Sunday, April 21, 2013

आभासी दुनियेतून वास्तव जगात….

अभासी दुनियेत न जगता वास्तवाचा विचार करून, वास्तव स्वीकारून जगायला मला माझ्या बाबांनी शिकवलं. मराठी भाषेची विद्यार्थिनी असल्यामुळे आणि एकूणच घरातील वातावरणामुळे सतत पुस्तकांच्या सान्निध्यात असायचे. कथा - कविता - कादंबरी - ललितलेख - वैचरिक लेख जे मिळेल ते वाचून काढायचे. पण फक्त पुस्तकी किंवा कथा - कवितांमधील अभासी जगात रमू नये म्हणून बाबांनी माझ्याबाबत आणि माझ्या भावंडांबाबत जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या. त्यासर्व गोष्टींचा आज आम्हाला माणूस म्हणून जगताना उपयोग होतोय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाची गोष्ट आहे. साधारणपणे बी. ए च्या पहिल्या - दुसऱ्या वर्षाला असेन. तेव्हा यमगरवाडीचा प्रकल्प आकार घेऊ लागला होता. भटक्या विमुक्तांचे आणि विशेष करून पारधी - फासे पारधी जमातीचं संघटन करण्यात बाबांना यश मिळालं होतं. बाबा दिवस - रात्र त्याच विषयात कार्यरत होते. माझी परीक्षा संपून सुट्टी लागली होती आणि एक दिवस बाबांनी मला अचानक सांगितलं , ' तुला काही दिवस फासे - पारध्यांचा पालावर जाऊन राहायचंय. स्वरूपवर्धिनी नावाची संस्था आहे त्यातील महिला कार्यकर्त्या या पालांवर काही दिवस जाऊन पारधी कुटुंबासोबत रहाणार आहेत. तू हि त्यांच्या बरोबर जा आणि काही दिवस राहा.' ज्यांच्या पालांवर जाऊन राहायचं होतं ते सर्वजण माझ्या चांगले परीचायचे होते. घरी अनेक वेळा राहून गेले होते. अडीआडचणी काळात आमचं घर त्यांना कायम उघडं असायचं. पण त्यांच्या पालांवर जाण्याचा हा माझा पाहिलाच अनुभव होता. पारधी कुटुंबाचं आणि विशेष करून पारधी महिलांचं जीवन यानिमित्ताने जवळून अनुभवायला मिळणार होतं ते त्यांच्यासोबत राहून. स्वरूपवर्धिनीच्या वर्षाताई, लताताई, अजून एकजण आणि मी अशा चौघी जणी मगरसांगवी या गावी पोहोचलो. मगरसांगवी हे गाव तुळजापूर आणि सोलापूर यांच्या मध्ये आहे. या गावात…. खरं तर गावात म्हणता येणार नाही, गावाबाहेर गायरानाच्या जागेत पारध्यांची पालं होती. तिथे राहून आम्ही आसपासच्या गावातील पारध्यांच्या पालांवर जाऊ शकत होतो म्हणून मगरसांगवीला आमचा मुक्काम ठरला. इथल्या पालांवर राहणाऱ्या काही बायकांना मी ओळखत होते. नवऱ्याला पोलिसांनी पकडून नेल्यानंतर यातील काहीजणी थेट आमच्या घरी यायच्या. काखोटीला एक मूल आणि सोबत अजून दोन - तीन मुलांना घेऊन त्या यायच्या. कधी बाबा घरात असायचे कधी नसायचे पण त्या प्रत्येक वेळेला आमच्या आईने त्यांना समजून घेतलं. मुलांच्या अंगावर कपडे नाहीत. त्या महिलेच्या अंगावर कित्येक वर्ष न बदलेली साडी असा अवतार असायचा. तिच्या मुलांना माझ्या लहान भावाचे कपडे देणे आणि तिला एखादी साडी देणे, तिची समस्या ऐकून घेऊन योग्य सल्ला देणे. वेळ प्रसंगी वकिलांना फोन करणे अशी सर्व कामं बाबांच्या गैरहजेरीत आई करायची. पारधी महिलांशी अशा प्रसंगामधून माझी ओळख झाली. पण त्यांचं आयुष्य जवळून अनुभवलं ते प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर राहिले तेंव्हा. आम्ही मगरसांगवी गावात पालावर जाण्याआधीच आम्ही तिथे राहणार आहोत हि बातमी गावात पसरली होती. गावात पोलिस पाटीलाचं बऱ्यापैकी मोठं घर होतं. ' तुम्ही पालावर कशाला राहता. तुमची सोय आम्ही गावात करतो. तुम्ही गावात राहा. ' असं आम्ही तिथे पोहोचल्यावर त्या पोलिस पाटीलांनी आम्हाला सांगितलं होतं. अर्थातच आम्ही तसं काही केलं नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे पालांवरचं गेलो. आम्ही तिथे राहून आपल्याला काय काय करायचंय त्या कामाची एक चौकट केली होती. पण प्रत्यक्षातील परिस्थिती, काही आधी पासून मनात गृहीत धरलेल्या गोष्टी यामुळे त्यातील बऱ्याच गोष्टी गुंडाळून ठेवाव्या लागल्या आणि समोर येणाऱ्या अनुभवावरून नव्याने मांडणी करावी लागली. या सगळ्या प्रयोगामागचं