Monday, April 6, 2015

गोव्याची विविधता


'अरे वा तुम्ही गोव्यात काम करता !!! मज्जा आहे तुमची . यू आर सो लकी ' असं बरंच काही ऐकायची सवय झालीय. 'गोवा म्हणजे मज्जा , फक्त एन्जॉयमेंट' असं समीकरण होऊन गेलंय. त्या पलिकडे बहुदा गोव्याचा वेगळा विचार केला नाही. ' गोव्यात कसलं आलंय काम… गोव्यात फक्त खायचं- प्यायचं आणि आराम करायचा असतो. 'असंही ऐकायला मिळतं. खरं ही आहे एकप्रकारे कारण इथे येणारा प्रत्येकजण फक्त त्याच उद्देशाने येत असतो. आमच्यासारखे खूप कमीजण असतील ज्यांनी गोव्याला आपली कर्मभूमी केलंय. पण कदाचित यामुळेच मी गोव्यात पर्यटक म्हणून फिरले नाही आणि म्हणून एक वेगळा गोवा मला अनुभवायला मिळाला. छोट्याश्या गोव्याची विविधता जवळून बघता आली. गोवा म्हंटले अनेकांच्या डोळ्यासमोर इथले समुद्र किनारे, दारू- फेणी आणि चर्च एवढंच येतं. त्यामुळे गोव्यात आल्यावर समुद्र किनारी राहायचं, भरपूर ढोसायची आणि आराम करायचा एवढंच करणारे मी अनेकजण बघितले आहेत. पण गोव्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे फार कमीजण बघायला मिळाले. अगदी छोटंसं राज्य असलं तरी इथली सत्तर टक्के जमीन वनक्षेत्रात मोडते. इथे चार अभयअरण्य आहेत. सर्व जगाला आणि विशेषतः पोर्तुगीजांना ज्या मसाल्याच्या पदार्थांच्या शोधत गोव्यापर्यंत आणलं त्या मसाल्याच्या बागा हे ही इथले एक मोठं वैशिष्ट्य आहे. तुम्ही खरंच डोळे उघडे ठेवून कसं बघता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. गोव्यातील जंगल आणि इको टुरिझम अगदी पुणे जिल्हा एवढे आकारमान असलेल्या आणि पुणे शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या छोट्याश्या गोव्यात चार अभयअरण्य आहेत. १. म्हदई २. खोतीगाव ३. बोंडला ४. नेत्रावळी या चार वेगवेगळ्या भागात हि अभयअरण्य आहेत. या सर्व ठिकाणी इको टुरिझमची सुरुवात नव्याने झाली आहे. इथल्या जंगलामधील जैव विविधता बघण्यासारखी आहे. एक वेगळा खजिनाच इथे बघायला मिळतो. इथे जंगल आणि माणसाचे नाते इतके दृढ आहे कि त्याचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या लोकजीवनात, सण-समारंभात बघायला मिळते. जंगल वेगळं आणि माणसांची वस्ती वेगळी असं न दिसता दोघेही एकमेकांच्या बरोबरीने वाढताना, समृद्ध होताना दिसतात. नेत्रावळी अभयअरण्य ( पणजीपासून साधारण १०० कि.मि अंतरावर कर्नाटक - गोवा सीमेवर आहे.)नेत्रावळी अभयअरण्य हे नेत्रावळी नावाच्या गावातच वसलेलं आहे. इथल्या अभयअरण्यातच या गावातील काही वाडे आहेत. समुद्र सपाटीपासून दूर असल्यामुळे एरवीही नेत्रावळीमध्ये गारवा असतो. गोव्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून नेत्रावळी प्रसिद्ध आहे. नेत्रावळी ग्रामपंचायती मधील वेर्ले या डोंगरमाथ्यावरील गावात अलीकडेच इथल्या बचत गटातील महिला सामुहिक पद्धतीने स्ट्रोबेरीची लागवड करू लागल्या आहेत. स्ट्रोबेरीसाठी आवश्यक असणारे थंड हवेचे वातावरण इथे असल्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला. गेल्या वर्षी इथे स्ट्रोबेरीची शेती बघण्यासाठी पर्यटकांनी भरपूर गर्दी केली होती. डोंगरमाथ्यावरील वेर्ले आणि साळजीणी या गावात मुक्काम करायचा असेल तर आता इथे राहण्याची सोय देखील आहे. मिनिरल फौंडेशनच्या सहकार्याने इथल्या बचतगटातील महिलांच्या माध्यमातून 'आंगण' नावाने होम स्टे सारखी सोय इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. इको टुरिझमच्या दृष्टीने इथे वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. इथल्या महिलांनी केलेली फूल शेती देखील बघण्यासारखी आहे. एकूणच नेत्रावळी पंचायतीला इथल्या जंगलाचे लाभलेले कोंदण आणि त्यामुळे नेत्रावळीकडे खेचले जाणारे पर्यटक याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 'बुडबुड तळे' नावाचा एक अजब प्रकार नेत्रावळीमध्ये बघायला मिळतो. नेत्रावळी - नूने रस्त्यावर शंकराच्या मंदिरासमोरील या स्वच्छ - पारदर्शक अशा तळ्याकाठी राहून टाळी मारली असता तळ्यामधून बुडबुडे यायला सुरुवात होते. तळ्यामुधून येणाऱ्या बुडबुड्यामुळे याला ' बुडबुड तळे ' असं म्हंणलं जातं. पण फक्त टाळी मारली असताच बुडबुडे येतात एरवी हे तळं एकदम शांत आणि निश्चल असतं. नेत्रावळी गावात राहण्याची सोय आहे. इथे मुक्कामी आले असता सकाळी जाग येते तीच मुळी मोरांच्या आवाजाने. पक्ष्यांच्या किलबिलाटात मोरांचा ठाव घेणारा आवाज तुम्हाला आपोआप जागे करतो. हरणं, गवे, हॉर्न बिल, बिबट्या यांचा इथे भरपूर वावर आहे याशिवाय नामशेष लागलेले 'ब्लाक पान्थर' हि इथे काही प्रमाणत