Sunday, December 1, 2013
फेस्टिव्हलवर प्रभाव दिग्दर्शिकांचा!
अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आणि तरुण तेजपालची बातमी आगीसारखी सगळीकडे पसरली. इफ्फीच्या मिडिया सेंटरमध्ये महोत्सवासाठी देशभरातून आलेल्या पत्रकारांना आयती बातमी मिळाली. एकीकडे तरुण तेजपाल प्रकरणातील ताज्या घडामोडी कानावर पडत होत्या तर दुसरीकडे इफ्फीविविध सिनेमांमधून अत्याचार- बलात्कार सारख्या घटनांवर आवाज उठवणाऱ्या नायिका दिसत होत्या. एकीकडे भासमान जगातील चित्र तर दुसरीकडे जळजळीत वास्तव विचार करायला भाग पडत होतं. जणूकाही आजूबाजूला घटणाऱ्या घटनांचेच पडसाद पडद्यावर बघायला मिळत होते. जे फक्त सिनेमा बघायला आणि त्याचा आस्वाद घ्यायला आले होते ते आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करू शकत होते. एकूण काय तर इफ्फीचे सुरुवातीचे दिवस तरुण तेजपालने गाजवले.
दर वर्षी महोत्सवाचा एक वेगळा चेहरा त्यात दाखवल्या जाणारया चित्रपटांमधून दिसून येत असतो. यावर्षी महोत्सवाचा कॅटलॉग हातात पडताच हा चेहरा स्पष्टपणे स्पष्टपणे दिसून आला. महायुद्धाची पार्श्वभूमी, महिला केंद्रित चित्रपट यावर आधारित चित्रपट यावर्षीच्या महोत्सवाचा चेहरा होते. ७४ देशांमधले दाखवण्यात आलेल्या ३७४ चित्रपटांमध्ये बहुसंख्य चित्रपट महायुद्धाची पार्श्वभूमी आणि महिला केंद्रित विषय हाताळल्याचे ठळकपणे दिसत होते. 'जागतिक सत्य' म्हणावे असे हे सूत्र वेगवेगळ्या देशांमधील, भाषांमधील चित्रपटांमधून बघायला मिळाले.
युद्ध -महायुद्धाची पार्श्वभूमी आणि नाते संबंध
जर्मनी - ज्यू संबंध, छोट्या छोट्या देशांना पोहोचलेली झळ, इराक - इराण-अमेरिका संबंधाची पार्श्वभूमी, युद्धजन्य परिस्थिती आणि अशा परिस्थितीत जगणारी माणसं, लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार यांना सामोरं जाताना जगण्याची धडपड करणाऱ्या महिला आणि मुलं या साऱ्यांचे चित्रण 'इन हायडिंग', 'युरोपा युरोपा', 'लास्ट ऑफ अनजस्ट', 'द जर्मन डॉक्टर', 'अ पीस इन हेवन', 'विव्हा बेलारूस' या चित्रपटांमधून बघायला मिळाले. जर्मनीच्या अत्याचारापासून स्वतःला बचावू न शकलेला पोलंड सारखा छोटासा देश. या देशातून दोन चित्रपटांना प्रवेश मिळाला आणि दोन्ही चित्रपट महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित होते. दिग्दर्शक यान किडावा ब्लोन्स्की यांनी ' इन हायडिंग' या सिनेमात नझी अत्याचार, ज्यू नां करावे लागलेले पलायन त्यातून भेटलेली नव नवीन माणसं, तयार झालेली नवीन नाती याचं अप्रतिम चित्रण या सिनेमा मध्ये केले आहे. युद्धाची पार्श्वभूमी असताना मानवी नाते संबंध रंगवण्याची कसब या दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने सांभाळली आहे. 'विव्हा बेलारूस' हा ही पोलंडचा युद्धाचीच पार्श्वभूमी असलेला सिनेमा. रशियन सैनिकांनी सोव्हिएत मधील छोट्या छोट्या देशांवर केले हुकुमशाही पद्धतीचे अत्याचार, त्याचा प्रतिकार करणारे कलाकार - लेखक - पत्रकार मंडळी आणि त्यांना अज्ञातवासाची भोगावी लागलेली शिक्षा, त्यांच्या अभिव्यक्तीवर आलेली गदा, सक्तीने लष्करात भरती व्हावे लागणे या सगळ्या गोष्टी भारतातील आणीबाणीच्या काळाची आठवण करून देतात.