एक महत्वाचं कारण होतं ते पारधी कुटुंबाची आणि विशेषतः महिलांची जीवनशैली, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या महिलांसाठी काय करता येऊ शकतं याबाबत विचार करणं. पारधी कुटुंबं मोठ्या प्रयत्नातून संघटीत झाली होती पण यांच्या मागे भटकण्याचा - गुन्हेगारीचा लावलेला शिक्का मिटवून टाकण्यासाठी त्यांच्यासाठी काही ठोस प्रयत्न करण्याची गरज होती. त्याची हि सुरुवातच होती असं म्हणता येईल. इथे आल्यावर अगदी त्यांच्या पद्धतीने राहणं शक्य नव्हतं हे लगेच लक्षात आलं. पारधी बायका आणि मुलं हे घरोघरी मागून आणल्या नंतर जेवतात. धन्याचा एक कण नाही तिथे चूल पेटणारचं कशी? त्यामुळे मागून आणल्याशिवाय त्यांचं जेवण होत नाही. लहान मुलांना मागायला पाठवलं कि त्यांच्यावर कीव करून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून काही न काही मिळतं हे माहित असल्यामुळे मागून आणायचं काम हे त्या कुटुंबातील लहानमुलांकडे असतं. पुढे यमगरवाडीला पारधी आणि भटके-विमुक्त समाजातील मुलांसाठी निवासी शाळा सुरु झाल्यावर अनेक पालक आपल्या मुलांना पाठवायला तयार नव्हते कारण मुलं निवासी शाळेत गेल्यावर मागून कोण आणणार? बाकीच्यांना जेवायला कसं मिळणार आणि मुलांनाही तीच सवय असल्यामुळे शिजवलेलं चांगलं-चुंगलं त्यांना आवडायचं नाही. त्यांना शीळं अन्न आणि मागून आणलेलं अन्नच आवडायचं. त्यांची हि सवय मोडायची असेल तर पहिल्यांदा त्याच्या जवळ शिजवण्यासाठी धन्य असलं पाहिजे आणि धान्य आणायचं म्हणजे पैसा आणि पैसा हवा असेल असेल तर हाताला काम असलं पाहिजे असं सगळं चक्र डोळ्यासमोर उभं राहिलं आणि हे वाटतं तितकं सोप्पं नव्हतं. अचानकपणे हे सगळे बदल घडवणे सोप्पं काम नाही हे जाणवलं. रोज संध्याकाळी सगळी कामं आवरली कि आम्ही पालांवरच्या सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांच्याशी गप्पा मारायचो. त्यांना काही शिकवायला आलोय असा अविर्भाव त्यात नव्हता खरतरं नकळतपणे त्यांच्याकडून आम्हीच शिकत होतो. लहान वयात होणारे लग्न, नवऱ्या मुलाकडून मुलीच्या आई वडिलांना मिळणारा हुंडा आणि यातून प्रसंगी मुलींना पैशांसाठी विकण्याची वाढलेली प्रवृत्ती, नवऱ्याला चोरी- दरोड्याच्या आरोपाखाली अटक झाल्यावर त्याला सोडवण्यासाठी करावी लागणारी प्रयत्नांची शर्थ, प्रसंगी पोलिसांकडून होणारे शारीरिक आत्याचार आणि हे सगळं सहन करूनही याच महिलांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना उकळत्या तेलात हात घालून द्यावी लागणारी अग्नी परीक्षा या आणि याहून अनेक गोष्टी या महिलांशी बोलताना समजत गेल्या. यातील काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवयला मिळाल्या. यातील कोणत्याही समस्येला सहजपणे हात घालता येईल अशा नव्हत्या. महिलांना मिळणारी जनावरासारखी वागणूक आणि तरीही खचून न जाता मोठ्या कणखरपणे आपल्या विस्कटलेल्या कुटुंबाला उभं करण्यासाठी जीवापाड झटणारी पारधी बाई एखाद्या लढवैय्या सारखी वाटू लागली. आपल्या आजुबाजूला विलक्षण असं काहीतरी घडतंय आणि आपण काहीच करू शकत नाही असे हे दिवस होते. त्या महिलांसोबत राहून, त्यांच्या समस्या बघून अस्वस्थता आणखीनच वाढली. शहरी आणि सुरक्षित वातावरणात राहिल्यामुळे - वाढल्यामुळे त्यांच्यातील अंधश्रद्धा आणि रूढी -परंपरांची चीड येऊ लागली. त्यासगळ्यांचे संदर्भ समजून घेण्याचं ते वयही नव्हतं. कदाचित माझीच आकलन शक्ती कमी पडली असेल. यानिमित्ताने बाबांचं काम किती अवघड आहे हे समजलं. या मुक्कामामुळे बाबांच्या कामातील अडचणी समजून घेता आल्याच पण समाजातील अगदी सर्वात शेवटचा घटक म्हणता येईल अशा पारधी समाजातील महिला आणि त्याचं जीवन, समस्या जवळून अनुभवता आल्यामुळे पुढच्या आयुष्यात अन्य समाजातील महिलांच्या समस्या समजून घेणे, त्याचे अर्थ लावणे थोडे सोप्पे गेले. मला वाढण्यासाठी हा अनुभव खूप वेगळा आणि महत्वाचा होता.

1 comment: