Sunday, June 30, 2013
विवाहविषयक कायदा : बदलांची नांदी
गेल्या आठवड्यात खळबळ उडेल अशीच एक घटना घडली आणि हि गोष्ट प्रसारमाध्यमांनी आपापल्यापरीने रंगवून सांगितली त्याचा परिणाम असा झाला कि त्या निर्णयाचे गांभीर्य बाजूला राहून भलत्याच विषयांची सुरुवात झाली. ' लग्न न करता शरीरसंबंध ठेवणाऱ्या स्त्री -पुरुषांना आता न्यायालयाकडून पती-पत्नीचा दर्जा मिळणार ' अशा शीर्षकाची बातमी कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर वारंवार प्रसारित होत होती. लग्न न करता ' लिव्ह इन रिलेशनशिप ' मध्ये असणाऱ्या मुला -मुलींना वाटून गेलं, आता हा काय नवीन घोळ? ' नवरा -बायकोचं ' नातं नको म्हणून 'लिव्ह इन' चा मार्ग शोधला पण कोर्ट आता यालाच पती -पत्नीचा दर्जा द्यायला निघालाय कि काय? तर महिलांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरु झाली आपल्या नवऱ्याने जर एखाद्या दुसऱ्या महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवले तर तिला देखील पत्नीचा दर्जा मिळणार कि काय?… अशी बऱ्याच प्रकाराने चर्चा ऐकायला मिळत होती. असा कसा निर्णय असू शकतो हे ऐकताच क्षणी वाटून गेलं. बातमी खूप अर्धवट माहिती देणारी वाटत होती. कोणती तरी घटना आहे, याचिका आहे ज्यावर निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या न्याधीशांनी बरच काही सांगितलं असणार पण नेहमीच्या सवयीने, त्यावर फारसा अभ्यास न करता, सर्वांच्या आधी बातमी दाखवण्याच्या स्पर्धेने एक नवीनच बातमी जन्माला घातली. सोशलनेटवर्किंग साईटवर ज्याच्या त्याच्या वॉलवर, 'स्टेटस ' वर मद्रास हायकोर्टाचा निर्णय या बातमीच्या रूपाने झळकत होता.
प्रत्यक्ष मद्रास हायकोर्टाने दिलेला निर्णय :
एका मुस्लिम महिला याचीकाकर्तीच्या याचिकेवर निर्णय देताना मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेला हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. 'धार्मिक विधीपूर्वक विवाह हि केवळ एक रूढी आहे. ती सक्ती नाही. त्यामुळे या प्रकरणातील वादी (याचीकाकर्ती महिला) व प्रतिवादी (तिचा नवरा) यांना हे कोर्ट स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवणारे, सर्वसाधारण आयुष्यातील परस्परांचे जोडीदार समजते. मुलाला जन्म देण्यापूर्वी वादी महिला आणि लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी प्रतिवादी पुरुष असे दोघेही अविवाहित होते याबद्दल वाद नाही. एका छताखाली त्यांनी वैवाहिक जीवन व्यतित केले व त्यांना दोन मुलेही झाली. त्यामुळे वादी महिलेस 'पत्नी'च्या आणि पुरुषास 'पती'चा दर्जा देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच त्यांना झालेली मुले हि औरस आहेत आणि वादी हि प्रतीवादीची औरस पत्नी आहे. हे कोर्ट असा दृष्टीकोन मांडते आहे कि वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या महिलेने जर वयाची २१ वर्ष पूर्ण केलेल्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गरोदर राहिली तर ती महिला त्या पुरुषाची पत्नी व तो पुरुष त्या महिलेचा पती समजला जाईल. अशा संबंधातून ती महिला गरोदर राहिली नाही, परंतु असे संबंध असल्याचा पुरेसा कागदोपत्री पुरावा उपलब्ध असेल तर अशा जोडप्यांना पती - पत्नी समजावे. असे संबंध असलेल्या जोडप्यांमध्ये जर बेबनाव झाला तर 'पत्नी'शी कायदेशीर घटोस्फोट घेतल्याशिवाय 'पती' दुसरा विवाह करू शकत नाही.'
या निर्णयात कोर्टाने फक्त महिलेची बाजू न बघता मुलांच्या भावविश्वाचा विचार केलेला दिसतो. आपली जबाबदारी झटकण्यासाठी मुलांना अनौरस ठरवून समाजाच्या एक प्रकारच्या जाचत ढकलून देण्याचा प्रयत्न इथे कोर्टाने हाणून पडला आहे. आपल्याला सोडून गेलेल्या नवऱ्याकडून पोटगी मिळावी या करता महिलेने न्यायालयात धाव घेतली असता त्यावर तिच्या या नवऱ्याने आपले या महिलेशी लग्न झाले नव्हते आणि हि मुले आपली नाहीत अशी मांडणी न्यायालयात केली. औपचारिक विवाह पद्धतीप्रमाणे विवाह झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे या महिलेला आणि तिच्या दोन मुलांना सोडून गेलेल्या तिच्या नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची नुसतीच जाणीव नव्हे तर त्यातील गांभीर्य लक्षात यावे यादृष्टीने हा निर्णय खूप महत्वाचा वाटतो. लग्न झाल्याचा पुरावा नाही पण मुलांच्या जन्माच्या वेळेस दवाखान्यातील कागदपत्रांवरील मुलांचा पिता म्हणून सही केल्याचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानला आणि आपल्याच मुलांना अनौरसपणाचा शिक्का मारणाऱ्या स्वार्थी पित्याला या निर्णयातून अद्दल घडविली आहे.
भारतात प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे विवाह विधी आहेत. विवाह विषयक वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत आणि या सर्वांचा विचार करून त्याप्रमाणे आपल्याकडील न्यायव्यवस्थेत विवाह विषयक वेगवेगळे कायदेही आहेत. अनेकजण यातून पळवाटा शोधत असतात. शाहबानो केस मधील निर्णयाची कायम चर्चा होत असते त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या एका मुस्लिम महिलेला न्याय मिळवून देताना न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी त्या अर्थाने महत्वाची वाटते. शिवाय प्रेमविवाहास घरातल्यांचा विरोध म्हणून पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या हातात त्या परिस्थितीत लग्न झाल्याचा कोणता पुरावा असणार आणि असं लग्न फसलं गेलं तर त्या मुलीला कोणत्या गोष्टीच्या आधारावर न्याय मिळणार याचा विचार केला असता मद्रास हायकोर्टाचा निर्णय म्हणजे एक महत्वाचं पाऊल मानावे लागेल. अशा प्रकारच्या लग्नात अनेकदा मुलींची फसवणूक होत असते. या निर्णयामुळे या पद्धतीच्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसू शकतो
न्यायालयाने दिलेला निर्णय लग्न करून फसवल्या गेलेल्या महिलांच्या आर्थिक सुरक्षितेच्या दृष्टीने उचलेले योग्य पाऊल आहे असे वाटते. लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना देखील या निर्णयाने चपराक बसली आहे. निव्वळ शारीरिक सुखासाठी एखाद्या महिलेचा वापर करून घेणाऱ्या आणि संबंधातून जन्माला आलेल्या मुलांची आणि तिची जबाबदारी नाकारु शकणाऱ्या पुरुषांवर न्यायालयाची भिस्त आहे. पण या निर्णयातील मूळ भाग समजून न घेता, त्यातील गांभीर्य लक्षात न घेता सनसनाटी निर्माण करण्यात धन्यता बाळगणाऱ्या प्रसारमाध्यमांनी मात्र यानिमित्ताने आपली पोळी छान भाजून घेतली.
Sunday, June 16, 2013
नव्या युगातील नव्या समस्या...
बदल स्वीकारायला थोडा काळ जावा लागतो म्हणतात तेच खरं. मी रहात असलेला पिंपरी चिंचवड भाग गेल्या दहा- पंधरा वर्षात खूप बदललाय. लोकांचं राहणीमान बदललं, गावपणाच्या खूणा पुसल्या जाऊन टोलेजंगी इमारती, मोठ - मोठे हौसिंग प्रोजेक्ट उभे राहिले. पवना नदीचं बाराही महिने खळखळणारे पाणी उपलब्ध असल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. आज जिथे आय. टी पार्कचं जंगल उभं आहे तिथे काही वर्षांपूर्वी संपन्न अशी शेती होती. आता हा सगळा भाग एकदम बदलून गेलाय. पण आजही दर रविवारी या भागात आठवडी बाजार भरतो. त्यातलं चित्र मात्र थोडसं बदललंय. जीन्स -टी शर्ट, शॉर्ट्स, मिनी स्कर्ट घातलेल्या गृहिणी, नोकरीच्या निमित्ताने एकट्या राहणाऱ्या मुली या बाजारात आठवड्याची खरेदी करायला आलेल्या दिसतात.
आय.टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या भला मोठा पगार कमविणाऱ्या या मुली सुरुवातीला सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय होता. हिंजवडी, थेरगाव, वाकड, बालेवाडी हा भाग अगदी ग्रामीण नसला तरी सहजपणे बदल स्वीकारणाराही नव्हता. आपल्या घरातील मुलींना चांगलं उच्च शिक्षण मिळावं म्हणून जवळच १५ कि.मी वर असलेल्या पुणे शहरात पाठवायला तयार नसलेल्या पालकांना आजूबाजूला घडणारे बदल न रुचणारे होते. बेंगलोर, दिल्ली-चंदिगढ, चेन्नई अशा वेगवेगळ्या भागातून मुली नोकरीसाठी एकट्या येतात काय आणि चोघी -पाच जणी एका प्लाट मध्ये एकत्र राहतात काय… हे सगळं त्यांच्यासाठी आश्चर्य वाटणारं होत. त्यामुळे सुरुवातीची काही वर्ष त्या चर्चेचा आणि टीकेचा विषय बनून गेल्या.
मध्यंतरी एका कंपनीसाठी आय. टी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींच्या दैनंदिन सोयी सुविधांबाबत असणाऱ्या गरजा जाणून घेण्यासाठी सर्व्हे करायचं काम आमच्या संस्थेकडे आलं. कंपनीला या मुलींना लागणाऱ्या दैनंदिन सोयी सुविधांमध्येच फक्त रस होता. अर्थातच कंपनीचा पुढचा प्रोजेक्ट या मुलींच्या गरजांवर आधारित असल्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. अशी चर्चा करायची संधी परत मिळेल न मिळेल असा विचार करून मी मात्र तयार केलेल्या प्रश्नावली मध्ये समस्यांबाबत काही प्रश्न वाढवले. मला आय.टी क्षेत्रात आडनीड वेळेत काम करणाऱ्या या मुलींचं विश्व कसं आहे हे जाणून घ्यायचं होतं. बाहेरून चकचकीत दिसणारं जग खरंच तसं आहे का? आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यावर महिलांची निर्णय क्षमता वाढते असं कायम म्हणलं जातं पण प्रत्यक्षात आर्थिक सुबत्ता - आर्थिक स्वातंत्र्य आल्यानंतर या मुलींना निर्णय स्वातंत्र्य मिळालं आहे का? आर्थिक सुबत्तेमुळे यांच्या आयुष्यात कोणते बदल झाले आहेत असे अनेक प्रश्न मनात होते ज्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत होते.
लग्न झालेल्या आणि अविवाहित असणाऱ्या दोन्ही प्रकारच्या मुलींशी संवाद साधला. मुळात त्यांच्याशी अशा विषयावर कोणी चर्चा करायला उत्सुक आहे याचंच त्यांना आश्चर्य वाटलं. आर्थिक सुबत्ता आहे म्हणून सगळ्या समस्या संपल्या असं कसं होईल!! उलट पैसा आहे म्हणून जरा वेगळ्याच समस्या तयार होत आहेत असं जाणवलं. जबाबदारीचे पद, विचित्र अशी कामाची वेळ, घरातील जबाबदाऱ्या यासगळ्याचा ताण निश्चितच मनावर असतो आणि असा ताण अन्य कोणत्याही प्रकारची नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर असू शकतो. आठवड्यातले पाच दिवस मर मर काम आणि 'वीकएन्ड'ला आराम - एन्जॉय करण्याचं 'कल्चर' वाढल्याचं या मुली सांगत होत्या. खूप मोकळेपणाने सुरु झालेली चर्चा वेगवेगळ्या मुद्द्यांकडे वळत होती. लग्न न केलेल्या मुली लग्न झालेल्या मुलींचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होत्या.
'मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही आय.टी फिल्ड मध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरीला आहोत. आम्हाला साडे तीन वर्षाची मुलगी आहे. दोघांचे कुटुंबीय दिल्लीमध्ये असतात. तिथले व्याप सोडून इथे येउन राहणं त्यांना जमत नाही. दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलीला कुठे ठेवायचं हा प्रश्न आमच्या समोर आला म्हणून मग आम्ही दिवसभरासाठी एका बाईला कामाला ठेवलं. मुलीला वेळ देत येत नाही याची मनात बोच असते. आमच्या शिक्षणासाठी आई - वडिलांनी काढलेलं कर्ज, घरासाठी घेतलेलं कर्ज आणि भविष्यातील अन्य काही महत्वाच्या सोयी सुविधा- गरजा यासाठी यापद्धतीची नोकरी खूप गरजेची आहे.' हिंजवडीमधील एका नामांकित कंपनी मध्ये काम करणारी एक जण मोकळेपणाने बोलत होती तिचा मुद्दा पकडून आणखी एक जण बोलू लागली …. ' आम्ही भरपूर कमवतो. नक्कीच आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला आहे. पण यासगळ्याचा मनापासून आनंद काही घेता येत नाही. घरात अत्याधुनिक उपकरणं आहेत. ए. सी आहे. किचनमधील काम लवकरात लवकर उरकावं यासाठी सर्व प्रकारच्या सोयी करून घेतल्या आहेत. पण यासगळ्याचा उपभोग घ्यायला आम्ही घरात हजर नसतो. आमच्या घरातील मोलकरीण या सगळ्याचा उपभोग घेत असते' हसत हसत बोलत एकदम स्वतःच्याच मर्मावर बोट ठेवल्यासारखं झालं. अनेकींनी तिच्या या बोलण्याला दुजोरा दिला.
या क्षेत्रात काम करणाऱ्या मुला-मुलींची आर्थिक परिस्थिती सुधारली त्यामुळे आता लग्न पद्धतीमध्येहि बदल झाले आहेत. मुला - मुलींना कंपनी कडून मिळणारं आर्थिक 'प्याकेज' हेच लग्न जमविण्याचं मध्यम पण आहे आणि अडचणही आहे. मुलाच्या बरोबरीने मुलीलाही प्याकेज असलं पाहिजे असं बघून मुलगी पंसंत करणारे अनेकजण इथे दिसतात. आय. टी मध्ये नोकरी करणारी मुलगी असली पाहिजे हि मुला पेक्षा मुलाच्या आई -वडिलांचीच मागणी असल्याचं अनेकींनी बोलून दाखवलं. त्याच क्षेत्रातली सून हवी हा अट्टहास आणि शिवाय सुनेनं घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात अशी अपेक्षा ही असते यामध्ये आमची तारेवरची कसरत होते असं काहीजणींनी सांगितलं.
'आम्ही भरपूर कमवतो म्हणजे आम्हाला काहीच समस्या नसणार… यांना कसलं आलंय दु:ख!! असंच अनेकांना वाटतं. आर्थिक विवंचना नसल्या तरी त्यातून आलेल्या वेगळ्या समस्या आमच्या समोर आहेत. मुलांना वेळ देऊ शकत नाही यामुळे मनात एकप्रकारची अपराधीपणाची भावना असते आणि या भावनेतून खूपदा मुलांचे नको इतके लाड केले जातात. ते मागतील ती वस्तू त्यांना आणून देतो. शनिवार - रविवार म्हणजे आमच्यातील आपराधीपणाची भावना पुसून टाकण्यासाठीचा दिवस असतो.… ' बेंगलोर मधून नुकतीच पुण्यात स्थायिक झालेली नंदिनी सांगत होती. ' तरी आता बऱ्याच कंपनींनी वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या काहीजणींना घरून काम करण्याची परवानगी दिलीय म्हणून थोडा फार फरक पडू लागलाय. बदलही होतील हळूहळू. खरंतर कामाच्या गरजे प्रमाणेच इथल्या कामाची रचना आहे. पण या रचनेशी मिळतं जुळतं घेण्याची मानसिकता आजू बाजूला दिसत नाही.
पुण्यातील आय.टी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांवर बलात्कार घडण्याच्या अनेक घटना मधल्या काही वर्षांमध्ये घडल्या आणि इथल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणी वर आला आणि तेव्हा पासून इथे काम करणाऱ्या महिलांकडे- त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने बघितले जाऊ लागले. मी आजवर वेगवेगळ्या स्तरातील महिलांना भेटले त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पण आय.टी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींशी संवाद साधण्याचा हा अनुभव बराच वेगळा होता. समस्या नाहीयेत असं नाही. समस्या आहेत हे ही नाकारून चालणार नाही.
मनस्विनी प्रभुणे
manswini-prabhune.blogspot.com
Saturday, June 1, 2013
परिस्थिती आणि व्यवस्थेच्या बळी.
साठच्या दशकात महिला आणि त्यांची सुरक्षितता याबाबत झालेल्या सर्व्हे बद्दल मध्यंतरी वाचनात आलं. यामध्ये देश पातळीवर महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात एक प्रश्न होता - ' तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते?. ' आणि यामध्ये आलेल्या उत्तरांमध्ये सर्वात जास्त प्रमाण होतं ते या उत्तराचं- ' कोणी आपल्याला फसवून पळवून नेईल आणि वेश्या व्यवसायाला लावेल ' अशी भीती महिलांनी व्यक्त केली होती. त्या काळात आलेल्या बहुसंख्य चित्रपटांमध्ये महिलांना पळवून नेवून वेश्या व्यवसायात ढकललं जायचं, असं दृश्य दाखवलं जाई. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून अशी भीती महिलांना वाटत असणार असं मला वाटतं होतं. हे उदाहरण झालं साठच्या दशकातील पण आज ही वेश्या व्यवसायात येणाऱ्या बहुसंख्य महिलांना खरोखरच फसवून या व्यवसायात आणलं जातं आणि त्यासाठी एक मोठा ग्रुप नियोजनबध्द पद्धतीने काम करत असतो. काही महिलांना त्यांच्या नात्यातील जवळच्या व्यक्तीनेच पैशांसाठी दलालाला विकल्याची उदाहरणे पुढे एका प्रकल्पात काम करत असताना बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने या जगाशी ओळख झाली. तिथे होणाऱ्या व्यवहारांची माहिती मिळाली.
गोव्यातील बायणा बीचवरील ' रेड लाईट ' भागातील महिलांच्या (ज्यांना csw म्हणजेच कॅमर्शीअल सेक्स वर्कर म्हटलं जातं) पुनर्वसन प्रकल्पात काम करत असताना हे जग जवळून बघायला मिळाले, यातील महिलांच्या समस्या जाणून घेता आल्या. आम्हाला या पुनर्वसन प्रकल्पासाठी वस्तीतील प्रत्येक महिलेची माहिती घ्यायची होती आणि या सर्व महिलांच्या पुनर्वसनाच्या गरजा काय आहेत हे त्यांच्याशी बोलून जाणून घ्यायचं होतं. या सर्व महिलांशी संवाद साधणं तसं अवघड होतं.
हे जग असं एवढ्या जवळून बघायला मिळेल असं कधी वाटलंही नव्हतं. सर्वसामान्य महिलांच्या मनात एक अनामिक भीती असते, गैरसमज असतात ते माझ्याही मनात होते. यापूर्वी वेश्यावस्ती एवढ्या जवळून कधीच बघितली नव्हती. चित्रपटांमधील या वस्तीचं दाखवलं जाणारं चडक - भडक चित्रण आणि त्याचा प्रभाव थोडाफार मनावर होता. पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील मुली - महिला गिऱ्हाईकाची वाट बघत बसलेल्या त्या रस्त्यावरून जाताना कायम दिसायच्या. त्यांना बघितलं की मनात कायम एक प्रश्न यायचा ' या व्यवसायात कशा आणि का आल्या असतील? '
पहिल्यांदा बायणा रेड लाईट भागात गेले होते तो दिवस आज हि आठवतोय. एका बाजूला बायणातील वेश्यावस्ती आणि दुसऱ्या बाजूला उसळलेला निळाभोर समुद्र, एकीकडे दु:खं - दारिद्याने भरलेली वस्ती तर समोरच निसर्गाने मुक्तपणे सौंदर्य उधळलेला रमणीय असा समुद्र किनारा… केवढा विसंगतपणा !! दूरवर समुद्राचं सौंदर्य न्याहाळत बसलं तर या वस्तीचा विसर पडतो आणि समुद्राकडे पाठ करून वस्तीकडे बघितलं तर तिथल्या समस्यांमुळे समुद्राचं सौंदर्य क्षणात विसरायला होतं. एवढा विरोधाभास असलेलं ठिकाण यापूर्वी कधी बघितलं नव्हतं.
या जगाची रीतभात वेगळी आहे, इथले नियम वेगळे आहेत. त्यांची भाषाही वेगळी आहे. हे सगळं समजून घेणं हा देखील कामचा एक भाग होता. इथे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिला या मालकिणी असतात त्यांना 'घरवाली' म्हणतात. वस्तीतील मुलाला कळायला लागलं कि तो कुणाची न कुणाची तरी दलाली सुरु करतो. अगदी चौदा - पंधरा वर्षांचा मुलगा देखील या दलालीत उतरतो. गिऱ्हाईक शोधून आणायचं, त्याच्याशी सौदा करायचा , त्याच्याकडून कमिशन घ्यायचं आणि ज्या घरावालींच्या मुलींसाठी गिऱ्हाईक आणलं त्या घरवालीकडूनही कमिशन घ्यायचं असा झटपट पैसे कमविण्याचा मार्ग असताना हि मुलं शिकतील कशासाठी ना ?