आहेत. नुकताच एक ब्लाक पान्थर नेत्रावळी गावात वावरताना सापडला होता मान्सून टुरिझम गोव्यात मनसोक्त फिरायला मान्सून सीझन सगळ्यात छान. मुलांच्या शाळेला सुट्टी असते म्हणून बहुतांशी पर्यटक मे आणि डिसेंबर महिन्यात गोव्याला जातात. मे महिन्यात खूप कडाक्याचं ऊन असतं. त्या ऊनात फिरणं अवघड होऊन बसतं. पण पावसाळ्याचा सीझन ही मस्त आणि त्यात गोवाही हिरवागार असतो. जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर या काळात गोव्यात मनसोक्त पावसाळी हवा अनभवू शकता. शहरी भाग सोडून गेलात तर हिरवेगार भाताचे शेत तुमचा लक्ष वेधून घेतं. या पावसाळी काळात हिरव्या रंगला किती अनेक प्रकारच्या छटा आहेत हे आपल्याला नकळतपणे जाणून जातं. कसेही फिरा, कुठेही फिरा कोणती न कोणती नदी तुमच्या बरोबरीने प्रवास करत असते. तुम्हाला सोबत करत असते. अलिकडे पावसाळा सुरु झाला कि मुद्दाम फिरायला जाण्याचे, पावसात भिजायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मग त्यासाठी नवनवीन ठिकाणं शोधून काढली जातात. गोव्यात अशी असंख्य ठिकाणं आहेत जिथे तुम्ही पावसाळ्याचा आनंद मनमुरादपणे घेऊ शकता. शाहरुख खानच्या ' चेन्नई एक्स्प्रेस ' या सिनेमामुळे 'दूधसागर ' धबधबा अनेकांना माहीत झाला. पण असे असंख्य धबधबे आहेत जे तिथल्या निसर्ग सौंदर्याने सर्वांवर भूरळ पडतात. काही महत्वाचे धबधबे १. दूधसागर - कर्नाटक - गोवा सीमेवर हा धबधबा आहे. पुण्यावरून रेल्वेने येत असताना, गोव्याच्या हद्दीत प्रवेश करत असताना या धबधब्याचे विलोभनीय दर्शन घडते. हा नुसताच धबधबा पाहणे असं नाही तर त्यासाठी एक छोटासा ट्रेक तुम्हाला करावा लागतो. दूधसागर धबधब्याचे खाली उसळत येणारे पाणी आणि त्यातून वाट काढत धबधब्या पर्यंत पोहोचणे हा अनुभव वेगळा आहे. गोव्यात आल्यावर हा धबधबा बघा. पण जून -जुलै -ऑगस्ट या काळात हा धबधबा बघण्यास पूर्णपणे बंदी आहे. पाणीच इतकं असतं कि तुम्ही तिथ पर्यंत पोहोचू शकत नाही. २. नेत्रावळी मधील धबधबे नेत्रावळी भागात एकूण सहा धबधबे आहेत जे आज हि अनेकांना माहित नाहीत. या धबधब्यांना जाताना नेत्रावळीच्या जंगलामधून छोटासा ट्रेक करून जावं लागतं. पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, याच काळात दिसणारे छोटे छोटे जीव यांची माहीती घेत हा ट्रेकही होतो आणि पावसात भिजण्याची मजा हि येते. मैणापी आणि सावरी हे धबधबे बघायला मुद्दाम पर्यटक नेत्रावळीला जातात. ३. चोर्ला घाट सह्याद्रीच्या रांगांमधील- पश्चिम घाटामधील महत्वाचा घाट. पुण्या - मुंबईचे लोक जसे पावसाळ्यात माळशेज घाटात जातात तसेच गोव्यातील अनेकजण चोर्ला घाटात भिजायला जातात. या घाटात अनेक छोटे मोठे धबधबे आहेत. मुळात हा घाटच खूप वेगळा आहे. बेळगाव आणि गोव्याला जोडणारा हा घाट देखील जैव विविधतेने नटलेला आहे. प्रवास करत असताना अनेक वेळा या घाटात वन्य जीव दिसतात. फारशी वर्दळ नसलेला चोर्ला घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात बघण्यासारखे असते. ४. तांबडी सुर्ला येथील धबधबा १५ व्या शतकात कदंब राजघराण्याच्या काळात बांधलेले महादेवाचे मंदिर हे तांबडी सुर्लाची ओळख करून देते. अखंड पाषाणात कोरलेले हे मंदिर हेमडपंथी शिल्पकलेच एक वेगळं उदाहरण आहे. इथे आपलं लक्ष वेधून घेतलं जातं ते इथे खळखळ वाहणाऱ्या झऱ्याने आणि या झऱ्याचा उगम शोधायला गेलात तर एक सुंदर धबधबा तुम्हाला बघायला मिळेल. एकदा इथे जाऊन आल्यावर धबधबा - झरा आणि त्या काठचे आखीव -रेखीव मंदिर असं सुंदर दृश्य आपल्या मनात कायमचं कोरला जातं ५. हरवळे आणि मान्गेली धबधबा याशिवाय डिचोली वाळपई रस्त्यावर हरवळे गावात असच एक सुंदर धबधबा आहे. दोडामार्ग च्या दिशेने जाताना ' मान्गेली ' धबधबा प्रसिद्ध आहे. खूप उंचावरून खाली कोसळत येणाऱ्या प्रवाहाचा प्रचंड वेग इथे अनुभवायला मिळतो. प्रत्येक धबधब्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. खुपसे दुर्लक्षित असल्यामुळे फारशी गर्दी नसते. त्यामुळे स्वच्छ ही आहेत. उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यातील गोवा एकदातरी अनुभवायला हवा. गोव्याच्या या पावसाळ्यातील प्रवासाची आठवण अविस्मरणीय ठरू शकते आड वाटेवरील मंदिरे गोव्यातील शांतादुर्गा - मंगेशी हि मंदिरं तशी प्रसिद्ध असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी गोव्यात गेल्यावर प्रत्येकजण एकदातरी जाऊन येतो. पण अजूनही असंख्य मंदिरं आहेत जी जी त्याच्या स्थापत्य - शिल्प कलेमुळे तुमचं लक्ष वेधून घेतात. मंगेशी गावाला लागूनच म्हार्दोळ नावाच्या गावात मुख्य रस्त्याच्या जवळ ' म्हाळसा ' देवीचं अतिशय देखणं मंदिर आहे. त्याची भव्यता त्याच्या सभागृहात जाणवते. मंदिराच्या आतमधील खांब लाकडी असून त्यावर केलेलं सुंदर कोरीव काम आहे. कोजागिरी पौर्णिमेला मंदिर बघण्यासारखे असते. असंख्य दिव्यांनी हे मंदिर उजळून निघतं. याशिवाय सावई वेरे येथील ' अनंताचे ' मंदिर, सत्तरी येथील ब्रह्मा करमळी मधील ब्रह्माचे मंदिर, केरी मधील विजयदुर्गा मंदिर, काणकोणच्या पुढे पर्तगाळ आश्रमातील राम मंदिर, केपे रस्त्यावरील डोंगरात वसलेले ' चंद्रेश्वर भूतनाथ' मंदिर हे त्याच्या नावामुळे आकर्षित करते. डोंगरावर जाणारा वळणावळनाचा रस्ता आणि माथ्यावर असलेले चंद्रेश्वर भूतनाथ (महादेवाचा अवतार ) बघण्यासारखे आहे. गोव्यातील लोक खूप अध्यात्मिक आहेत. देवस्थान आणि समाज रचना हा ही एक अभ्यासाचा विषय आहे. स्पाईस फार्मिंग ते इको टुरिझम गोव्यातील आजची युवा पिढी नवनव्या कल्पना लढवून पर्यटकांना एक वेगळा गोवा दाखवण्यात प्रयत्नशील दिसते. त्यातलाच एक भाग म्हणजे स्पाईस फार्मिंग- स्पाईस गार्डन. वास्को - द - गामा मसाल्याच्या पदार्थांच्या शोधात आला आणि त्याने पोर्तुगीजांनाही हा मार्ग दाखवून दिला. इथल्या मिरी - लवंगा - जायफळ - वेलदोडे यांच्या चवीने - वासाने अनेकजणांना भूरळ घातली. इथल्या बागायती शेती मध्ये विशेषतः सुपारीच्या कुळागरांमध्ये केले जाणारे स्पाईस फार्मिंग मधल्या काळात थोडेसे दुर्लक्षित राहिले. पण नारळापेक्षाही जास्त मिळणाऱ्या मिरीमुळे आज अनेक शेतकरी आपल्या कुळागरात ' स्पाईस फार्मिंग ' करू लागले आहेत. नव्या पिढीने पर्यटनात लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी याचा छान उपयोग करून घेतलाय. या ' स्पाईस फार्मिंग 'ची छोटीशी टूर घडवून आणून लोकांना मिरी - लवंगा - जायफळ - वेलदोडे याची शेती कशी केली जाते याची रंजक माहिती देतात. सोबत खास गोमंतकीय पद्धतीचे शाकाहारी - मांसाहारी जेवण देतात. गोमंतकीय संस्कृती कळावी यासाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रमही दाखवतात. 'स्पाईस फार्मिंग- स्पाईस गार्डन' याचे एक वेगळेच आकर्षण नव्याने आहे. फोंडा गावाच्या पुढे धारबांदोडा रस्त्याला ' सहकारी स्पाईस गार्डन ' आहे. इथूनच पुढे तांबडी सुर्लाला जाता येतं. सहकारी यांनी गेली अनेक वर्ष स्पाईस फार्मिंग केले त्यातूनच त्यांना स्पाईस गार्डनची कल्पना सुचली. आज अनेकजण या क्षेत्रात उतरले आहेत. सावई वेरे आणि फोंडा परिसरात असे अनेक स्पाईस गार्डन आपल्याला बघायला मिळतील . पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या ' स्पाईस फार्मिंग 'ला आधुनिकतेची जोड देऊन पर्यटकांना दाखवता येईल असा एक चांगला उपक्रम आहे. शेवटी प्रत्येकाची आवड - निवड वेगळी असते पण गोव्यात येउन फक्त समुद्राकाठी झिंगणे आणि समुद्राकाठची संस्कृती बघून हे म्हणजेच गोवा अशी समजूत करून घेणाऱ्यांची कीव वाटते. कृत्रिम - झगमगीत वातावरणाला गोवा आणि मज्जा असे समजणाऱ्या लोकांपासून खराखुरा गोवा कायमच दूर राहणार. अनेकजण असे हि आहेत जे असंख्य वेळा गोव्यात येउन गेलेत पण कलंगुट, पाळोळे, बागा या बीचच्या पलीकडे त्यांना गोवा कसा आहे हे माहीत देखील नाही. इथले अस्सल ग्रामीण जीवन, लोकसंगीत, नृत्य - नाट्य चळवळ त्यासाठी झटणारी माणसं हे सगळं समजून घेतलं पाहिजे. या लेखातून एक वेगळा खरा - नैसर्गिक जिवंत गोवा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मनस्विनी प्रभुणे manaswini-prabhune.blogspot.com

रोजची अस्वस्थता आणि हतबलता


आपलं बालपण, आपली सर्वार्थाने वाढ व्हावी यासाठी मिळालेलं, जाणीवपूर्वक तयार केलेलं वातावरण यावर आपला भविष्य काळ अवलंबून असतो. सुदैवाने आम्हा भावंडांसाठी घरामधूनच हे वातावरण अगदी जाणीवपूर्वक तयार केलं होतं. बाबा संघाचे पूर्णवेळ काम करायचे. आधीच संघ म्हणून अनेकांचे अनेक गैरसमज. पण बाबांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक. त्यामुळे घरी सर्व विचारांच्या लोकांची उठबैस. त्यात त्यांचे चौफेर वाचन. 