यांच्यात असलेला उत्साह आम्हाला तिघींना लाजवेल असाच होता. घरातील साफसफाई त्या स्वतः करायच्या. त्याचं स्वयंपाक घर, मोजक्याच पण नीट- नेटक्या ठेवलेल्या वस्तू, त्यांचं लिखाणाचं टेबल, हॉलमध्ये असणारे देवघर, मुलींसाठी असलेली आणि जिच्यात माझा जास्त जीव आहे ती वरच्या मजल्यावरची खोली असं सगळं म्हणजे त्याचं विश्व होतं. त्यांच्या आयुष्यातला शेवटचा टप्पा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवला. याच काळात त्यांच्याशी जास्त संवाद घडू लागला. आजूबाजूला अस्वस्थ करणाऱ्या सामाजिक - राजकीय घडामोडी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या मग तो गोव्यातील शाळांमधील भाषा माध्यम प्रश्न असेल किंवा महिलांवरील अत्याचाराच्या घटना त्या उघडपणे तत्कालीन कामत सरकारच्या विरोधात- त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात बोलत होत्या. वृत्तपत्रात लिहित होत्या. तुम्हाला एवढं रोखठोक लिहिताना भीती वाटत नाही का? असं विचारलं असता, 'छे ग बिलकुल नाही… मला बिचाऱ्या म्हातारीला कोण काय करणार? आता राहिलं काय आहे तेव्हा?' असं म्हणायच्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सर्वत्र वाढत असताना त्यांना आमच्या प्रकल्प गावातील - ग्रामीण भागातील महिलांशी , किशोरी वयातील मुलींशी चर्चा करायची होती. या मुली - महिला सध्याच्या काळात कसा विचार करतात हे जाणून घ्यायचं होतं. तसा एक कार्यक्रमही आम्ही ठरवत होतो परंतु दिवसेंदिवस खालवत चाललेली त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. तरी देखील फोन करून त्या वेळोवेळी माहिती घायच्या. वृद्धापकाळात अनेकांना एकटेपण जाणवत. पण माधवीताई एकट्या असून ही त्या अर्थाने कधीच एकट्या नव्हत्या. फोंड्यात सुरु करण्यात आलेल्या महिला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी महिलांना चांगलं वाचायला शिकवलं, नामवंत लेखिकांना त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी गोव्यात बोलावलं त्यांच्याशी संवाद घडवून आणला. हे सगळं करणं आणि ते देखील वयाची सत्तरी उलटून गेलेली असताना एवढं सोप्पं नक्कीच नव्हतं. संमेलन म्हणलं कि त्यांच्या अंगात जो उत्साह संचारायचा कि पुढचे काही दिवस त्याच्याच डःऊण्डःईट असायच्या. नामवंत दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांची मुलगी असताना अनुभवलेले वैभव, वलयांकित जीवन तर दुसऱ्या क्षणाला गोव्यातील ग्रामीण भागातील मुलाशी लग्न करून एक सामान्य जीवन जगणारी मुलगी, संसारात रमलेली असताना अचानक पतीच्या मृत्यूने बदलून गेलेलं तिचं जग, परत दुसरं लग्न करून नवी स्वप्नं बघणारी… स्वतःच्या सुखापेक्षा मुलींना पित्याचा आधार हवा या विचाराने झटणारी आई, लेखक पतीची मनातील प्रतिमा एक आणि प्रत्यक्ष प्रतिमा वेगळी हे कळून चुकल्यावर स्वतःशी आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी झगडणारी पत्नी… आयुष्यात आलेले अनुभव कागदावर मांडणारी लेखिका, गोवा मुक्ती संग्रामात भूमिगत होऊन काम करणाऱ्या, सामाजिक मन आणि जाण जपणाऱ्या अशा अनेक भूमिका जणू एखाद्या चित्रपटातील नायिकेसाठी लिहिलेल्या असाव्यात अशा माधवीताई प्रत्यक्षात जगल्या. त्या त्या टप्प्याला त्या भूमिकेला न्याय दिला. एकाच व्यक्तीच्या आयुष्यात किती चढ उतार असू शकतात हे माधवीताईकडे बघितलं कि समजू शकतं. गेल्या वर्षी 'गोव्यावर' दिवाळी अंक करत असताना त्यांच्याकडे गेले होते. त्या वेळेस त्या खूप आजारी होत्या. गोव्यावर दिवाळी अंक करतेय आणि नेमकी आजारी असल्यामुळे काही लिहू शकत नाहीत. याचं त्यांना वाईट वाटतं होतं. पुढच्या वर्षीच्या अंकात लिहिण्यासाठी आधी ठणठणीत बऱ्या व्हा. अजून खूप विषय आहेत ज्यावर तुम्हाला लिहायचं असं म्हणून आले होते. गेल्या तीन चार आठवड्या पासून त्यांच्या घरातला फोन उचलला जात नव्हता. त्यांना यावर्षीच्या दिवाळी अंकाविषयी सांगायचं होतं… आता ते राहूनच गेलं. बऱ्याच गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या त्या ही अर्धवट राहिल्या. मागे एकदा अख्खा दिवस त्यांच्या घरी घालवला असताना त्यांच्या घराचे भरपूर फोटो काढले होते. त्यांच्या घरात वरच्या खोलीत जाणाऱ्या पायऱ्या आहेत त्यावर बसून मला त्यांचा फोटो घ्यायचा होता. त्यांना आग्रह केला तर म्हणाल्या ' आज नको परत कधी तरी आज मी छान नाही दिसत. खूपच म्हातारी वाटतेय. पुढच्या वेळेस आलीस ना कि सांग म्हणजे जरा तरुण बनून तुला फोटोसाठी पोझ देईन… ' आणि वर आम्ही इतक्या खळखळून हसलो होतो. त्यांचे तसे तरुण बनून येणे राहूनच गेले. खूप उशीरा त्यांच्याशी मैत्री झाली… आणखी काही वर्ष मिळायला हवी होती.

Sunday, June 30, 2013

विवाहविषयक कायदा : बदलांची नांदी

गेल्या आठवड्यात खळबळ उडेल अशीच एक घटना घडली आणि हि गोष्ट प्रसारमाध्यमांनी आपापल्यापरीने रंगवून सांगितली त्याचा परिणाम असा झाला कि त्या निर्णयाचे गांभीर्य बाजूला राहून भलत्याच विषयांची सुरुवात झाली. ' लग्न न करता शरीरसंबंध ठेवणाऱ्या स्त्री -पुरुषांना आता न्यायालयाकडून पती-पत्नीचा दर्जा मिळणार ' अशा शीर्षकाची बातमी कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर वारंवार प्रसारित होत होती. लग्न न करता ' लिव्ह इन रिलेशनशिप ' मध्ये असणाऱ्या मुला -मुलींना वाटून गेलं, आता हा काय नवीन घोळ? ' नवरा -बायकोचं ' नातं नको म्हणून 'लिव्ह इन' चा मार्ग शोधला पण कोर्ट आता यालाच पती -पत्नीचा दर्जा द्यायला निघालाय कि काय? तर महिलांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरु झाली आपल्या नवऱ्याने जर एखाद्या दुसऱ्या महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवले तर तिला देखील पत्नीचा दर्जा मिळणार कि काय?… अशी बऱ्याच प्रकाराने चर्चा ऐकायला मिळत होती. असा कसा निर्णय असू शकतो हे ऐकताच क्षणी वाटून गेलं. बातमी खूप अर्धवट माहिती देणारी वाटत होती. कोणती तरी घटना आहे, याचिका आहे ज्यावर निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या न्याधीशांनी बरच काही सांगितलं असणार पण नेहमीच्या सवयीने, त्यावर फारसा अभ्यास न करता, सर्वांच्या आधी बातमी दाखवण्याच्या स्पर्धेने एक नवीनच बातमी जन्माला घातली. सोशलनेटवर्किंग साईटवर ज्याच्या त्याच्या वॉलवर, 'स्टेटस ' वर मद्रास हायकोर्टाचा निर्णय या बातमीच्या रूपाने झळकत होता. प्रत्यक्ष मद्रास हायकोर्टाने दिलेला निर्णय : एका मुस्लिम महिला याचीकाकर्तीच्या याचिकेवर निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेला हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. 'धार्मिक विधीपूर्वक विवाह हि केवळ एक रूढी आहे. ती सक्ती नाही. त्यामुळे या प्रकरणातील वादी (याचीकाकर्ती महिला) व प्रतिवादी (तिचा नवरा) यांना हे कोर्ट स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवणारे, सर्वसाधारण आयुष्यातील परस्परांचे जोडीदार समजते. मुलाला जन्म देण्यापूर्वी वादी महिला आणि लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी प्रतिवादी पुरुष असे दोघेही अविवाहित होते याबद्दल वाद नाही. एका छताखाली त्यांनी वैवाहिक जीवन व्यतित केले व त्यांना दोन मुलेही झाली. त्यामुळे वादी महिलेस 'पत्नी'च्या आणि पुरुषास 'पती'चा दर्जा देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच त्यांना झालेली मुले हि औरस आहेत आणि वादी हि प्रतीवादीची औरस पत्नी आहे. हे कोर्ट असा दृष्टीकोन मांडते आहे कि वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या महिलेने जर वयाची २१ वर्ष पूर्ण केलेल्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गरोदर राहिली तर ती महिला त्या पुरुषाची पत्नी व तो पुरुष त्या महिलेचा पती समजला जाईल. अशा संबंधातून ती महिला गरोदर राहिली नाही, परंतु असे संबंध असल्याचा पुरेसा कागदोपत्री पुरावा उपलब्ध असेल तर अशा जोडप्यांना पती - पत्नी समजावे. असे संबंध असलेल्या जोडप्यांमध्ये जर बेबनाव झाला तर 'पत्नी'शी कायदेशीर घटोस्फोट घेतल्याशिवाय 'पती' दुसरा विवाह करू शकत नाही.' या निर्णयात कोर्टाने फक्त महिलेची बाजू न बघता मुलांच्या भावविश्वाचा विचार केलेला दिसतो. आपली जबाबदारी झटकण्यासाठी मुलांना अनौरस ठरवून समाजाच्या एक प्रकारच्या जाचत ढकलून देण्याचा प्रयत्न इथे कोर्टाने हाणून पडला आहे. आपल्याला सोडून गेलेल्या नवऱ्याकडून पोटगी मिळावी या करता महिलेने न्यायालयात धाव घेतली असता त्यावर तिच्या या नवऱ्याने आपले या महिलेशी लग्न झाले नव्हते आणि हि मुले आपली नाहीत अशी मांडणी न्यायालयात केली. औपचारिक विवाह पद्धतीप्रमाणे विवाह झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे या महिलेला आणि तिच्या दोन मुलांना सोडून गेलेल्या तिच्या नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची नुसतीच जाणीव नव्हे तर त्यातील गांभीर्य लक्षात यावे यादृष्टीने हा निर्णय खूप महत्वाचा वाटतो. लग्न झाल्याचा पुरावा नाही पण मुलांच्या जन्माच्या वेळेस दवाखान्यातील कागदपत्रांवरील मुलांचा पिता म्हणून सही केल्याचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानला आणि आपल्याच मुलांना अनौरसपणाचा शिक्का मारणाऱ्या स्वार्थी पित्याला या निर्णयातून अद्दल घडविली आहे. भारतात प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे विवाह विधी आहेत. विवाह विषयक वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत आणि या सर्वांचा विचार करून त्याप्रमाणे आपल्याकडील न्यायव्यवस्थेत विवाह विषयक वेगवेगळे कायदेही आहेत. अनेकजण यातून पळवाटा शोधत असतात. शाहबानो केस मधील निर्णयाची कायम चर्चा होत असते त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या एका मुस्लिम महिलेला न्याय मिळवून देताना न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी त्या अर्थाने महत्वाची वाटते. शिवाय प्रेमविवाहास घरातल्यांचा विरोध म्हणून पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या हातात त्या परिस्थितीत लग्न झाल्याचा कोणता पुरावा असणार आणि असं लग्न फसलं गेलं तर त्या मुलीला कोणत्या गोष्टीच्या आधारावर न्याय मिळणार याचा विचार केला असता मद्रास हायकोर्टाचा निर्णय म्हणजे एक महत्वाचं पाऊल मानावे लागेल. अशा प्रकारच्या लग्नात अनेकदा मुलींची फसवणूक होत असते. या निर्णयामुळे या पद्धतीच्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसू शकतो न्यायालयाने दिलेला निर्णय लग्न करून फसवल्या गेलेल्या महिलांच्या आर्थिक सुरक्षितेच्या दृष्टीने उचलेले योग्य पाऊल आहे असे वाटते. लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना देखील या निर्णयाने चपराक बसली आहे. निव्वळ शारीरिक सुखासाठी एखाद्या महिलेचा वापर करून घेणाऱ्या आणि संबंधातून जन्माला आलेल्या मुलांची आणि तिची जबाबदारी नाकारु शकणाऱ्या पुरुषांवर न्यायालयाची भिस्त आहे. पण या निर्णयातील मूळ भाग समजून न घेता, त्यातील गांभीर्य लक्षात न घेता सनसनाटी निर्माण करण्यात धन्यता बाळगणाऱ्या प्रसारमाध्यमांनी मात्र यानिमित्ताने आपली पोळी छान भाजून घेतली.

Sunday, June 16, 2013

नव्या युगातील नव्या समस्या...

बदल स्वीकारायला थोडा काळ जावा लागतो म्हणतात तेच खरं. मी रहात असलेला पिंपरी चिंचवड भाग गेल्या दहा- पंधरा वर्षात खूप बदललाय. लोकांचं राहणीमान बदललं, गावपणाच्या खूणा पुसल्या जाऊन टोलेजंगी इमारती, मोठ - मोठे हौसिंग प्रोजेक्ट उभे राहिले. पवना नदीचं बाराही महिने खळखळणारे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. आज जिथे आय. टी पार्कचं जंगल उभं आहे तिथे काही वर्षांपूर्वी संपन्न अशी शेती होती. आता हा सगळा भाग एकदम बदलून गेलाय. पण आजही दर रविवारी या भागात आठवडी बाजार भरतो. त्यातलं चित्र मात्र थोडसं बदललंय. जीन्स -टी शर्ट, शॉर्ट्स, मिनी स्कर्ट घातलेल्या गृहिणी, नोकरीच्या निमित्ताने एकट्या राहणाऱ्या मुली या बाजारात आठवड्याची खरेदी करायला आलेल्या दिसतात. आय.टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या भला मोठा पगार कमविणाऱ्या या मुली सुरुवातीला सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय होता. हिंजवडी, थेरगाव, वाकड, बालेवाडी हा भाग अगदी ग्रामीण नसला तरी सहजपणे बदल स्वीकारणाराही नव्हता. आपल्या घरातील मुलींना चांगलं उच्च शिक्षण मिळावं म्हणून जवळच १५ कि.मी वर असलेल्या पुणे शहरात पाठवायला तयार नसलेल्या पालकांना आजूबाजूला घडणारे बदल न रुचणारे होते. बेंगलोर, दिल्ली-चंदिगढ, चेन्नई अशा वेगवेगळ्या भागातून मुली नोकरीसाठी एकट्या येतात काय आणि चोघी -पाच जणी एका प्लाट मध्ये एकत्र राहतात काय… हे सगळं त्यांच्यासाठी आश्चर्य वाटणारं होत. त्यामुळे सुरुवातीची काही वर्ष त्या चर्चेचा आणि टीकेचा विषय बनून गेल्या. मध्यंतरी एका कंपनीसाठी आय. टी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींच्या दैनंदिन सोयी सुविधांबाबत असणाऱ्या गरजा जाणून घेण्यासाठी सर्व्हे करायचं काम आमच्या संस्थेकडे आलं. कंपनीला या मुलींना लागणाऱ्या दैनंदिन सोयी सुविधांमध्येच फक्त रस होता. अर्थातच कंपनीचा पुढचा प्रोजेक्ट या मुलींच्या गरजांवर आधारित असल्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. अशी चर्चा करायची संधी परत मिळेल न मिळेल असा विचार करून मी मात्र तयार केलेल्या प्रश्नावली मध्ये समस्यांबाबत काही प्रश्न वाढवले. मला आय.टी क्षेत्रात आडनीड वेळेत काम करणाऱ्या या मुलींचं विश्व कसं आहे हे जाणून घ्यायचं होतं. बाहेरून चकचकीत दिसणारं जग खरंच तसं आहे का? आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यावर महिलांची निर्णय क्षमता वाढते असं कायम म्हणलं जातं पण प्रत्यक्षात आर्थिक सुबत्ता - आर्थिक स्वातंत्र्य आल्यानंतर या मुलींना निर्णय स्वातंत्र्य मिळालं आहे का? आर्थिक सुबत्तेमुळे यांच्या आयुष्यात कोणते बदल झाले आहेत असे अनेक प्रश्न मनात होते ज्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत होते. लग्न झालेल्या आणि अविवाहित असणाऱ्या दोन्ही प्रकारच्या मुलींशी संवाद साधला. मुळात त्यांच्याशी अशा विषयावर कोणी चर्चा करायला उत्सुक आहे याचंच त्यांना आश्चर्य वाटलं. आर्थिक सुबत्ता आहे म्हणून सगळ्या समस्या संपल्या असं कसं होईल!! उलट पैसा आहे म्हणून जरा वेगळ्याच समस्या तयार होत आहेत असं जाणवलं. जबाबदारीचे पद, विचित्र अशी कामाची वेळ, घरातील जबाबदाऱ्या यासगळ्याचा ताण निश्चितच मनावर असतो आणि असा ताण अन्य कोणत्याही प्रकारची नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर असू शकतो. आठवड्यातले पाच दिवस मर मर काम आणि 'वीकएन्ड'ला आराम - एन्जॉय करण्याचं 'कल्चर' वाढल्याचं या मुली सांगत होत्या. खूप मोकळेपणाने सुरु झालेली चर्चा वेगवेगळ्या मुद्द्यांकडे वळत होती. लग्न न केलेल्या मुली लग्न झालेल्या मुलींचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होत्या. 'मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही आय.टी फिल्ड मध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरीला आहोत. आम्हाला साडे तीन वर्षाची मुलगी आहे. दोघांचे कुटुंबीय दिल्लीमध्ये असतात. तिथले व्याप सोडून इथे येउन राहणं त्यांना जमत नाही. दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलीला कुठे ठेवायचं हा प्रश्न आमच्या समोर आला म्हणून मग आम्ही दिवसभरासाठी एका बाईला कामाला ठेवलं. मुलीला वेळ देत येत नाही याची मनात बोच असते. आमच्या शिक्षणासाठी आई - वडिलांनी काढलेलं कर्ज, घरासाठी घेतलेलं कर्ज आणि भविष्यातील अन्य काही महत्वाच्या सोयी सुविधा- गरजा यासाठी यापद्धतीची नोकरी खूप गरजेची आहे.' हिंजवडीमधील एका नामांकित कंपनी मध्ये काम करणारी एक जण मोकळेपणाने बोलत होती तिचा मुद्दा पकडून आणखी एक जण बोलू लागली …. ' आम्ही भरपूर कमवतो. नक्कीच आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला आहे. पण यासगळ्याचा मनापासून आनंद काही घेता येत नाही. घरात अत्याधुनिक उपकरणं आहेत. ए. सी आहे. किचनमधील काम लवकरात लवकर उरकावं यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करून घेतल्या आहेत. पण यासगळ्याचा उपभोग घ्यायला आम्ही घरात हजर नसतो. आमच्या घरातील मोलकरीण या सगळ्याचा उपभोग घेत असते' हसत हसत बोलत एकदम स्वतःच्याच मर्मावर बोट ठेवल्यासारखं झालं. अनेकींनी तिच्या या बोलण्याला दुजोरा दिला. या क्षेत्रात काम करणाऱ्या मुला-मुलींची आर्थिक परिस्थिती सुधारली त्यामुळे आता लग्न पद्धतीमध्येहि बदल झाले आहेत. मुला - मुलींना कंपनी कडून मिळणारं आर्थिक 'प्याकेज' हेच लग्न जमविण्याचं मध्यम पण आहे आणि अडचणही आहे. मुलाच्या बरोबरीने मुलीलाही प्याकेज असलं पाहिजे असं बघून मुलगी पंसंत करणारे अनेकजण इथे दिसतात. आय. टी मध्ये नोकरी करणारी मुलगी असली पाहिजे हि मुला पेक्षा मुलाच्या आई -वडिलांचीच मागणी असल्याचं अनेकींनी बोलून दाखवलं. त्याच क्षेत्रातली सून हवी हा अट्टहास आणि शिवाय सुनेनं घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात अशी अपेक्षा ही असते यामध्ये आमची तारेवरची कसरत होते असं काहीजणींनी सांगितलं. 'आम्ही भरपूर कमवतो म्हणजे आम्हाला काहीच समस्या नसणार… यांना कसलं आलंय दु:ख!! असंच अनेकांना वाटतं. आर्थिक विवंचना नसल्या तरी त्यातून आलेल्या वेगळ्या समस्या आमच्या समोर आहेत. मुलांना वेळ देऊ शकत नाही यामुळे मनात एकप्रकारची अपराधीपणाची भावना असते आणि या भावनेतून खूपदा मुलांचे नको इतके लाड केले जातात. ते मागतील ती वस्तू त्यांना आणून देतो. शनिवार - रविवार म्हणजे आमच्यातील आपराधीपणाची भावना पुसून टाकण्यासाठीचा दिवस असतो.… ' बेंगलोर मधून नुकतीच पुण्यात स्थायिक झालेली नंदिनी सांगत होती. ' तरी आता बऱ्याच कंपनींनी वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या काहीजणींना घरून काम करण्याची परवानगी दिलीय म्हणून थोडा फार फरक पडू लागलाय. बदलही होतील हळूहळू. खरंतर कामाच्या गरजे प्रमाणेच इथल्या कामाची रचना आहे. पण या रचनेशी मिळतं जुळतं घेण्याची मानसिकता आजू बाजूला दिसत नाही. पुण्यातील आय.टी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांवर बलात्कार घडण्याच्या अनेक घटना मधल्या काही वर्षांमध्ये घडल्या आणि इथल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणी वर आला आणि तेव्हा पासून इथे काम करणाऱ्या महिलांकडे- त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने बघितले जाऊ लागले. मी आजवर वेगवेगळ्या स्तरातील महिलांना भेटले त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पण आय.टी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींशी संवाद साधण्याचा हा अनुभव बराच वेगळा होता. समस्या नाहीयेत असं नाही. समस्या आहेत हे ही नाकारून चालणार नाही. मनस्विनी प्रभुणे manswini-prabhune.blogspot.com

Saturday, June 1, 2013

परिस्थिती आणि व्यवस्थेच्या बळी.

साठच्या दशकात महिला आणि त्यांची सुरक्षितता याबाबत झालेल्या सर्व्हे बद्दल मध्यंतरी वाचनात आलं. यामध्ये देश पातळीवर महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात एक प्रश्न होता - ' तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते?. ' आणि यामध्ये आलेल्या उत्तरांमध्ये सर्वात जास्त प्रमाण होतं ते या उत्तराचं- ' कोणी आपल्याला फसवून पळवून नेईल आणि वेश्या व्यवसायाला लावेल ' अशी भीती महिलांनी व्यक्त केली होती. त्या काळात आलेल्या बहुसंख्य चित्रपटांमध्ये महिलांना पळवून नेवून वेश्या व्यवसायात ढकललं जायचं, असं दृश्य दाखवलं जाई. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून अशी भीती महिलांना वाटत असणार असं मला वाटतं होतं. हे उदाहरण झालं साठच्या दशकातील पण आज ही वेश्या व्यवसायात येणाऱ्या बहुसंख्य महिलांना खरोखरच फसवून या व्यवसायात आणलं जातं आणि त्यासाठी एक मोठा ग्रुप नियोजनबध्द पद्धतीने काम करत असतो. काही महिलांना त्यांच्या नात्यातील जवळच्या व्यक्तीनेच पैशांसाठी दलालाला विकल्याची उदाहरणे पुढे एका प्रकल्पात काम करत असताना बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने या जगाशी ओळख झाली. तिथे होणाऱ्या व्यवहारांची माहिती मिळाली. गोव्यातील बायणा बीचवरील ' रेड लाईट ' भागातील महिलांच्या (ज्यांना csw म्हणजेच कॅमर्शीअल सेक्स वर्कर म्हटलं जातं) पुनर्वसन प्रकल्पात काम करत असताना हे जग जवळून बघायला मिळाले, यातील महिलांच्या समस्या जाणून घेता आल्या. आम्हाला या पुनर्वसन प्रकल्पासाठी वस्तीतील प्रत्येक महिलेची माहिती घ्यायची होती आणि या सर्व महिलांच्या पुनर्वसनाच्या गरजा काय आहेत हे त्यांच्याशी बोलून जाणून घ्यायचं होतं. या सर्व महिलांशी संवाद साधणं तसं अवघड होतं. हे जग असं एवढ्या जवळून बघायला मिळेल असं कधी वाटलंही नव्हतं. सर्वसामान्य महिलांच्या मनात एक अनामिक भीती असते, गैरसमज असतात ते माझ्याही मनात होते. यापूर्वी वेश्यावस्ती एवढ्या जवळून कधीच बघितली नव्हती. चित्रपटांमधील या वस्तीचं दाखवलं जाणारं चडक - भडक चित्रण आणि त्याचा प्रभाव थोडाफार मनावर होता. पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील मुली - महिला गिऱ्हाईकाची वाट बघत बसलेल्या त्या रस्त्यावरून जाताना कायम दिसायच्या. त्यांना बघितलं की मनात कायम एक प्रश्न यायचा ' या व्यवसायात कशा आणि का आल्या असतील? ' पहिल्यांदा बायणा रेड लाईट भागात गेले होते तो दिवस आज हि आठवतोय. एका बाजूला बायणातील वेश्यावस्ती आणि दुसऱ्या बाजूला उसळलेला निळाभोर समुद्र, एकीकडे दु:खं - दारिद्याने भरलेली वस्ती तर समोरच निसर्गाने मुक्तपणे सौंदर्य उधळलेला रमणीय असा समुद्र किनारा… केवढा विसंगतपणा !! दूरवर समुद्राचं सौंदर्य न्याहाळत बसलं तर या वस्तीचा विसर पडतो आणि समुद्राकडे पाठ करून वस्तीकडे बघितलं तर तिथल्या समस्यांमुळे समुद्राचं सौंदर्य क्षणात विसरायला होतं. एवढा विरोधाभास असलेलं ठिकाण यापूर्वी कधी बघितलं नव्हतं. या जगाची रीतभात वेगळी आहे, इथले नियम वेगळे आहेत. त्यांची भाषाही वेगळी आहे. हे सगळं समजून घेणं हा देखील कामचा एक भाग होता. इथे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिला या मालकिणी असतात त्यांना 'घरवाली' म्हणतात. वस्तीतील मुलाला कळायला लागलं कि तो कुणाची न कुणाची तरी दलाली सुरु करतो. अगदी चौदा - पंधरा वर्षांचा मुलगा देखील या दलालीत उतरतो. गिऱ्हाईक शोधून आणायचं, त्याच्याशी सौदा करायचा , त्याच्याकडून कमिशन घ्यायचं आणि ज्या घरावालींच्या मुलींसाठी गिऱ्हाईक आणलं त्या घरवालीकडूनही कमिशन घ्यायचं असा झटपट पैसे कमविण्याचा मार्ग असताना हि मुलं शिकतील कशासाठी ना ? बायणा वेश्या वस्तीचं एक वेगळेपण होतं. या वस्तीतील देहविक्रय करणाऱ्या महिला कधीच कायमस्वरूपी या वस्तीत राहिल्या नाहीत. दिल्ली - कोलकाता - मुंबई - गोवा - हैद्राबाद - चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये या व्यवसायाची एक आगळी वेगळी पद्धत या व्यवसायातील मोठ्या दलालांनी रुजवली आहे. या शहरामध्ये कायमस्वरूपी तिथेच राहून देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत पण त्या बरोबरीने कायम फिरत्या पद्धतीने काम करणाऱ्या महिलांची यंत्रणा या दलालांनी उभी केली आहे. आंध्र - कर्नाटक मधून फसवून आणल्या जाणाऱ्या महिला काही महिने गोव्यात मग मुंबईला, मग दिल्लीला, त्यानंतर कोलकात्याला, मग परत चेन्नई किंवा हैद्राबाद असा कायम फिरता व्यवसाय या महिला करत असतात. एखादीला या व्यवसायातून बाहेर काढायचंय, तिची सुटका करायची असेल तर तिथे गेल्यावर ती तिथे कधीच सापडू शकत नाही. कारण एका जागेवर ती स्थिर राहावी अशी व्यवस्थाचं नसते. तिचं एका जागी राहणं इतरांना धोकादायक ठरतं. बयाणामध्ये या पद्धतीने काम करणाऱ्या महिलांची संख्या जास्त होती. इथल्या महिलांची प्रत्येकीची वेगळीच कहाणी आहे. त्यासगळ्याचं मूळ 'दारिद्य - गरिबी - उपासमार- कौटुंबिक समस्या' हेच आहे. आपल्याला याच व्यवसायात जायचंय असं कोणी ठरवून येत नसतं. परिस्थितीने गांजलेल्या महिला इथल्या चक्रव्यूहात अडकतात. बायणातील महिलांशी बोलत असताना त्या इथे कशा आल्या याचा मागोवा घेत होते. ' घरात खाणाऱ्यांची तोंडं जास्त आणि कमवणारे हात कमी अशा परिस्थितीत गावातली कोणी बाई शहरात नोकरी देते म्हणाली म्हणून तिच्या बरोबर आले. तेव्हा माहित नव्हतं ती आपल्याला रेड लाईट भागात घेऊन जाणार आहे. घरकाम करायला घेऊन जाते असं म्हणली होती पण तिने फसवून इकडे आणलं.' असं आंध्र अधून आलेल्या एका महिलेनं सांगितलं. तर दुसरी म्हणली , ' मला मुल होत नाही म्हणून नवऱ्याला दुसरं लग्न करायचं होतं. त्याने देवदर्शनाला जाऊ असं सांगून इथे आणलं आणि मला एका दलाला विकलं. ' या महिलांना नोकरी देते - देतो असं सांगून आणत असताना त्यांच्या घरच्यांना काही रक्कम आधीच दिली जाते आणि रक्कम म्हणजे त्या मुलीच्या - महिलेच्या नावावर एकप्रकारे कर्ज म्हणून लावली जाते. जर ती महिला घरी परत जायचं म्हणून मागे लागली तर तिला आधी रक्कम परत कर आणि मग जा असं सांगितलं जातं. तिला माहितच नसतं कि आपल्या घरच्यांना किती रक्कम दिलीय? आणि खरचं दिली आहे का नाही हे हि कुठे माहित असतं. त्यामुळे हि रक्कम फेडून आपण परत आपल्या घरी जायचं असं स्वप्न इथे नव्याने येणारी प्रत्येक मुलगी बघत असते. पण ते कर्ज काही कधी फिटलं जात नाही आणि मुलगी काही परत घरी जात नाही. हाताशी लागलेली मुलगी दलालाकडून रेडलाईट भागातील 'घरवालीला' विकली जाते. म्हणजे या मुलीवर दोन प्रकारची कर्ज चढली जातात. एक दलालाने तिच्या घरच्यांना दिलेले पैसे आणि दुसरे घरवालीने दलाला दिलेले पैसे ती या मुलीकडूनच कर्जाच्या रूपाने वसूल करते . कर्जाच्या बोज्याने ती या व्यवसायात अडकून जाते. घरवालीकडे आल्यावर तिला तिथे राहण्याचं - जेवणाचं भाडं द्यावं लागतं जे घरवाली या मुलीला देहविक्रीय व्यवसायाला लावल्या नंतर मिळणाऱ्या पैशांमधून कापून घेते. त्यामुळे मिळणाऱ्या पैशांमधून कापून घेतली जाणारी रक्कम अधिक असते आणि तिच्या हातात पडणारी रक्कम खूपच कमी असते. अशिक्षित महिलांचा गैरफायदा घेतला जातो त्या बिचाऱ्यांना कधी कर्ज फिटून गेलं असेल तरी माहित नसतं. काही महिलांचा आपल्या घरच्यांशी परत संबंध येतो पण तो फक्त त्यांना पैसे पाठवण्या पुरता. मी या महिलांशी बोलत होते तेव्हा एक महिला सगळ्यात शेवटी बसली होती आणि ती दबक्या आवाजात रडतेय असं मला जाणवत होतं. न राहवून शेवटी मी एकीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. हि रडणारी महिला दर महिन्याला आपल्या घरी पैसे पाठवायची. तिच्या पैश्यांवर तिच्या भावंडांचं शिक्षण झालं. घरातल्यांची उपासमार थांबली. तिच्या भावाचं लग्न ठरलं म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्याकडे जास्त रक्कम मागितली होती. घरवालीकडून कर्ज घेऊन तिने घरी पन्नास हजार पाठवले. हि रक्कम फेडायला पुढची कित्येक वर्ष या महिलेला त्या घरवालीकडे काम करावं लागणार हे या रक्कमेवरून समजतं. रक्कम मिळाल्यावर तिच्या घरच्यांकडून या महिलेला निरोप आला कि तू लग्नाला येऊ नकोस. तुला नंतर लग्नाचे फोटो पाठवून देतो आणि आम्ही ज्या दिवशी चर्चा करायला बसलो होतो त्या दिवशी तिच्या भावाचं लग्न होतं. तिला काय आणि कसं समजवायचं हेच कळत नव्हतं. भारतीय राज्यघटनेने वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. पण या व्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आहेत - सामाजिक कार्यकर्ते आहेत. जो व्यवसाय शारीरावर अत्याचार करणारा आहे, ज्यामधून शारीरिक शोषण होतं अशा व्यवसायाला कायदेशीर मान्यता का म्हणून द्यावी असं मला वाटतं. या व्यवसायात कोणतीही महिला राजी - खुशीने या व्यवसायात येत नाही. तिला या व्यवसायात यायला भाग पडणाऱ्या व्यवस्थेलाही एकप्रकारे बळकटी मिळू शकते. कोणाचे तरी शोषण होतं आणि त्यावर कोणा दुसऱ्या - तिसऱ्याचं पोट भरतं असा हा या व्यवसायाचा प्रकार आहे. बलात्काराच्या घटना घडल्यावर खूपदा आजूबाजूला काही महिलांकडून ऐकायला मिळतं.' वेश्या आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे तरी काही पुरुषांशी वासना शमवली जातेय आणि त्यामुळे बलात्कारासारख्या घटना कमी होत आहेत. ' म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी आपणच आपल्या बहिणीचा बळी तर देत नाही ना ? असा विचार आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा व्यवसायाला कायदेशीर मान्यता देऊन त्यांना आपण कायमचं त्याच जगात राहण्याची रीतसर व्यवस्थाच करत आहोत कि काय… असंही वाटतं. प्रीती - प्रवीण पाटकर, ज्योती पठानिया, विलास चाफेकर या सारखे सामाजिक कार्यकर्ते जे या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी गेली कित्येक वर्ष काम करत आहेत. याठिकाणी काम करत असतना लागणारी यासर्वामधील सहनशीलता वखाण्याजोगी आहे. कल्पनेपलीकडच्या जगाचा अनुभव माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारा होता. आपणच काय पण कोणीही या महिलांना यातून बाहेर काढण्यासाठी काही करू शकत नाही हि भावना खूप त्रासदायक ठरली. आज हि त्या महिलांचे चेहरे आठवले कि आपण कोणाला दोष द्यायचा असं वाटून जातं.