बायणा वेश्या वस्तीचं एक वेगळेपण होतं. या वस्तीतील देहविक्रय करणाऱ्या महिला कधीच कायमस्वरूपी या वस्तीत राहिल्या नाहीत. दिल्ली - कोलकाता - मुंबई - गोवा - हैद्राबाद - चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये या व्यवसायाची एक आगळी वेगळी पद्धत या व्यवसायातील मोठ्या दलालांनी रुजवली आहे. या शहरामध्ये कायमस्वरूपी तिथेच राहून देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत पण त्या बरोबरीने कायम फिरत्या पद्धतीने काम करणाऱ्या महिलांची यंत्रणा या दलालांनी उभी केली आहे. आंध्र - कर्नाटक मधून फसवून आणल्या जाणाऱ्या महिला काही महिने गोव्यात मग मुंबईला, मग दिल्लीला, त्यानंतर कोलकात्याला, मग परत चेन्नई किंवा हैद्राबाद असा कायम फिरता व्यवसाय या महिला करत असतात. एखादीला या व्यवसायातून बाहेर काढायचंय, तिची सुटका करायची असेल तर तिथे गेल्यावर ती तिथे कधीच सापडू शकत नाही. कारण एका जागेवर ती स्थिर राहावी अशी व्यवस्थाचं नसते. तिचं एका जागी राहणं इतरांना धोकादायक ठरतं. बयाणामध्ये या पद्धतीने काम करणाऱ्या महिलांची संख्या जास्त होती.
इथल्या महिलांची प्रत्येकीची वेगळीच कहाणी आहे. त्यासगळ्याचं मूळ 'दारिद्य - गरिबी - उपासमार- कौटुंबिक समस्या' हेच आहे. आपल्याला याच व्यवसायात जायचंय असं कोणी ठरवून येत नसतं. परिस्थितीने गांजलेल्या महिला इथल्या चक्रव्यूहात अडकतात. बायणातील महिलांशी बोलत असताना त्या इथे कशा आल्या याचा मागोवा घेत होते. ' घरात खाणाऱ्यांची तोंडं जास्त आणि कमवणारे हात कमी अशा परिस्थितीत गावातली कोणी बाई शहरात नोकरी देते म्हणाली म्हणून तिच्या बरोबर आले. तेव्हा माहित नव्हतं ती आपल्याला रेड लाईट भागात घेऊन जाणार आहे. घरकाम करायला घेऊन जाते असं म्हणली होती पण तिने फसवून इकडे आणलं.' असं आंध्र अधून आलेल्या एका महिलेनं सांगितलं. तर दुसरी म्हणली , ' मला मुल होत नाही म्हणून नवऱ्याला दुसरं लग्न करायचं होतं. त्याने देवदर्शनाला जाऊ असं सांगून इथे आणलं आणि मला एका दलाला विकलं. ' या महिलांना नोकरी देते - देतो असं सांगून आणत असताना त्यांच्या घरच्यांना काही रक्कम आधीच दिली जाते आणि रक्कम म्हणजे त्या मुलीच्या - महिलेच्या नावावर एकप्रकारे कर्ज म्हणून लावली जाते. जर ती महिला घरी परत जायचं म्हणून मागे लागली तर तिला आधी रक्कम परत कर आणि मग जा असं सांगितलं जातं. तिला माहितच नसतं कि आपल्या घरच्यांना किती रक्कम दिलीय? आणि खरचं दिली आहे का नाही हे हि कुठे माहित असतं. त्यामुळे हि रक्कम फेडून आपण परत आपल्या घरी जायचं असं स्वप्न इथे नव्याने येणारी प्रत्येक मुलगी बघत असते. पण ते कर्ज काही कधी फिटलं जात नाही आणि मुलगी काही परत घरी जात नाही.
हाताशी लागलेली मुलगी दलालाकडून रेडलाईट भागातील 'घरवालीला' विकली जाते. म्हणजे या मुलीवर दोन प्रकारची कर्ज चढली जातात. एक दलालाने तिच्या घरच्यांना दिलेले पैसे आणि दुसरे घरवालीने दलाला दिलेले पैसे ती या मुलीकडूनच कर्जाच्या रूपाने वसूल करते . कर्जाच्या बोज्याने ती या व्यवसायात अडकून जाते. घरवालीकडे आल्यावर तिला तिथे राहण्याचं - जेवणाचं भाडं द्यावं लागतं जे घरवाली या मुलीला देहविक्रीय व्यवसायाला लावल्या नंतर मिळणाऱ्या पैशांमधून कापून घेते. त्यामुळे मिळणाऱ्या पैशांमधून कापून घेतली जाणारी रक्कम अधिक असते आणि तिच्या हातात पडणारी रक्कम खूपच कमी असते. अशिक्षित महिलांचा गैरफायदा घेतला जातो त्या बिचाऱ्यांना कधी कर्ज फिटून गेलं असेल तरी माहित नसतं.
काही महिलांचा आपल्या घरच्यांशी परत संबंध येतो पण तो फक्त त्यांना पैसे पाठवण्या पुरता. मी या महिलांशी बोलत होते तेव्हा एक महिला सगळ्यात शेवटी बसली होती आणि ती दबक्या आवाजात रडतेय असं मला जाणवत होतं. न राहवून शेवटी मी एकीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. हि रडणारी महिला दर महिन्याला आपल्या घरी पैसे पाठवायची. तिच्या पैश्यांवर तिच्या भावंडांचं शिक्षण झालं. घरातल्यांची उपासमार थांबली. तिच्या भावाचं लग्न ठरलं म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्याकडे जास्त रक्कम मागितली होती. घरवालीकडून कर्ज घेऊन तिने घरी पन्नास हजार पाठवले. हि रक्कम फेडायला पुढची कित्येक वर्ष या महिलेला त्या घरवालीकडे काम करावं लागणार हे या रक्कमेवरून समजतं. रक्कम मिळाल्यावर तिच्या घरच्यांकडून या महिलेला निरोप आला कि तू लग्नाला येऊ नकोस. तुला नंतर लग्नाचे फोटो पाठवून देतो आणि आम्ही ज्या दिवशी चर्चा करायला बसलो होतो त्या दिवशी तिच्या भावाचं लग्न होतं. तिला काय आणि कसं समजवायचं हेच कळत नव्हतं.
भारतीय राज्यघटनेने वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. पण या व्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आहेत - सामाजिक कार्यकर्ते आहेत. जो व्यवसाय शारीरावर अत्याचार करणारा आहे, ज्यामधून शारीरिक शोषण होतं अशा व्यवसायाला कायदेशीर मान्यता का म्हणून द्यावी असं मला वाटतं. या व्यवसायात कोणतीही महिला राजी - खुशीने या व्यवसायात येत नाही. तिला या व्यवसायात यायला भाग पडणाऱ्या व्यवस्थेलाही एकप्रकारे बळकटी मिळू शकते. कोणाचे तरी शोषण होतं आणि त्यावर कोणा दुसऱ्या - तिसऱ्याचं पोट भरतं असा हा या व्यवसायाचा प्रकार आहे.
बलात्काराच्या घटना घडल्यावर खूपदा आजूबाजूला काही महिलांकडून ऐकायला मिळतं.' वेश्या आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे तरी काही पुरुषांशी वासना शमवली जातेय आणि त्यामुळे बलात्कारासारख्या घटना कमी होत आहेत. ' म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी आपणच आपल्या बहिणीचा बळी तर देत नाही ना ? असा विचार आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा व्यवसायाला कायदेशीर मान्यता देऊन त्यांना आपण कायमचं त्याच जगात राहण्याची रीतसर व्यवस्थाच करत आहोत कि काय… असंही वाटतं. प्रीती - प्रवीण पाटकर, ज्योती पठानिया, विलास चाफेकर या सारखे सामाजिक कार्यकर्ते जे या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी गेली कित्येक वर्ष काम करत आहेत. याठिकाणी काम करत असतना लागणारी यासर्वामधील सहनशीलता वखाण्याजोगी आहे. कल्पनेपलीकडच्या जगाचा अनुभव माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारा होता. आपणच काय पण कोणीही या महिलांना यातून बाहेर काढण्यासाठी काही करू शकत नाही हि भावना खूप त्रासदायक ठरली. आज हि त्या महिलांचे चेहरे आठवले कि आपण कोणाला दोष द्यायचा असं वाटून जातं.
Subscribe to:
Comments (Atom)