'मिळून साऱ्याजणी' , 'बायजा' , 'स्त्री' यासारखी मासिकं ते मुद्दाम आणत. यातूनच कधीतरी ' स्त्री - पुरुष समानता ' हा विषय समजला. सुरुवातीला हा माझ्यासाठी फक्त एक मुद्दा होता तोवर त्यातील तीव्रता जाणवली नव्हती. आजूबाजूला जरा डोळसपणे बघायला लागले तेव्हा यातील बोचरी तीव्रता लक्षात येऊ लागली. प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असताना येणाऱ्या अनुभवांमधून स्वतःची एक भूमिका तयार होत गेली. असमानतेची उदाहरणे समोर आल्यानंतर होणारी अस्वस्थता, एका मर्यादे पलीकडे आपण यात फार काही करू शकत नाही म्हणून अनेकदा येणारी हतबलता ही अधिक वाईट. काही गोष्टी, घटना तुमच्या मनावर दूरगामी परिणाम करून जातात. त्यामुळे तुमचा दृष्टीकोन, तुमची विचार प्रक्रिया आणि कृती यावर ही त्याचा प्रभाव पडतो. अशाच अनुभवांमधून आपण शिकत असतो, घडत असतो. कधी कधी अचानकपणे कोणीतरी आपल्याला शिकवून जातं. विसरता येणार नाही असं. अशी शिकवणारी माणसं आपल्याला कायम भेटली पाहिजेत. यावेळेस मात्र बारा - तेरा वर्षाची चिमुरडी मला शिकवून गेली. एवढ्याश्या वयातली तिची समज बघून आश्चर्य ही वाटलं. विषय देखील तसा होता. गोव्यात लोखंडाच्या खाणी असलेल्या गावांमध्ये 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट प्लानिंग अन्ड रिसर्च' या संस्थेच्या माध्यमातून तिथल्या ग्रामस्थांसाठी, महिलांसाठी आणि शालेय विद्यार्थी- किशोरवयीन मुलींसाठी विविध प्रकल्प राबवले जातात. साधारणपणे दहा -बारा वर्षाच्या मुलींपासून ते पंधरा -सोळा वर्षाच्या मुलींचे गट तिथल्या गावांमध्ये तयार करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोगयाची काळजी असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. या अशाच काही गटातील त्याच वयोगटातील गटप्रमुख मुलींचा हा अभ्यास वर्ग होता. त्यातील एक सत्र या गटप्रमुख मुलींना येणाऱ्या अडचणींवर होतं. सुरुवातीला कोणीच बोलायला तयार नव्हतं. एक एक करून हळूहळू काहीजणी बोलायल्या लागल्या. त्यात एक बारा -तेरा वर्षाची मुलगी होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवत होता. तिने आधी बाकीच्या मुली काय बोलतायत हे ऐकलं आणि मग सर्वात शेवटी आपलं म्हणणं मांडल. बोलायला सुरुवात करताना पहिल्यांदा तिने आम्हालाच प्रश्न विचारला, ' किशोरी विकास प्रकल्प' फक्त मुलींसाठीच का?.... मान्य आहे कि आमचा विकास व्हावा, गावातल्या आम्ही सगळ्याजणींनी या निमित्ताने एकत्र येउन काही चांगले उपक्रम करावेत हा उद्देश आहे आणि आम्हाला याचा खूप उपयोगही होतोय. पण हा फक्त आमच्यासाठी नको. आमच्या पेक्षा याची जास्त गरज मुलांना आहे.' आम्हाला अपेक्षित नव्हतं कि यांच्यातलीच कोणी चिमुरडी असं काही बोलू शकेल. तिचा मुद्दा विचार करायला लावणारा होता. मुलगी वयात आली कि घरी - दारी सगळेजण तिला तिने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तिने स्वतःला कसं जपलं पाहिजे इ . इ सांगत असतात. अनेकांचा तिच्यावर पहारा असतो. ती कुठे जाते- येते, तिचे मित्र-मैत्रीणी कोण आहेत.... याकडे लक्ष दिले जाते. हेच मुलगा वयात आल्यावर होतं का? मुलगी वयात आल्यावर तिच्यामध्ये आणि आई मध्ये नकळतपणे एक मैत्रीचं, एकमेकींची काळजी घेणारं नातं तयार होतं. पण मुलगा वयात आला कि तसं घडत का? किती आया आपल्या वयात आलेल्या मुलांना समजावून सांगतात. किती वडील आपल्या वयात आलेल्या मुलाला त्याने कसे वागले पाहिजे विशेषतः मुलींशी- मैत्रिणींशी..हे सांगतात? मुलींना मात्र मित्रांशी वागताना एक विशिष्ट अंतर ठेवून वागलं पाहिजे अस सांगितलं जातं. भविष्यात येऊ शकणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली जाते. मुलांशी या पद्धतीने संवाद साधणारा कोणताच दुवा कसा नाही. मुलगा आणि मुलगी यांना वाढवताना भेदभावाची सुरुवात घरातूनच होत असते. असमानतेची बीजं इथूनच रोवली जातात. मग ती पुढे हळूहळू वृत्तीमध्ये, स्वभावात डोकावू लागतात. समानतेचे धडे या नकळत्या वयापासून मुला - मुलींना बरोबरीने दिले पाहिजे हे त्या चिमुरडीने न कळतपणे व्यक्त केलं. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत - जिल्हापरिषद महिला सदस्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला होता. सातारा - सांगली - सोलापूर या भागातील पहिल्यांदाच निवडून आलेल्या महिला सदस्या या प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. मोठ्या उत्साहाने महिला सदस्या सहभागी झाल्या. त्यात एका महिलेबरोबर तिचा नवराही आला होता. हे प्रशिक्षण फक्त महिला सदस्यांसाठी आहे हे सांगून देखील तो काही तिथून जायला तयार नव्हता. तिथून निघून जाणं म्हणजे आपला अपमान आहे असंच त्याला वाटू लागलं. शेवटी सर्व महिलांसमोर मोठ्या आवाजात तो बोलू लागला, ' तुम्हाला काय वाटतं…राजकारण हि काय सोप्पी गोष्ट आहे का? या बायकांना याचा काही अनुभव नाही. इथे प्रशिक्षणाला आल्या तरी प्रत्यक्ष सगळे व्यवहार आम्हालाच बघावे लागतात. माझ्या बायकोला तर यातलं काही पण समजत नाही बघा. म्हणून मी पण या प्रशिक्षणाला आलो.' हे सगळं तो बोलत असताना त्याच्या