Monday, May 6, 2013

सामुहिक कृतीतून महिलांना मिळाले आरक्षण

न चुकणारा रोजचा बस प्रवास. आधी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मग नोकरीच्या निमित्ताने रोज बस प्रवास घडतो. बस प्रवासातील रोजचा एक तास वाचनासाठी, दिवसभराच्या कामाच्या नियोजनासाठी उपयोगी पडतो. पुण्याच्या बस (पी.एम.पी.एल) मध्ये डाव्या बाजूची अख्खी रांग 'महिलांसाठी राखीव' असल्यामुळे हल्ली हा प्रवास अधिक सुखकर झालाय. काही वर्षांपूर्वी हाच प्रवास नकोसा वाटायचा. रोज कोणाशी न कोणाशी तरी भांडण ते हि जागा मिळण्यासाठी नव्हे तर या छोट्याश्या बस प्रवासात शेजारी बसलेल्या पुरूष प्रवाश्याच्या विचित्र वर्तनामुळे. अगदी रोज नाही अधूनमधून कोणी तरी नमुना भेटायचा. सुरुवातीला कधी तरी अशा अनुभवला समोर जावं लागलं तेव्हा मी देखील इतर जणीसारखी नक्कीच घाबरले. त्या जागेवरून उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसले. तात्पुरती त्या समस्येपासून पळवाट काढली. पण हे असं परत करू शकले नाही. थोडी हिम्मत दाखवून आवाज चढवून शेजारी बसलेल्या भामट्याला नीट बसायची ताकीद दिली. माझा चढलेला आवाज ऐकून तो माणूस असा काही घाबरला कि पुढच्या स्टोपवर उतरून निघून गेला. असे लपून छापून चाळे करताना लाज वाटत नाही पण सर्वांच्या देखत आपल्या सोज्वळ रूपाचा पंचनामा व्हायला नको या विचाराने घाबरून जातात. हे लक्षात येताच बस प्रवासात अशी कोणी व्यक्ती शेजारी बसल्यास न घाबरता पहिल्यांदा आवाज चढवून ( बाकीच्या सर्व प्रवाश्यांना ऐकायला जावं या उद्देशानेच) त्याला समज द्यायची एक चांगली युक्ती अंमलात आणायला सुरुवात केली. काही दिवसात हे जाणवलं की हे फक्त माझ्याबाबतचं घडत नाहीये तर अनेकजणींना या अनुभवला सामोरं जावं लागतंय. पण बायका त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला बोलायला घाबरतात. आपण ओरडाआरडा केला तर सगळ्यांना समजेल आणि बाकीची लोकं आपल्यालाच नावं ठेवतील या विचाराने घाबरून जाऊन त्या शांत राहतात आणि शेजारी बसलेल्या पुरुष प्रवाश्याचा त्रास सहन करतात. एकदा बसमध्ये माझ्यासमोरच्या सीटवर एक महिला येउन बसली नंतर तिच्या शेजारी कोणी पुरुष प्रवासी येउन बसला. ती खिडकीत बसली होती. हळूहळू तो प्रवासी तिला इतका चिकटून बसला कि त्याच्या आणि तिच्यामध्ये थोडं अंतर राहावं यासाठी ती थोडी सरकून अंग चोरून बसली. तो माणूस आणखी चिकटून बसायला लागला. खिडकीच्या बाजूला बसलेली असल्यामुळे ती त्या माणसापासून स्वतःला आणखी वेगळं ठवू शकत नव्हती. मी मागच्याच सीटवर बसलेली असल्यामुळे मला तिची अगतिकता लक्षात येत होती. शेवटी न राहवून मीच त्या माणसाला बोलले. मी बोलतेय हे बघितल्यावर त्या महिलेनेही त्या माणसाला बोलायला सुरुवात केली. आमच्या दोघींनाही तो घाबरला उठून पुढे ड्रायव्हरपाशी जाऊन उभा राहिला. तो निघून गेल्यावर हि महिला माझ्याशी बोलू लागली. ' बरं झालं तुम्ही बोललात ते, मी खूप घाबरून गेले होते. कळत नव्हतं काय करायचं ते. पण तुम्ही त्याला बोलताय हे बघून मला ही जर धीर मिळाला. ' वैगरे वैगरे… पण हे खरंय कि अशा प्रसंगांमध्ये महिला घाबरून जातात. बाकीचे प्रवासी काय म्हणतील. बसमध्ये आपल्या ओळखीचं कोणी असेल तर ते काय म्हणतील असा उलटा विचार करतात. त्यामुळे आधी स्वतःसाठी मग प्रवासातील इतर महिलांसाठी अधूनमधून भांडण्याची वेळ येऊ लागली. या रोजच्या असल्या भांडणाचा रोजच्या कामावरही परिणाम होऊ लागला. कोण कुठला माणूस प्रवासात आपल्या शेजारी बसतो आणि त्या थोड्या वेळात ही तो आपल्याशी असभ्य वर्तन करू पाहतो, आपला गैरफायदा घेऊ पाहतो या विचाराने अधिक त्रास होऊ लागला. हा बस प्रवास टाळता येणारा नसल्यामुळे या समस्येला योग्य पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे असं वाटू लागलं आणि बस प्रवास टाळणं म्हणजे या समस्येपासून स्वतःची सुटका करून घेतली तरी अन्य महिलांची त्यातून सुटका नव्हतीच तात्पुरती पळवाट काढण्यापेक्षा काही तरी कायमचा उपाय करण्याची गरज वाटत होती. याच काळात परत कोणां महिलेसाठी परत एकदा बस मध्ये भांडले. पण त्याचा मलाच इतका त्रास झाला कि पुढचा सगळा दिवस उगाच त्रागा करण्यात गेला. ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळेस बसमध्ये त्या महिलेबाबत घडलेला प्रसंग माझ्या अन्य सहकाऱ्यानां सांगत होते. आमच्या संस्थेचे डायरेक्टर यशवंत ठकारही आमच्या बरोबर होते. आपण परिवहन मंडळाच्या अध्यक्षांना भेटून त्यांना या समस्येवर तोडगा काढायला सांगू या असं आमच्या सरांनी बोलून दाखवलं. मी तिथे जाऊन बोलण्यात कोणतीच अडचण वाटत नव्हती फक्त मी माझ्याबाबत बोलू शकत होते इतर महिलांचं काय? माझ्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ते असं घडतंय याचे पुरावे मागतील ते कसे मी त्यांना देऊ शकणार… असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले. आमची संस्था संशोधनाच्या कामात गेले अनेक वर्ष कार्यरत असल्यामुळे संशोधनासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हेक्षणाची कामं आमची संस्था करते. याच सर्व्हेक्षणाच्या कामावरून मला एक गोष्ट सुचली. या समस्येबाबत पुण्यातील महिलांशी बोलावं. म्हणजे समस्येवर एक सर्व्हे करून या समस्येची तीव्रता आकडेवारीच्या रुपात मांडली तर प्रशासनावर त्याचा परिणाम अधिक होऊ शकेल. या कामासाठी आमचं ऑफिस पाठीशी उभं राहिलं. एक प्रश्नावली तयार करून महिलांशी त्यावर चर्चा करायचं ठरलं. ज्या महिला नियमितपणे बस प्रवास करतात अशांशी चर्चा करून त्यांची प्रश्नावली भरून घ्यायची असं ठरलं. तरी यात काही तरी महत्वाचं राहतंय असं वाटतं होतं आणि ते म्हणजे शाळेसाठी, महाविद्यालयीन शिक्षणासाठी रोज बस करणाऱ्या विध्यार्थिनी यांचा सहभाग. त्यांच्याशी स्वतन्त्रपणे चर्चा करण्याचे ठरले. साधारणपणे एक महिनाभर आम्ही पुण्यातील रोज प्रवास करणाऱ्या महिला आणि बसने शाळेत - महाविद्यालयात जाणर्या मुलींशी बोलत होतो. दीड ते दोन हजार महिला आणि मुलींशी याकाळात संवाद साधला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधी हि या समस्येवर न बोलणाऱ्या महिला मोकळेपणाने बोलत होत्या, चांगल्या उपाययोजना सुचवत होत्या. पुणे शहरातील काही शाळा आम्ही सर्व्हेसाठी निवडल्या होत्या. या शाळांमधील मुलींशी संवाद साधण्यासाठी गेले होते. ज्या मुली रोज बस प्रवास करतात त्या सर्वांना एका वर्गात एकत्र केलं होतं. मुलींनी मोकळेपणाने बोलावं यासाठी त्यांच्या शिक्षिका ही तिथे थांबल्या नाही. वर्ग गच्च भरलेला होता चौथी पासून ते दहावी इयत्तेतील विद्यार्थिनी त्या वर्गात एकत्र बसल्या होत्या. यांना बोलतं करण्यासाठी आधी मी मला बस प्रवासात येणारे अनुभव त्यांना सांगू लागले. मी बोलत असतना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे बदलतायत हे ही हळूच टीपत होते. मी एखादं उदाहरण सांगत असताना मुली हळूच आपल्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीकडे बघायच्या जणू काही त्यानाही असा अनुभव आला होता. माझाबोळून झाल्यावर त्यानाही बोलायला सांगितलं. बराच वेळ शांतता होती. पण चुळबुळ सुरु होती. बोलावं कि बोलू नये अशी त्यांची अवस्था लक्षात येत होती. बराच वेळा नंतर एक मुलगी धीर करून बोलू लागली. तिचं बघून अजून एकजण बोलली आणि हळूहळू अनेकजणी बोलत्या झाल्या. बिलकुल वाटल नव्हतं इतक्या मुली मोकळेपणाने बोलल्या. रोजच्या बस प्रवासात या चिमुरड्या मूलीनाही पुरुष प्रवाशांकडून अनेक प्रकारचे वाईट अनुभव आले होते. दप्तराचे ओझे सांभाळत बसच्या गर्दीत चढताना अनेकांच्या हातांनी त्यांच्या शरीराला स्पर्श केला होता. या चिमुरड्या त्या माणसाला बोलणार तरी कशा. चौथी मध्ये जाणारी एक चिमुरडी सांगत होती, ' एकदा बस मध्ये खूप गर्दी होती. मला उशीर झाला होता म्हणून मी त्या बसमध्ये चढले. माल एका काकांनी त्यांच्या मांडीवर बसायला सांगितलं. मी नको म्हणाले त्यांनी खूपच आग्रह केला तरी मी नको म्हणाले. तर त्यांनी माझ्या हाताला धरून मला त्यांच्या मांडीवर बसवलं. त्यांचा हात बाकीच्या कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने माझ्या शरीरावर फिरत होता. मला कसंतरी वाटू लागलं मी त्यांच्या माडीवरून उतारले आणि घाबरून एकदम दारात जाऊन थांबले.' एवढ्याशा छोट्या मुलीलाहि न सोडणारे नराधम मी हि बस प्रवासात बघितले होते. मुलींची एक अडचण होती कि आपण जर हे सगळा घरी सांगितलं तर आई - वडील आपल्यालाच ओरडतील. आपल्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? असं त्यांना वाटतं. पण या सर्व्हेच्या निमित्ताने त्याही बोलत्या झाल्या. त्यांनी सांगितलेले अनुभव केसस्टडी म्हणून वापरले. या सर्व्हेमध्ये नियमित बस प्रवास करणाऱ्या ८८ % मुलीनी या प्रवासादरम्यान आपलं लैंगिक शोषण होतं असं सांगितलं. महिलांचही तेवढंच प्रमाण होतं. सर्व्हेनंतर पुण्यातील असंख्य महिलांचे अनुभव माझ्याजवळ होते. त्यावर आधारित एक अहवाल ही तयार केला. आता या प्रश्नाला वाचा फोडण्याची गरज होती. पुण्यातील पत्रकारसंघाच्या मदतीने याविषयावर एक चर्चासत्र ठेवलं ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या परिवहन मंडळाचे अध्यक्ष अन्य अधिकारी यांना हि बोलावलं, प्रत्यक्ष बस प्रवास करणाऱ्या महिलाही या चर्चेत सहभागी झाल्या. मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, ज्येष्ठ पत्रकार सुजाता देशमुख यादेखील य विषयाची एक वेगळी बाजू - त्याचे परिणाम मांडण्यासाठी चर्चेत सहभागी झाल्या यासगळ्याचा एक चांगला परिणाम साधला गेला. परिवहन मंडळाच्या अध्यक्षांनी या चर्चेतच बसमधील अख्खी एक बाजू महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे घोषित केलं. दुसर्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रात याची दखल घेण्यात आली. हळूहळू यावर पुरुष प्रवाशांकडून उलटसुलट चर्चा होऊ लागली. या सगळ्यामध्ये पुण्यातील महिला संघटनानी हा विषय लावून धरला. महिलाही बोलू लागल्या यासगळ्याचा परिणाम म्हणजे पुणे महानगर पालिकेच्या पी.एम.पी.एल. बस मध्ये महिला प्रवासीसाठी मिळालेले आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी झाला. महिलांना प्रवासात असा अनुभव येऊ नये. त्यानाही बसमध्ये बसायला जागा मिळावी यासाठी हे आरक्षण दिलं गेलं. पुण्यातील सर्व महिलांनी हा विषय लावून धरला. परिणाम पुण्यात आज महिला सुरक्षितपणे बस प्रवास करू शकतात. अगदीच सगळ्याच बस मध्ये हे आरक्षण तंतोतंत पाळल जातंच असं होत नाही. पण महानगरपालिकेने या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतला. या सर्व्हेच्या दरम्यान आलेले खूप सारे अनुभव आहेत जे इथे शब्द संख्येच्या मर्यादेमुळे मांडता आले नाहीत. एखाद्या सामाजिक प्रश्नाला सर्व स्तरावर योग्य पद्धतीने सकारात्मकरीत्या पाठींबा मिळाला तर ती समस्या दूर होण्यासाठी काही न काही चांगली उपाय योजना करता येऊ शकते हे या प्रकारच्या उदाहरणामुळे सिद्ध झालं.

Sunday, April 21, 2013

आभासी दुनियेतून वास्तव जगात….

अभासी दुनियेत न जगता वास्तवाचा विचार करून, वास्तव स्वीकारून जगायला मला माझ्या बाबांनी शिकवलं. मराठी भाषेची विद्यार्थिनी असल्यामुळे आणि एकूणच घरातील वातावरणामुळे सतत पुस्तकांच्या सान्निध्यात असायचे. कथा - कविता - कादंबरी - ललितलेख - वैचरिक लेख जे मिळेल ते वाचून काढायचे. पण फक्त पुस्तकी किंवा कथा - कवितांमधील अभासी जगात रमू नये म्हणून बाबांनी माझ्याबाबत आणि माझ्या भावंडांबाबत जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या. त्यासर्व गोष्टींचा आज आम्हाला माणूस म्हणून जगताना उपयोग होतोय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाची गोष्ट आहे. साधारणपणे बी. ए च्या पहिल्या - दुसऱ्या वर्षाला असेन. तेव्हा यमगरवाडीचा प्रकल्प आकार घेऊ लागला होता. भटक्या विमुक्तांचे आणि विशेष करून पारधी - फासे पारधी जमातीचं संघटन करण्यात बाबांना यश मिळालं होतं. बाबा दिवस - रात्र त्याच विषयात कार्यरत होते. माझी परीक्षा संपून सुट्टी लागली होती आणि एक दिवस बाबांनी मला अचानक सांगितलं , ' तुला काही दिवस फासे - पारध्यांचा पालावर जाऊन राहायचंय. स्वरूपवर्धिनी नावाची संस्था आहे त्यातील महिला कार्यकर्त्या या पालांवर काही दिवस जाऊन पारधी कुटुंबासोबत रहाणार आहेत. तू हि त्यांच्या बरोबर जा आणि काही दिवस राहा.' ज्यांच्या पालांवर जाऊन राहायचं होतं ते सर्वजण माझ्या चांगले परीचायचे होते. घरी अनेक वेळा राहून गेले होते. अडीआडचणी काळात आमचं घर त्यांना कायम उघडं असायचं. पण त्यांच्या पालांवर जाण्याचा हा माझा पाहिलाच अनुभव होता. पारधी कुटुंबाचं आणि विशेष करून पारधी महिलांचं जीवन यानिमित्ताने जवळून अनुभवायला मिळणार होतं ते त्यांच्यासोबत राहून. स्वरूपवर्धिनीच्या वर्षाताई, लताताई, अजून एकजण आणि मी अशा चौघी जणी मगरसांगवी या गावी पोहोचलो. मगरसांगवी हे गाव तुळजापूर आणि सोलापूर यांच्या मध्ये आहे. या गावात…. खरं तर गावात म्हणता येणार नाही, गावाबाहेर गायरानाच्या जागेत पारध्यांची पालं होती. तिथे राहून आम्ही आसपासच्या गावातील पारध्यांच्या पालांवर जाऊ शकत होतो म्हणून मगरसांगवीला आमचा मुक्काम ठरला. इथल्या पालांवर राहणाऱ्या काही बायकांना मी ओळखत होते. नवऱ्याला पोलिसांनी पकडून नेल्यानंतर यातील काहीजणी थेट आमच्या घरी यायच्या. काखोटीला एक मूल आणि सोबत अजून दोन - तीन मुलांना घेऊन त्या यायच्या. कधी बाबा घरात असायचे कधी नसायचे पण त्या प्रत्येक वेळेला आमच्या आईने त्यांना समजून घेतलं. मुलांच्या अंगावर कपडे नाहीत. त्या महिलेच्या अंगावर कित्येक वर्ष न बदलेली साडी असा अवतार असायचा. तिच्या मुलांना माझ्या लहान भावाचे कपडे देणे आणि तिला एखादी साडी देणे, तिची समस्या ऐकून घेऊन योग्य सल्ला देणे. वेळ प्रसंगी वकिलांना फोन करणे अशी सर्व कामं बाबांच्या गैरहजेरीत आई करायची. पारधी महिलांशी अशा प्रसंगामधून माझी ओळख झाली. पण त्यांचं आयुष्य जवळून अनुभवलं ते प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर राहिले तेंव्हा. आम्ही मगरसांगवी गावात पालावर जाण्याआधीच आम्ही तिथे राहणार आहोत हि बातमी गावात पसरली होती. गावात पोलिस पाटीलाचं बऱ्यापैकी मोठं घर होतं. ' तुम्ही पालावर कशाला राहता. तुमची सोय आम्ही गावात करतो. तुम्ही गावात राहा. ' असं आम्ही तिथे पोहोचल्यावर त्या पोलिस पाटीलांनी आम्हाला सांगितलं होतं. अर्थातच आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे पालांवरचं गेलो. आम्ही तिथे राहून आपल्याला काय काय करायचंय त्या कामाची एक चौकट केली होती. पण प्रत्यक्षातील परिस्थिती, काही आधी पासून मनात गृहीत धरलेल्या गोष्टी यामुळे त्यातील बऱ्याच गोष्टी गुंडाळून ठेवाव्या लागल्या आणि समोर येणाऱ्या अनुभवावरून नव्याने मांडणी करावी लागली. या सगळ्या प्रयोगामागचं एक महत्वाचं कारण होतं ते पारधी कुटुंबाची आणि विशेषतः महिलांची जीवनशैली, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या महिलांसाठी काय करता येऊ शकतं याबाबत विचार करणं. पारधी कुटुंबं मोठ्या प्रयत्नातून संघटीत झाली होती पण यांच्या मागे भटकण्याचा - गुन्हेगारीचा लावलेला शिक्का मिटवून टाकण्यासाठी त्यांच्यासाठी काही ठोस प्रयत्न करण्याची गरज होती. त्याची हि सुरुवातच होती असं म्हणता येईल. इथे आल्यावर अगदी त्यांच्या पद्धतीने राहणं शक्य नव्हतं हे लगेच लक्षात आलं. पारधी बायका आणि मुलं हे घरोघरी मागून आणल्या नंतर जेवतात. धन्याचा एक कण नाही तिथे चूल पेटणारचं कशी? त्यामुळे मागून आणल्याशिवाय त्यांचं जेवण होत नाही. लहान मुलांना मागायला पाठवलं कि त्यांच्यावर कीव करून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून काही न काही मिळतं हे माहित असल्यामुळे मागून आणायचं काम हे त्या कुटुंबातील लहानमुलांकडे असतं. पुढे यमगरवाडीला पारधी आणि भटके-विमुक्त समाजातील मुलांसाठी निवासी शाळा सुरु झाल्यावर अनेक पालक आपल्या मुलांना पाठवायला तयार नव्हते कारण मुलं निवासी शाळेत गेल्यावर मागून कोण आणणार? बाकीच्यांना जेवायला कसं मिळणार आणि मुलांनाही तीच सवय असल्यामुळे शिजवलेलं चांगलं-चुंगलं त्यांना आवडायचं नाही. त्यांना शीळं अन्न आणि मागून आणलेलं अन्नच आवडायचं. त्यांची हि सवय मोडायची असेल तर पहिल्यांदा त्याच्या जवळ शिजवण्यासाठी धन्य असलं पाहिजे आणि धान्य आणायचं म्हणजे पैसा आणि पैसा हवा असेल असेल तर हाताला काम असलं पाहिजे असं सगळं चक्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि हे वाटतं तितकं सोप्पं नव्हतं. अचानकपणे हे सगळे बदल घडवणे सोप्पं काम नाही हे जाणवलं. रोज संध्याकाळी सगळी कामं आवरली कि आम्ही पालांवरच्या सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांच्याशी गप्पा मारायचो. त्यांना काही शिकवायला आलोय असा अविर्भाव त्यात नव्हता खरतरं नकळतपणे त्यांच्याकडून आम्हीच शिकत होतो. लहान वयात होणारे लग्न, नवऱ्या मुलाकडून मुलीच्या आई वडिलांना मिळणारा हुंडा आणि यातून प्रसंगी मुलींना पैशांसाठी विकण्याची वाढलेली प्रवृत्ती, नवऱ्याला चोरी- दरोड्याच्या आरोपाखाली अटक झाल्यावर त्याला सोडवण्यासाठी करावी लागणारी प्रयत्नांची शर्थ, प्रसंगी पोलिसांकडून होणारे शारीरिक आत्याचार आणि हे सगळं सहन करूनही याच महिलांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना उकळत्या तेलात हात घालून द्यावी लागणारी अग्नी परीक्षा या आणि याहून अनेक गोष्टी या महिलांशी बोलताना समजत गेल्या. यातील काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवयला मिळाल्या. यातील कोणत्याही समस्येला सहजपणे हात घालता येईल अशा नव्हत्या. महिलांना मिळणारी जनावरासारखी वागणूक आणि तरीही खचून न जाता मोठ्या कणखरपणे आपल्या विस्कटलेल्या कुटुंबाला उभं करण्यासाठी जीवापाड झटणारी पारधी बाई एखाद्या लढवैय्या सारखी वाटू लागली. आपल्या आजुबाजूला विलक्षण असं काहीतरी घडतंय आणि आपण काहीच करू शकत नाही असे हे दिवस होते. त्या महिलांसोबत राहून, त्यांच्या समस्या बघून अस्वस्थता आणखीनच वाढली. शहरी आणि सुरक्षित वातावरणात राहिल्यामुळे - वाढल्यामुळे त्यांच्यातील अंधश्रद्धा आणि रूढी -परंपरांची चीड येऊ लागली. त्यासगळ्यांचे संदर्भ समजून घेण्याचं ते वयही नव्हतं. कदाचित माझीच आकलन शक्ती कमी पडली असेल. यानिमित्ताने बाबांचं काम किती अवघड आहे हे समजलं. या मुक्कामामुळे बाबांच्या कामातील अडचणी समजून घेता आल्याच पण समाजातील अगदी सर्वात शेवटचा घटक म्हणता येईल अशा पारधी समाजातील महिला आणि त्याचं जीवन, समस्या जवळून अनुभवता आल्यामुळे पुढच्या आयुष्यात अन्य समाजातील महिलांच्या समस्या समजून घेणे, त्याचे अर्थ लावणे थोडे सोप्पे गेले. मला वाढण्यासाठी हा अनुभव खूप वेगळा आणि महत्वाचा होता.

Wednesday, April 17, 2013

बदलत्या नात्यांचे विश्व…


कारगील युद्धानंतर एका वेगळ्या समाज रचनेचं अंतरंग समजून घेण्याची संधी मिळाली. लष्करात भरती झालेले जवान- त्यांचे कुटुंबीय, सैनिक कल्याण बोर्डसारखी रचना, सैनिकांच्या वसाहती, प्रत्येकाच्या हुद्द्या प्रमाणे त्यांना मिळणारा मान- त्यांना मिळणाऱ्या सवलती अशा अनेक गोष्टी समजत गेल्या आणि हे आणखी एक वेगळं विश्व आहे याची खात्री पटली. कारगील युद्ध झालं आणि अनेक बातम्यांमध्ये एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. शहीद झालेल्या जवानांमध्ये नुकतेच लग्न झालेल्या जवानांची सर्वाधिक संख्या होती. म्हणजेच तरूण विधवांचीही संख्या अधिक असणार हे आलंच. त्यानंतर काही दिवसातच भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून या युद्ध विधवांच्या एकूण स्थितीवर सर्व्हेक्षण करून एक अहवाल तयार करून देण्याचं काम आमच्या संस्थेकडे आले. पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश - उत्तरांचल, राजस्थान, आणि कर्नाटक या पाच राज्यातील युद्ध विधवांच्या सद्य स्थितीवर अहवाल बनवून देण्याचं काम होतं. यात फक्त कारगील युद्धानंतरच्या विधवांना भेटायचं नव्हतं तर त्या पूर्वी होऊन गेलेल्या भारत - चीन, भारत - पाकिस्तान या युद्धातील विधवांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम होतं. यामध्ये कारगील युद्धामुळे अगदी नुकत्याच विधवा झालेल्या आणि तीस वर्षापूर्वीच्या युद्धांमुळे झालेल्या विधवाअशा दोन वेगवेगळ्या काळातील विधवांच्या सद्यस्थितीचा मागोवा घ्यायचा होता. कारगील युद्ध सुरु झालं मे ते जून महिन्याच्या काळात. त्या आधीचा सगळा काळ हा लग्न सराईच्या दिवसांचा होता. खास लग्नासाठी सुट्टी काढून आलेल्या अनेक जवानांना अचानक कारगील सुरु झाल्यामुळे घाईत लग्न उरकून युद्धासाठी परत जावं लागलं. युद्धात शहीद झालेल्यांमध्ये याच जवानांची संख्या अधिक होती. त्यामुळे या प्रकल्पात तरुण युद्ध विधवांना भेटायला जाणं आणि त्यांच्याशी संवांद साधणं हे मोठ्ठ अवघड काम होतं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. खूप वेळा अस्वस्थ करून सोडणारी परिस्थिती समोर आली. तरुण मुलगा गेलेल्या आईची, नुकताच लग्न झालं आणि आपल्या नवऱ्याशी नीट बोलता हि आलं नाही, त्याचा सहवासही लाभला नाही अशा नव्या नवरीची कहाणी हृदयद्रावक होती तर काही वेळेला दोन्ही बाजूने एकमेकींची (सासूच्या आणि सुनेच्या) फसवणूक झाल्याच्या गोष्टी समोर आल्या. याच काळात शहीद जवानांच्या शवपेट्यांचा घोटाळा उघडकीस आला त्याने फार अश्चर्य वाटलं नाही पण निव्वळ पैशांसाठी शहीद जवानाच्या आई-वडिलांनी नुकत्याच विधवा झालेल्या सुनेचा अतोनात छळ केला आणि काही ठिकाणी या शहीद जवानांच्या बायकांनी सासू -सासऱ्यांचा छळ केला या दोन विरोधाभास असणाऱ्या परिस्थितीला अनुभवून अधिक आश्चर्य वाटलं. हातात आलेला पैसा हे याला एकच कारण होतं. कारगील युद्धानंतर इतक्या वेगवेगळ्या पातळींवरून वेगवेगळ्या पद्धतीची मदत येत होती यात आर्थिक मदतीचा खूप मोठा भाग होता. शहीद जवानाच्या परिवाराला चाळीस लाखाहून अधिक आर्थिक मदत मिळाली आणि इथूनच नात्यांचे रंग बदलू लागले. अमृतसर जवळच्या एका खेड्यात एका युद्धविधवेचं घर शोधत गेलो होतो. भलं मोठं आंगण, ऐसपैस घर, गोठ्यात गायी -म्हशी - बैल, दोन मोठ्ठाले ट्राक्टर एका सधन शेतकऱ्याचं घर आहे हे जाणवत होतं. जिला आम्ही शोधत गेलो होतो तिचं त्या शहीद जवानांबरोबर चार - पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि तिला एक छोटा मुलगाही होता. तिचं नाव सांगताच ती घरातून लगेच बाहेर आली. तिला बघून ती विधवा आहे असं वाटत नव्हतं. त्या वेळेला घरात अन्य कोणी नसल्यामुळे तिच्याशी मोकळेपणाने बोलता आलं.युद्धानंतर तिला जी आर्थिक मदत मिळणार होती त्याचे स्वरूप तिच्या सासरच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपली या सुनेच्या पुनर्विवाहाची तयारी सुरु केली. मिळणारी रक्कम घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून तिचं लग्न तिच्या लहान दिराबरोबर ठरवलं. हा दीर तिच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान. ज्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवलं त्याला नवरा म्हणून स्वीकारणे अवघड होते. हातात सर्व रक्कम येताच काही दिवसातच तिचं लग्न सोळा वर्षांनी लहान असलेल्या दिराबरोबर लावून देण्यात आलं. पैशांमुळे नातीही बदलली. मुला प्रमाणे असलेला दीर आता तिचा नवरा बनला होता. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा तो तिथेच होता. हि नाती समजून घेण्याचं त्याचं वय नाही हे जाणवत होतं. प्रश्न होता तिला या परिस्थितीत कसं वाटतं याचा. ' मी तशीही एकटी कुठे गेले असते? माहेरी जाण्यासारखी परिस्थिती नाही. किमान अशा परिस्थितीत इथे मी सुरक्षित राहू शकते. मला समजून घेणारी व्यक्ती आज या जगात नाहीये पण मी आता या लोकांची परिस्थिती समजून घायला हवी न ! मालमत्तेची वाटणी नको म्हणून मी हा पर्याय निवडला आणि या लग्नाला तयार झाले. वाईट या एकाच गोष्टीचा वाटतंय कि माझ्या दिराला बायको म्हणून कोणी चांगली मुलगी मिळाली असती पण परिस्थितीमुळे त्याला माझा स्वीकार करावा लागला. आमच्यामध्ये नवरा-बायकोचं नातं तयार होणं अवघड आहे.' तिच्यातील समंजसपणा बघून मी थक्क झाले. परिस्थिती माणसाला काय - काय करायला भाग पाडते याचं हे बोलका उदाहरण होतं. वाद- क्लेष होऊ नयेत, परिवार तुटू नये आणि आपल्या मुलाचं भविष्य बघून ती त्याच घरात त्या घरतल्या लोकांच्या सुखासाठी राहिली आणि हा निर्णय घेताना तिला तिच्या लहान दिराबद्दल ही वाईट वाटत होतं हे हि महत्वाचं ना ! हे उदहरण पाठीशी घेऊन मी बाहेर पडलेखूप दिवस हि गोष्ट, ती युद्ध विधवा आणि तिचा छोटा दीर डोळ्या समोरून जात नव्हते. बदलती नाती आणि त्यातील गहिऱ्या छटा विचार करायला भाग पडत होत्या. काही दिवसातच धक्का देणारा आणखी एक अनुभव या परवासात मिळाला. पश्चिम बंगालमधील दर्जिलिग हे गाव जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पण बंगालमध्ये घरटी एका माणसाहून अधिक व्यक्ती लष्करामध्ये असणारे हे एकमेव गाव आहे. दार्जिलिंगजवळ एका खेड्यातील हि घटना आहे. युद्ध विधवेचं नाव विचारत तिच्या घरी पोहोचलो. तर ती तिथे राहत नसल्याचं समजलं. त्या घरात फक्त वृद्ध सासू एकटीच असल्याचं दिसत होतं. कोणाचाही सोबत नाही. एकुलता एक मुलगा शहीद झालेला अशा परिस्थितीत तिच्याशी बोलणं म्हणजे तिला त्रास देण्यासारखाच वाटू लागलं. तिची सून कुठे आहे असं विचारल्यावर ती अशी काही चिडली कि तिला शांत करणं हे एक काम होऊन बसलं. पण तिच्या त्या बडबडीने सगळी सत्य परिस्थिती समोर आली. मुलगा सुट्टीला आला म्हणून त्याचं जमवून ठेवलेलं लग्न लावलं होतं. पै-पै करून जोडलेले पैसे त्याच्या लग्नात खर्च केले. लग्नाला पंधरा दिवसा नाही होत कि मुलाला युद्धासाठी लगेच परत जावं लागलं आणि त्यातच तो शहीद झाला. त्यानंतर आलेली सगळी रक्कम घेऊन सून जी पसार झाली ती त्यानंतर घरी परत आली नाही. तिच्या माहेरच्या लोकांचाही काही पत्ता नाही. ते हि त्यांचं रहात घर सोडून कुठे निघून गेले हे समजलं नाही. आज हि म्हातारी आई निराधार झालीय. स्वतःचं घर आहे म्हणून तेवढा तरी तिला आसरा आहे. तिचा नात्यांवरचा विश्वास उडालाय हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतं. मन सुन्न करणाऱ्या आठवणी या प्रकल्पानंतर साठून राहिल्या. त्या आमच्या अहवालाचा भाग नसल्या तरी त्या विसरता येणार नाहीत अशा आहेत. पैशांमुळे - पैशांपुढे नात्यांना काही अर्थ नाही का? गेलेल्या नवऱ्याच्या, पोटच्या गेलेल्या मुलाच्या दुख्खापेक्षा पैसा मोठा होऊन बसला. आपल्याला त्या शहीद झालेल्या जवनाबद्द्ल वाटतं तेवढं त्याच्या कुटुंबियांनाही वाटतं नाही हे प्रत्यक्ष बघायला मिळालं. नात्यांचे बदलते रंग ओळखायला लावणारा धडा यातून नक्कीच शिकायला मिळाला.