बायकोची अवस्था खूप केविलवाणी झाली होती. एकतर आधी राजकारणातलं बायकांना काय समजतं असं म्हणून बायकांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा यांचा डाव आरक्षणामुळे उधळला गेला. आता अधिकाराने त्यांना राजकारणात उतरण्याची संधी मिळाली तरी त्यांना त्या जागी बघू न शकणारे अनेक झारीतले शुक्राचार्य पदोपदी आढळतात. कायद्याने अधिकार मिळाला पण आज हि निर्णय त्यांचे यजमान घेताना दिसतात. याच प्रशिक्षणात आम्ही या महिला सदस्यांना त्याचे 'अधिकार आणि कर्तव्य' सांगत होतो. त्यात सोलापूर जवळच्या ग्रामीण भागातून आलेली जिल्हापरिषद सदस्या सत्र संपल्यावर आपला अनुभव सांगू लागली. आजवर तिच्या भागातून कोणी महिला जिल्हापरिषदेवर निवडून गेली नव्हती. आरक्षणामुळे या महिलेला हि संधी मिळाली पण त्या भागातील पुरुष मंडळी तिला अजिबात मान देत नव्हते. खुद्द बी. डी. ओ देखील त्या महिलेला वाईट वागणूक देत असे. जिल्हापरिषद सदस्याला मिटिंग जाताना चारचाकी गाडीची व्यवस्था असते हि गाडी तिला महिला आणि ती देखील दलित समाजामधील असल्यामुळे देण्याचे टाळत होते. बाई म्हणून मिळणारी असमानतेची वागणूक या महिलांना बोचत होती. या प्रशिक्षणात महिला फक्त बोलल्याच नाही तर खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी समोर मांडल्या. पुरुष सदस्य आणि महिला सदस्य यांच्यात केला जाणारा भेदभाव, बी. डी. ओ कडून मिळणारे असहकार्य, अनेक महत्वाच्या समस्या वारंवार मांडून देखील त्याची दखल न घेणं. ज्या विकास कामांसाठी निधी मागितला असतो त्यासाठी न देता भलत्याच वेगळ्या कामासाठी निधी मिळणं अशा अनेक समस्या या महिला सांगत होत्या. मला कायम वाटतं की समानता मागून मिळणार नाही आपल्या आचारां -विचारांमध्ये असेल तरच कृतीमाध्येही उतरेल आणि आचारां -विचारांमध्ये रुजण्यासाठी या वयातील मुला- मुलींपासून सुरुवात करायला हवी. आज आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघितल्या कि मुला - मुलीना वाढवताना होणारा भेद प्रकर्षाने जाणवतो आणि कदाचित त्यातूनच आज ज्या समस्यांचा भडका उडलेला दिसतोय. मुलीं इतकीच मुलांचीही जबाबदारीने वागायची गरज आहे. मागे काही वर्षान पूर्वी पुण्यातील बस प्रवासात महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयावर भरपूर महिलांशी - मुलींशी बोलत होते. सवयीप्रमाणे घरात त्यावर आम्हा सर्वांची चर्चा व्हायची. पण त्या वेळेस पहिल्यांदा असं वाटलं कि आपण बायकांशी बोलतोय तर पुरुषांशीही बोललं पाहिजे त्याची सुरुवात घरातूनच केली. माझ्या पाठच्या दोन भावंडांपासून. ते बस प्रवासात कसे वागतात? एखादी महिला शेजारी बसली असेल तर त्यांचा वर्तन कसं असतं अशा अनेक प्रश्नांवर त्यांच्याशी बोलले होते. या पद्धतीचा बोलणं हि आवश्यक असतं हे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं. ज्या पद्धतीने आमची चर्चा झाली त्यानंतर महिलांनाही बस मध्ये आरक्षण दिले पाहिजे याबाबत माझ्या भावंडांचही सकारात्मक मत तयार झालं. बस प्रवासात महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयावर काम असताना विशेषतः पुरुषांशी बोलताना अनेकांनी हा विषय हसण्यावारी नेला. काहींनी चेष्टा केली. मुळात हा प्रश्न मांडत असताना त्याची तीव्रता समजावी आणि त्यावर तोडगा निघावा हा हेतू होता. पण जेव्हा पी.एम.टी प्रशासनाने बस मधील अर्धा भाग महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली त्यावेळेस पुणे शहरातील सुसंस्कृत - सुशिक्षित पुरुषांचे चेहरे पुढे आले. महिलांना आरक्षण दिलय म्हणल्यावर पुरुष प्रवाश्यांनी हुशारीने 'स्त्री-पुरुष समानतेचा' मुद्दा पुढे आणला. जो त्यांनी सोयीने कायम बाजूला ठेवला होता. 'एकीकडे तुम्ही समानता अपेक्षित धरता आणि दुसरीकडे आरक्षणाची शिडी हवी असते. घरातून बाहेर पडण्याची हौस आहे तर बस प्रवासात होणारे धक्केबुक्के सहन करायला शिका.' असे बोलणारे रोज कोणाचे न कोणाचे फोन येऊ लागले. बस उजव्याच्या भागात बसले असता बायका आपल्याला त्या जागेवरून उठवतात हे अनेकांना अपमानकारक वाटायचं. जेव्हा केव्हा अशा पद्धतीच्या भांडणामध्ये पुरुषांकडे बोलायला कोणताच मुद्दा राहत नाही त्या त्या वेळेस ' आरक्षण कि समानता ' हा मुद्दा पुढे केला जातो. समानतेचे सोयीस्कर अर्थ काढले जातात. समानतेच्या मुद्द्याबाबत महिला आणि पुरुष या दोघांचे हि प्रबोधन होण्याची गरज आहे. अनेक महिला संघटना याविषयावर काम करत आहेत आणि त्या चिमुरड्या मुलीने म्हणल्याप्रमाणे हि सुरुवात आपल्याला आपल्या घरातून, आपल्या मुलांपासून करावी लागेल.

Wednesday, March 11, 2015

परिवर्तनाच्या वाटसरू...

स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असते. कुटुंबाला एकत्रित बांधण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. असं म्हणतात की महिलांच्या अर्थिक-सामाजिक परिस्थितीकडे बघितले असता तुम्हाला त्या देशाची संस्कृती समजू शकते. हे झाले अभ्यासकांचे निकष, परंतु महिला आज पुरुषांच्या बरोबरीने अर्धे आकाश पेलताना दिसत आहेत हेही सत्य नाकारता येणार नाही. मन बधीर करणार्‍या घटना आजूबाजूला घडत असताना सकारात्मक विचार जपणार्‍या आणि हेच सकारात्मक विचारांचे बीज सर्वत्र पसरवणार्‍या अनेकजणी आहेत. महिलांचा जीवनस्तर उंचवावा यासाठी अनेक पातळींवर विविध प्रयोग सुरू आहेत, ज्यामध्ये महिलांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा मनाला जातो.महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण असे शब्द अजून जिथे पोहोचले नाहीत त्या गावपातळीवर महिलांचे जीवन अधिक कष्टमय वाटते. पण याही परिस्थितीत त्या आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी धडपड करतात हेही कौतुकास्पद आहे. आपल्या ग्रामीण भागात डोकावले असता ‘महिला मंडळ’ आणि ‘बचत गटांनी’ या महिलांमध्ये एक छान जाळे विणलेले दिसते. अगदी काही वर्षांपूर्वी बचत गटाच्या बैठकांना महिला उघडपणे जात नव्हत्या. घरातले दडपण, कोण काय म्हणेल याची भीती असायची. परिवर्तन हे हळूहळू आणि कृतीमध्ये, विचारांमध्ये सातत्य ठेवल्याने होते हेच खरे. महिलांमधील चिकाटी आणि उमेद या दोन गोष्टींमुळे आज त्या आर्थिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या आहेत.
‘मायक्रो ङ्गायनान्स’ची दोरी महिलांच्या हाती प्रत्येक महिला आपल्यापरीने बचत करत असते. पण या बचतीला एक नियमित स्वरूप मिळावे यासाठी महिला अगदी अनौपचारिक पद्धतीने एकत्र येऊ लागल्या आणि एकत्र येऊन बचत करू लागल्या, ज्याला ‘भिशी’ असेही म्हणले गेले. याच भिशीने पुढे ‘मायक्रो ङ्गायनान्स’ म्हणजेच बचतगटांनी जागा घेतली. यात ङ्गायदा एक झाला की सगळ्या आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवली जाऊ लागली आणि बचतगट बँकेशी लिंक केल्यामुळे बँकेकडून गटातील महिलांना कर्जही मिळू लागले, जे आजवर कधी मिळत नव्हते. पूर्वीही महिला एकत्र येऊन बचत करायच्या. अडीअडचणीच्या प्रसंगी कायम गावातल्या सावकाराकडे जायच्या. सावकार त्यांच्याकडून बेहिशेबी व्याज घ्यायचा. पण बचतगट बँकेशी लिंक झाल्यामुळे सावकारी अगदी मोडून पडली. बँकेच्या व्यवहारात महिलांचा सहभाग वाढला. पोलिस स्टेशन आणि बँक ही दोन अशी ठिकाणे आहेत जिथे ग्रामीण भागातील महिला जायला आजही घाबरतात. परंतु बचतगटांमुळे त्यांची ही भीड चेपली गेली. आजच्या घडीला भारतात ३० लाखांहून अधिक बचतगट अस्तित्वात आहेत. प्रत्येक गटात साधारणपणे २० महिला पकडल्या तरी लक्षात येईल की महिलांचा केवढा मोठा सहभाग या सगळ्या उपक्रमात आहे, आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या प्रत्येक महिलेची साधारणपणे १०० रुपये याप्रमाणे बचत पकडली तर ३० लाख बचतगट किती मोठ्या रक्कमेची उलाढाल करत आहेत आणि देशातील एका मोठ्या आर्थिक घडामोडीमध्ये महिलांचा केवढा मोठा हातभार आहे हेही लक्षात येते. महिलांची हीच क्षमता बघून आज अनेक बँका स्वतःहून ग्रामीण भागातील महिलांकडे जात आहेत. या ग्रामीण भागातील महिलांची ताकद बँकांना समजली आहे. महिला आर्थिक उलाढालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात हे त्यांनी ओळखल्यामुळे आज बँका ग्रामीण भागातील महिलांच्या दरी जाऊ लागल्या आहेत. त्यांच्यासाठी विविध योजना तयार करू लागल्या आहेत. महिलांच्या हाती रोजगारनिर्मिती देशभरात महिलांचे बचतगटाच्या माध्यमातून जे जाळे निर्माण झाले आहे त्यातून काही चांगले प्रकल्प उभे राहिले. स्वतः रोजंदारीवर कुठेतरी मजुरी करायला जाणार्‍या महिला आज अनेक महिलांसाठी रोजगार निर्माण करणार्‍या बनल्या आहेत. आंध्र, कर्नाटकमधील बचतगट आणि त्यातून उभे राहिलेले प्रकल्प बघायला गेलो असता अशी अनेक उदाहरणे बघायली मिळाली जिथे महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि अन्य महिलांनादेखील आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी साहाय्य करत आहेत. एका बचतगटाने ‘सॅनेटरी