जंगलच्या राण्यांची शोकांतिका...


ती वयाच्या बाराव्या - तेराव्या वर्षी घराबाहेर पडते. घरातील दारिद्र्य - उपासमार हे कारण आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे कारण म्हणजे तिला बाहेरचं जग खुणावतं. जळजळीत वास्तवात जगणाऱ्या या मुलींना बाहेर पडून वेगळ्या जगात जगण्याची आस तयार होते आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता एवढ्याशा लहान वयात ती घरातून बाहेर पडते. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. खरं तिचं हे वय शिक्षण घेण्याचं पण तिला खुणावतात झगमगाट असलेली मोठी शहरे. दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर, मुंबई, गोवा या अशा शहरांमध्ये ती कशी आणि कधी येउन पोहोचते ते तिच तिलाच कळत नाही. ती एकटीच नसते तिच्यासारख्या अनेकजणी याच पद्धतीने - याच मार्गाने आलेल्या असतात. हे उदाहरण आहे झारखंड - छत्तीसगढ आणि ओरिसा मधून पळून जाणाऱ्या मुलींचं. दिल्लीसारख्या शहरात या राज्यातील अनेक अल्पवयीन मुली घरा -घरांमधून दिसतात. घरकाम करण्यासाठी या मुलींना ठेवलं जातं. घरकामासाठी या मुली सहजपणे मिळाव्यात यासाठी दिल्लीमध्ये ब्युरो ऑफिसची भली मोठी बाजारपेठच आहे. हि बाजारपेठ आणि इथली ब्युरो ऑफिस बघितल्यावर आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही. भाजी -पाला विकत घ्यायला जावं तसं इथे या बाजारपेठेत मुलीना घरकामासाठी आणायला दिल्लीतील प्रतिष्ठित घरातील व्यक्ती येत असतात. . साधारणपणे सहा -सात वर्षांपूर्वी एका संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने या मुलीना भेटण्याची, त्यांच्या व्यथा जाणून घेण्याची संधी मिळाली. एक वर्षभर वारंवार झारखंड- छत्तीसगढ-ओरिसा या राज्यांमध्ये या संशोधन प्रकल्पासाठी प्रवास होत होता.एका आगळ्या-वेगळ्या व्यवस्थेची यामुळे ओळख झाली. या तीन राज्यांमधून अचानकपणे गायब होणाऱ्या मुलींचीं संख्या खूप मोठी आहे. वृत्तपत्रांमधून येणारी आकडेवारी कायम लक्ष वेधून घेत असते. शाळेत शिकणाऱ्या मुली अचानकपणे गायब होतात - हि मोठी आश्चर्याची आणि चिंतेची बाब आहे. या राज्यांमधून रोजगाराच्या शोधत अनेक पुरुष परराज्यांध्ये 'पलायन' करत असतात. गावच्या गावं ओस पडलेली दिसतात. पण गेल्या पंचवीस तीस वर्षात या भागातील मुलीदेखील 'पलायन' करू लागल्या आहेत. आपल्या छोट्याशा गावात राहण्यापेक्षा दिल्ली - मुंबई सारख्या मोठ्या शहरात मोलकरीण म्हणून काम करणं त्यांना जास्त आवडत. ना शिक्षण, ना समज असणारं वय अशा अवस्थेत त्या दिल्लीत येऊन पोहचतात आणि व्यवस्थेच्या बळी ठरतात. आपल्या देशात बालकामगार विरोधात कायदा आहे. पण दिल्ली सारख्या देशाची राजधानी असलेल्या शहरातच या कायद्याची उघडपणे पायमल्ली होताना दिसते. कायदे कोणासाठी आहेत? असा प्रश्न पडतो. बालकामगार ठेवणं हा गुन्हा असला तरी अनेक घरात घरकामासाठी या अल्पवयीन मुलीच हव्या असतात. घरातील एक कोपरा या मुलीना देतात. वर्षानुवर्षे एकाच घरात राहून काम करणाऱ्या अनेकजणी इथे सापडतात. घरकामासाठी एखादी महिला त्यांना नको असते. अगदी त्या घरातील मालकीण देखील महिला नको एखादी मुलगीच द्या अशी मागणी करत असते. घरकामासाठी चोवीसतास घरात राहणारी महिला नको असते. उद्या काही विपरीत घडायला नको, महिलेची जबाबदारी घेण्यापेक्षा लहान मुलगी ठेवली म्हणजे तिला धाक दाखवून ओरडून - प्रसंगी मारून तिच्याकडून काम करून घेता येतं असा या मालकिणींना वाटत असतं. जे एखाद्या महिलेच्या बाबत घडू शकत ते या छोट्या मुलीच्या बाबत घडणे थोडेच राहते. उलट लहान मुलीला घाबरवून धमकावून तिच्यावर वाट्टेल तसे अत्याचार होत असतात. त्या घरातील पुरुषही या मुलींचा गैरफायदा घेतात. अगदी सरसकट सगळीकडे हेच चित्र आहे असं म्हणता येणार नाही पण जी उदाहरणं आत्तापर्यंत समोर आली आहेत त्यामुळे याची दुसरी बाजू उघड झाली आहे. ब्युरो ऑफिसकडून फसवणूक या तीन राज्यांमधून मुलींना दिल्लीला आणण्यासाठी ब्युरो ऑफिसने त्या त्या भागात खास एजंट नेमले आहेत. मुलींना फूस लावून दिल्लीला घेऊन यायचं काम हे एजंट करतात. त्याचा मोबदला म्हणून त्यांना प्रत्येक मुलीमागे काही कमिशन मिळत असतं. याशिवाय गावातून आधी दिल्लीला गेलेली एखादी मुलगी देखील एजंटचे काम करते. ती गावातील आपल्या मैत्रीणीना प्रलोभनं दाखवून दिल्लीला घेऊन जाते तिलाही त्याबद्दल कमिशन मिळतं. ज्या प्रमाणे लग्न जुळवणाऱ्या संस्थामध्ये वधू-वराची फोटो सहित माहिती दिलेली असते त्याच पद्धतीने हि ब्युरो ऑफिसेस या मुलींच्या फोटोसहित माहितीचा अल्बम तयार करतात. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला हा अल्बम दाखवला जातो. मुलीचा फोटो-माहिती बघूनच मुलगी घरी कामासाठी घेऊन जातात. ब्युरो ऑफिसवाले यातून रग्गड पैसे कमवतात. प्रत्येक मुलीमागे त्यांना दोन-तीन महिन्यांचा पगार मिळत असतो. काही ब्युरोवाले मुलींच्या हातात पगार पडू देत नाहीत. त्या घरमालकीणीला मुलीचा पगार ब्युरो ऑफिस मध्ये जमा करायला लावतात. मुलगी कधी सुट्टीसाठी घरी जाणार असेल तर तिला पैसे मिळतात. यामुळे त्यामुलीला माहितच नसतं कि आपल्याला नेमका पगार किती मिळतो? एकप्रकारे तिची फसवणूक होत असते. एक मोठ्ठ राकेट पद्धतशीरपणे कार्यरत आहे. यामध्ये बहुसंख्य मुली आपल्या पालकांना न सांगताच पळून जातात. तर काही प्रमाणात पालकच आपल्या मुलीना पाठवतात. घरात चूल पेटण्याचा प्रश्न असतो. खरा प्रश्न हा आहे कि या मुलींचं भवितव्य काय? मुलींचं भवितव्य अधांतरी शिक्षण अर्धवट सोडून दिल्यामुळे नीट लिहिता - वाचता येतं नाही, व्यवहार ज्ञान नाही. दिल्लीसारख्या ठिकाणी आल्यावर कोणावर विश्वास ठेवावा आणि ठेवू नये हे समजत नाही. यातून बऱ्याच जणींची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक होत असते. वर्षातून काही दिवस सुट्टी घेऊन या मुली घरी येतात ती वेळ गाठून यातील काही मुलींना त्यांच्या गावी -त्यांच्या घरी गाठलं होतं. काही मुली शहरातल्या वातावरणात राहायला सरावल्या आहेत असं जाणवलं. दिल्लीतील मोठमोठ्या बंगल्यात राहून आल्यावर गावात वीज - पाणीची सोय नसलेल्या घरात राहणे त्यांना आवडत नाही. मुलगी पैसे कमवून आणते म्हणून तिला घरात एकप्रकारचा मान हि असतो. पण तो जो वर पैसे मिळतात तो वरच असतो. गावात या मुलीना 'दिल्ली रिटर्न' असं म्हणून हेटाळलं जातं. साधारणपणे वयाच्या बाराव्या ते तेराव्या वर्षापासून ते पस्तीशी-चाळीशी पर्यंत दिल्लीमध्ये काम मिळतं. पस्तीशी नंतरच्या महिलांना इथे काम मिळत नाही. चाळीशी नंतर येणारी आजारपणं, त्यासाठी करावे लागणारे औषधपाणी नको असते. म्हणजेच त्या महिलेवर कोणताही खर्च करायची मानसिकता नसते. जवळ-जवळ पस्तीशी नंतर या सर्वजणींना आपल्या गावी परतण्या वाचून पर्याय नसतो. एक तर या दिल्ली मध्ये राहून काम करतात म्हणून यांच्याशी लग्न करायला कोणीही तयार नसतं आणि पस्तीशी नंतर गावी परतल्यावर लग्नाचं वयही राहत नाही. इथल्या अनेक गावांमध्ये अशा अनेक अविवाहित महिला आढळून येतात. आयुष्यातील महत्वाची वर्ष अति श्रम करण्यात जातात आणि जेव्हा स्वतः साठी म्हणून जगायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचा बरोबर कोणी नसतं. कमवत नाही म्हणून घरातील अन्य व्यक्ती हि पाठ फिरवतात. हि या मुलींची शोकांतिका आहे. आपली समाजव्यवस्था एकप्रकारे या परिस्थितीला कारणीभूत आहे. बालकामगार विरोधी कायदा असून हि अनेक घरात अल्पवयीन मुलींना कामाला ठेवलं जातं. याच वयातील मुली पाहिजे असा आग्रह धरला जातो आणि याच मागणीमुळे आज झारखंड -छत्तीसगढ आणि ओरिसा सारख्या राज्यांमधून दररोज असंख्य मुलींना फसवून आणलं जातं. जेव्हा हि आपल्या सारख्या सुसंस्कृत घरातून मागणी होणार नाही तेव्हा आपोआप हा गैर व्यवहार थांबेल आणि मुली देखील एक सुखी जीवन जगू शकतील. गरज आहे त्यांचं किमान दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून देण्याची, त्यांना त्यांच्याच राज्यात रोजगार मिळवून देण्याची. हि मागणी आत्ता तरी फक्त घरकामगार म्हणून असली तरी उद्या समजा हीच मागणी देहविक्रय करण्याकडे वळली तर या मुली कोणत्या मार्गाला आणि कोणत्या जगात असतील याची कल्पना करवत नाही. म्हणूनच या व्यवहाराला वेळीच लगाम घातला गेला पाहिजे. कायद्याचा आधार घेऊन कडक कारवाई झाली पाहिजे हीच तळमळीची इच्छा !