नापकिन’ बनवण्याचा उद्योग सुरू केला. थोड्याच दिवसांत त्याची मागणी वाढली. गावातील अन्य बचतगटांतील महिलांना या कामात सामावून घ्यावं लागलं. या सर्व महिला शेतात नाही तर जिथे काम मिळेल तिथे रोजंदारीवर काम करायला जायच्या. पण आज त्यांचा स्वतःचा उद्योग उभा राहिला आहे. सगळ्याजणी एकत्र येऊन काम करू लागलो म्हणून झालं, नाहीतर हे होऊ शकलं नसतं, अशी प्रांजळ कबुलीदेखील त्या देतात. बचतगटाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास बचतगटांमुळे महिला एकत्र आल्या, बचत करू लागल्या, आर्थिक विकास होऊ लागला, पण याबरोबरीने त्यांना सर्वांगीण विकासाची संधी मिळाली. लहानपणी आपण कायम ‘एकीचे बळ मिळते ङ्गळ’ अशी म्हण ऐकत आलोय, पण बचतगटांच्या माध्यमातून एकत्र येऊन मिळालेले आर्थिक विकासाचे ङ्गळ आणि त्याची गोडी महिलांना आवडली आहे. एकत्र येऊन बचत करणे हाच ङ्गक्त उद्देश आता उरला नाही. आपल्या कुटुंबाच्या चौकटीबाहेर पडून महिला आता आपल्या गावाच्या विकासाचा विचार करताना दिसतात. विकासकामांमध्ये आपला सहभाग दाखवतात. ग्रामसभांना जाऊन एखादा निर्णय पटला नाही तर त्या विरोध दर्शवतात. आरोग्य शिबीर, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, आपल्या गटासाठी व्यवसाय मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करतात, ज्यांमधून आपला स्वतःचा आणि आपल्या गटातील महिलांचा विकास होईल, अशा उपक्रमांमध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. त्यांचा उत्साह अनेक वेळा थक्क करणारा असतो. बचतगट आणि महिला यांचे सामर्थ्य ओळखून या उपक्रमाला एक नित शिस्त आणि एक चांगले वळण लावून देण्याचे काम आंध्र, गुजरात, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांनी केले. बचतगटांना शासनाकडून मिळणारे प्रशिक्षण, प्रशिक्षणानंतर या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे, त्यांना प्रसिद्धी मिळवून देणे यासारखे उपक्रम त्या त्या राज्यांतील शासनयंत्रणेमधून झाले. पुणे जिल्ह्यातील बचतगटातील महिलांनी बनवलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळून देण्यासाठी ‘सावित्री’ नावाने पुण्यात एक शॉपिंग सेंटर काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. तेव्हा पुण्यात ‘मॉल्स’ हा प्रकारदेखील नव्हता. नंतर हा उपक्रम ङ्गक्त पुण्यापुरता न उरता अख्ख्या महाराष्ट्रातील बचतगत आणि त्यांची उत्पादने याला जोडण्यात आली. आज बचतगटांनी बनवलेल्या वस्तूंना ‘सावित्री’सारखे ब्रँडनेम मिळालेय. त्यांना बाजारपेठ मिळालीय. असे काम गोवा शासनाने गोव्यातील बचतगटांतील महिलांसाठी केले पाहिजे. गोव्यातील बचतगटांना त्यांची स्वतःची ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळाली पाहिजे. ज्या पद्धतीने बँका या महिलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्याप्रमाणे शासनाने गुजरात आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून या महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून द्यायला हवी. असाही एक अभिनव प्रयोग नेत्रावळी हे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर असलेल्या या गावात गेली अनेक वर्षे महिला बचतगट तसे अस्तित्वात होते, परंतु ते चर्चेत तेव्हा आले जेव्हा शासनाने हे गाव ‘आदर्श ग्राम’ म्हणून दत्तक घेतले. या निमित्ताने नेत्रावळीतील बचतगटातील महिला एकत्र आल्या. मुळात गावच इतक्या दुर्गम भागात दूरवर असल्यामुळे बारीकसारीक गोष्टींसाठी सांगे- केपे या गावांवर अवलंबून राहावे लागते. इथे शेती आणि कुळागरात मजुरीचे काम एवढेच महिलांसाठी उत्पन्नाचे साधन आणि यामध्ये मिळून मिळून किती रोजगार मिळणार. महिलांमध्ये काहीतरी करण्याची उमेद होती, पण त्यांना प्रोत्साहन देणारे आतापर्यंत कोणी नव्हते. ‘सेंटर ङ्गॉर डेव्हलपमेंट प्लानिंग अंड रिसर्च’ (सी.डी.पी.आर.) या संस्थेच्या माध्यमातून या गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली. इथल्या महिला खूप कष्टाळू. पडेल ते काम करणार्‍या आणि प्रयोगशील. त्यांच्यातील हाच उत्साह हेरून सी.डी.पी.आर. संस्थेने या महिलांमध्ये कामास सुरुवात केली. मायनिंग सुरू असताना सेसा स्टरलाईट (त्यावेळची सेसा गोवा) या कंपनीच्या आर्थिक साहाय्याने या भागातील महिलांसाठी केटरिंग आणि शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा पद्धतीचे प्रशिक्षण पहिल्यांदाच या गावात झाले. या पद्धतीची संधी त्यांच्यापर्यंत कधीच चालून आली नव्हती. नेत्रावळी खूप लांब आहे अशी सबब सांगून अनेकजण इथे यायचे टाळतात असा इथल्या महिलांचा अनुभव. पण प्रत्यक्ष आपल्या गावातच आपल्याला प्रशिक्षणाची संधी मिळतेय म्हटल्यावर महिलांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रशिक्षण कार्यक्रमांना दिला. चतुर्थीच्या काळात भरणार्‍या माटोळीच्या बाजाराने नेत्रावळीतील महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्याची संधी तर मिळालीच, पण त्यांच्या या उपक्रमाला भरपूर प्रसिद्धीही मिळाली. सी.डी.पी.आर. संस्था आणि शासनाच्या ‘प्लानिंग आणि स्टेटस्टीक’ विभागाच्या सहकार्याने या गावातील बचतगटातील सर्व महिलांची ‘नेत्रावळी महिला उद्योग समूह’ या नावाने संस्था स्थापन करून देण्यात आली. नेत्रावळीतील महिलांनी जंगलातून गोळा करून आणलेल्या, माटोळीसाठी लागणार्‍या दुर्मीळ अशा वनस्पती, ङ्गळं, फुलं यांची विक्री करणारा बाजार मडगावमध्ये भरवण्यास सुरुवात केली. नेत्रावळीमधील महिलांना यामुळे गावातून बाहेर पडून एक वेगळं जग बघायची संधी मिळाली. यातील काही महिलांना मडगावदेखील माहीत नव्हतं. यातील काही महिला या घरांमधून रोजगारासाठी अशा कधी बाहेर गेल्या नव्हत्या. त्यांच्यासाठी हा वेगळाच अनुभव होता. गेली दोन वर्ष हा बाजार भरवला जातो. महिलांनी अपेक्षा केली नव्हती इतका हा बाजार यशस्वी झाला. दुसर्‍या वर्षी या माटोळी बाजाराच्या नियोजनाच्या टप्प्यावरच महिलांमध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसून येत होता. नेत्रावळीमधील महिलांना माटोळी बाजाराच्या निमित्ताने एक वेगळं व्यासपीठ मिळालं होतं. ज्यांच्या हातात स्वतः कमावलेले पैसे कधी पडले नव्हते, त्यांच्या हातात या बाजारामुळे बर्‍यापैकी चांगली रक्कम आणि तीदेखील चतुर्थीच्या आधी मिळाल्यामुळे महिला खूश झाल्या. आता मात्र महिलांमध्ये काहीतरी करण्याची उमेद निर्माण झाली. यांतील काही महिलांनी गावात ज्या वस्तू मिळत नाहीत आणि त्यासाठी सांगे- केपेला जावे लागते अशा वस्तूंचे एक दुकान सुरू केले. वेगवेगळ्या बचतगटांतील महिलांनी एकत्र येऊन या दुकानाची सुरुवात केली. या मल्टीपर्पज दुकानाचे उद्घाटन गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. नेत्रावळीतील महिलांच्या उपक्रमांना मनोहर पर्रीकर यांचे कायम मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे. नेत्रावळीत स्ट्रोबेरी शेती नेत्रावळी पंचायतीमधील अतिशय दुर्गम अशा भागात वेर्ले नावाचे गाव आहे. या गावातील बचतगटातील महिला आणि हे वेर्ले गाव मध्यंतरी चर्चेचा विषय बनले ते इथे महिलांनी केलेल्या स्ट्रोबेरीच्या शेतीमुळे. गोव्यात पण स्ट्रोबेरीची शेती होऊ शकते हे या महिलांच्या प्रयत्नांनी सिद्ध झाले. यासाठी या गावातील काही महिला महाबळेश्‍वरला जाऊन रीतसर प्रशिक्षण घेऊन आल्या. स्ट्रोबेरीच्या शेतीसाठी लागणारी थंड हवा, तसं वातावरण वेर्ले गावात असल्यामुळे हा अभिनव असा स्ट्रोबेरी शेतीचा प्रयोग एकदम यशस्वी झाला. ‘मिनिरल ङ्गौंडेशन’च्या सहकार्याने हा सगळा उपक्रम राबविण्यात आला. आता दरवर्षी इथल्या महिला स्ट्रोबेरीची शेती करू लागल्या आहेत. उत्पन्नाच्या साधनात नवी भर पडली आहे. याबरोबर वेर्ले येथील निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना इथे मुक्काम करता यावा या उद्देशाने ‘आंगण’ नावाने इथल्याच कुटुंबांमध्ये मुक्कामाची, जेवणाची सोय करून देऊन महिलांना आणखी एक उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले आहे. सेंद्रीय भाजीपाला लागवड नेत्रावळी पंचायतीमधील नुने आणि सावरी भागातील महिलांचा समूह वर्षानुवर्षे सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला करतो. सावरी भागातील महिलांनी गेल्या वर्षी काही टन मिरचीचे उत्पादन घेतले, तर नुनेमधील महिलांनी चिटकी-मिटकी, तांबडी भाजी पिकवली. हे प्रयत्न बघून अग्रीकल्चर डिपार्टमेंटने या महिलांना प्रशिक्षण, भाजीपाल्याची बी-बियाणी, खतं देण्यास सुरुवात केली आहे. इथल्या महिला कष्टाळू तर आहेतच पण प्रयोगशीलदेखील आहेत. त्यांना ङ्गक्त प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाची गरज आहे.