'ती' चं जग...

कधी अचानकपणे कोणी तरी आपल्याला शिकवून जातं. न विसरता येणारं. अशी माणसं आपल्याला कायम भेटली पाहिजेत असं मला वाटतं . या वेळेस मात्र मला एक बारा- तेरा वर्षाची मुलगी शिकवून गेली. तिचं बोलणं आजही आठवतंय. आजच्या पिढीला नावं ठेवणारे अनेक आपल्या आजूबाजूला दिसतात. पण नावं ठेवण्याइतके सगळेचजण बिघडलेत अशी परिस्थिती नाहीये. या पिढीतही चांगल्या - वाईटाची जाणीव असलेले काहीजण आहेत. त्यातलंच हे उदाहरण. गोव्यात लोखंडाच्या खाणी असलेल्या गावांमध्ये 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट प्लानिंग अन्ड रिसर्च' या संस्थेच्या माध्यमातून तिथल्या ग्रामस्थांसाठी, महिलांसाठी आणि शालेय विद्यार्थी- किशोरवयीन मुलींसाठी विविध प्रकल्प राबवले जातात. यातील किशोरवयीन मुलींच्या गटप्रमुख मुलींचा अभ्यासवर्ग होता. साधारणपणे दहा -बारा वर्षाच्या मुलींपासून ते पंधरा -सोळा वर्षाच्या मुलींचे गट तिथल्या गावांमध्ये आमच्या समन्वयकांनी तयार करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोगयाची काळजी असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. या अशाच गटातील त्याच वयोगटातील गटप्रमुख मुलींचा हा अभ्यास वर्ग होता. त्यातील एक सत्र या गटप्रमुख मुलींना येणाऱ्या अडचणींवर होतं. सुरुवातीला कोणीच बोलायला तयार नव्हतं. एक एक करून हळूहळू काहीजणी बोलायल्या लागल्या. त्यात एक बारा -तेरा वर्षाची मुलगी होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवत होता. तिने आधी बाकीच्या मुली काय बोलतायत हे ऐकलं आणि मग सर्वात शेवटी आपलं म्हणणं मांडल. बोलायला सुरुवात करताना पहिल्यांदा तिने आम्हालाच प्रश्न, ' किशोरी विकास प्रकल्प' फक्त मुलींसाठीच का?.... मान्य आहे कि आमचा विकास व्हावा, गावातल्या आम्ही सगळ्याजणींनी एकत्र येउन काही चांगले उपक्रम करावेत हा उद्देश आहे आणि आम्हाला याचा खूप उपयोगही होतोय. पण हा फक्त आमच्यासाठी नको. तो मुलांसाठीही असला पाहिजे.' आम्हाला अपेक्षित नव्हतं कि यांच्यातलीच कोणी चिमुरडी असं काही बोलू शकेल. तिचा मुद्दा विचार करायला लावणारा होता. मुलगी वयात आली कि घरी - दारी सगळेजण तिला तिने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तिने स्वतःला कसं जपलं पाहिजे इ . इ सांगत असतात. अनेकांचा तिच्यावर पहारा असतो. ती कुठे जाते- येते, तिचे मित्र-मैत्रीणी कोण आहेत.... याकडे लक्ष दिले जाते. हेच मुलगा वयात आल्यावर होतं का? मुलगी वयात आल्यावर तिच्यामध्ये आणि आई मध्ये नकळतपणे एक मैत्रीचं, एकमेकींची काळजी घेणारं नातं तयार होतं. पण मुलगा वयात आला कि तसं घडत का? कित्ती आया आपल्या वयात आलेल्या मुलांना समजावून सांगतात. किती वडील आपल्या वयात आलेल्या मुलाला त्याने कसे वागले पाहिजे विशेषतः मैत्रिणींशी..हे सांगतात? मुलींना मात्र मित्रांशी वागताना एक विशिष्ट अंतर ठेवून वागलं पाहिजे अस सांगितलं जातं. भविष्यात येऊ शकणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली जाते. इथे मुलींनाच का? आणि मुलांना का नाही.. हा प्रश्न नाहीये. इथे जडण -घडण कोणाची कशी होतेय हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आज आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघितल्या कि मुला - मुलीना वाढवताना होणारा भेद प्रकर्षाने जाणवतो आणि कदाचित त्यातूनच आज ज्या समस्यांचा भडका उडलेला दिसतोय. मुलीं इतकीच मुलांचीही जबाबदारीने वागायची गरज आहे. मागे काही वर्षान पूर्वी पुण्यातील बस प्रवासात महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयावर भरपूर महिलांशी - मुलींशी बोलत होते. सवयीप्रमाणे घरात त्यावर आम्हा सर्वांची चर्चा व्हायची. पण त्या वेळेस पहिल्यांदा असं वाटला कि आपण बायकांशी बोलतोय तर पुरुषांशीही बोललं पाहिजे त्याची सुरुवात घरातूनच केली. माझ्या पाठच्या दोन भावंडांपासून. ते बस प्रवासात कसे वागतात? एखादी महिला शेजारी बसली असेल तर त्यांचा वर्तन कसं असतं अशा अनेक प्रश्नांवर त्यांच्याशी बोलले होते. या पद्धतीचा बोलणं हि आवश्यक असतं हे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं. ज्या पद्धतीने आमची चर्चा झाली त्यानंतर महिलांनाही बस मध्ये आरक्षण दिले पाहिजे याबाबत माझ्या भावंडांचही सकारात्मक मत तयार झालं. मिटिंग मध्ये बोलून गेलेल्या त्या चिमुरडीचं म्हणणंही हेच होतं कि आमच्या इतकीच आता मुलांनाही बरे -वाईट काय आहे हे सांगण्याची सध्या गरज आहे. तो कसा हि वागला तरी काय फरक नाही पडणार. फरक पडायला तो थोडाच मुलगी आहे.. असा विचार करून आपण आपल्या मुलाचं भविष्य बिघडवून ठेवतोय. या आशाच विचारांमुळे मुलांमध्ये टोकाची कृती करण्याची वृत्ती वाढली आहे. १८ वर्षाच्या आतील वयाचा मुलगा २३ वर्षाच्या मुलीवर अतिशय पाशवी पद्धतीने बलत्कार करतो आणि आपल्या अन्य मित्रांनाही तिच्यावर बलात्कार करायला चिथावणी देतो हि कसली लक्षणं आहेत? हे कसलं धाडस आहे. आजच्या पिढीत रुजू पाहणाऱ्या पौरुषत्वच्या विचित्र कल्पना वेळीच बदलायला हव्यात. खरच मुलांसाठीही किशोर विकास प्रकल्प हि काळाची गरज आहे. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर अनेकांनी अनेक वक्तव्य केली. काहींनी मुलीनांच सल्ले दिले. त्यातील काही सल्ले तर अतिशय विचित्र होते. जवळ एखादं हत्यार बाळगावं, कोणी त्रास देऊ लागलं तर त्या वेळी हे उपयोगी पडेल. मिरची पूड, पिपर स्प्रे जवळ बाळगावा. त्रास देणाऱ्याला मारा पण जीवे मारू नका. जखमी करा असले काही जणांनी सल्ले दिले. म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतःच करा. आम्ही काही करू शकत नाही. आणि परत हे सगळे सल्ले फक्त मुलीनांच. गुन्हा करणारा कोणी दुसराच पण त्याची शिक्षा कोणा दुसऱ्याला. अजब मानसिकता आहे आपल्या समाजाची. या समस्यांचं मूळ आपल्या घरात आहे. आपली मानसिकता बदलण्यापासून. घरातील मुलगी -मुलगा यांना समान पातळीवर वाढवण्याची. दोघानांही आपापल्या जबाबदारींची जाणीव करून देण्याची. मध्यंतरी एक मैत्रीण भेटली. ती तिच्या मुलाबद्दल बोलत होती. ' मुलगी असती तर बरं झालं असतं! मुलाला वाढवणं अवघड होऊन बसलंय. समाजात वावरताना त्याने एक चांगली व्यक्ती म्हणून वावरल पाहिजे. माणूसपण जपलं पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडून…' असं ती बोलून गेली. तिच्या बोलण्यात एक प्रकारची काळजी, तळमळ जाणवत होती जी सहसा मुलग्यांच्या आयांमध्ये दिसत नाही. मुलगी म्हणजे संपूर्ण घराची अब्रू त्यामुळे मुलगी म्हणजे जोखीम अशी काहीशी विचारसरणी बाळगणारे उजळ माथ्याने समाजात वावरतात. पण हीच जोखीम मुलाच्याबाबत असू शकत नाही का? हे कसं विसरतात. एका छोट्या मुलीने आम्हा सर्वांची विचार करण्याची पद्धत बदलवली. ती स्वतः जे अनुभवत आहे तेच तिच्या बोलण्यात व्यक्त झालं. पण तिच्यामुळे आमची काम करण्याची पद्धतही आम्हाला बदलावी लागली. अशा अनेक मुली आपल्या आजुबाजूला आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे आणलं पहिजे.