मार्गरेटा व्हान ट्रोटा या दिग्दर्शिकेने '' हानाह अरेंट' या तिच्या चित्रपटामधून दुसरे महायुद्ध, नाझींच्या कारवाया याचे वेगळेपाने चित्रण केले आहे. एक शिक्षिका जी पुढे पत्रकाराचा पेशा स्वीकारून नाझींच्या कारवायांवर नजर ठेवत असते. त्यांच्या छावण्यामध्ये जाऊन त्यांची सगळी रहस्य जगासमोर आणते. खूप नाट्यमयरित्या चित्रपटाची कथा पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शिका यशस्वी झाली आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका मार्गरेटा व्हान ट्रोटा हि 'फेमिनीस्ट फ़्लिममेकर' म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रपटातील नायिका हि सामन्यातून असामन्य ठरून जाते. ते या चित्रपटातही जाणवते. हानाह सारखी सशक्त नायिका या चित्रपटात उभी करून युद्धात महिलांचा सहभाग वेगवेगळ्या पातळीवर कसा होता हे देखील दाखवून दिले आहे.
महिला प्रश्नांची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न
इफ्फीमध्ये खूप सारे चित्रपट महिला प्रश्नांवर आधारित होते. विशेषतः इराण आणि अफगणीस्तान मधील चित्रपट हे तिथल्या महिलांची स्थिती मांडणारे होते. अफगणीस्तानचे दिग्दर्शक अतिक रहिमी यांच्या 'द पेशन्स स्टोन', इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह चा ' हुश्श… गर्ल्स डोंट स्र्किम ' आणि मोरोक्को -फ्रांस मधील दिग्दर्शक मोहमद अहेद बेन्सुदा यांचा 'बिहाइंड क्लोज डोअर', अफगणीस्तानमधील सेदिक अबेदी यांचा ' अ मन डिझायर फॉर अ फिफ्थ वाईफ' या सिनेमांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अफगणीस्तानचे दिग्दर्शक अतिक रहिमी यांच्या 'द पेशन्स स्टोन' या चित्रपटातील नायिका तालिबानी सैनिकांच्या कारवायांमध्ये कोमात गेलेला तिचा नवरा, घरातच त्याच्यावर करावे लागणारे उपचार यासारया परिस्थितीत त्याच्या जवळ व्यक्त होण्याची तिला मिळालेली संधी याचे अतिशय सुंदर चित्रण दिग्दर्शक रहिमी यांनी केले आहे. नवरयाशी कधीच मोकळेपणे वागायला मिळालेलं नसतं. नवऱ्याचा हवा तसा सहवास मिळालेला नसतो. त्याला कायम घाबरून राहण्यातच आयुष्य जात असतं अशा वेळेस तिचा होणारा कोंडमारा, मन मोकळं करण्याची तळमळ. याचे दर्शन या चित्रपटात बघायला मिळते. चित्रपटाची कथा खूप वेगळी ठरते. या कथेत दगडाला महत्व दिले आहे. आपल्याला आवडलेल्या एखाद्या मौल्यवान दगडाकडे तू आपलं मन मोकळं कर असा सल्ला देणारी नायिकेची आत्या आणि आत्याच्या सांगण्यावरून कोमात असलेल्या नवरारुपी ' दगडा' ला आयुष्यातील सर्व गुपितं सांगणारी नायिका या साऱ्याची सुरेख मांडणी दिग्दर्शकाने या चित्रपटात केली आहे आणि याला गोल्डशिफ्ट फरहानी या अभिनेत्रीच्या उत्तम अभिनयाची जोड मिळाल्यामुळे चित्रपत एकदम जमून गेलाय. इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह चा ' हुश्श… गर्ल्स डोंट स्र्किम ' आणि मोरोक्को -फ्रांस मधील दिग्दर्शक मोहमद अहेद बेन्सुदा यांचा 'बिहाइंड क्लोज डोअर' या दोन्ही चित्रपटांमधून महिलांचे होणारे लैंगिक शोषण, अत्याचार दाखवण्यात आले आहे. महिलांच्या समस्यांमध्ये सर्वत्र समानता आहे जे चित्रण भारतातील सिनेमांमध्ये बघयला मिळते तेच इराण, अफगणीस्तान, फ्रांस, जपान अशा जगातील नकाशावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या देशांमध्ये बघायला मिळते
इफ्फीवर दिग्दर्शिकांचा प्रभाव
उक्रेनच्या व्हिक्टोरिया ट्रोफिमेंको, इराणमधील दिग्दर्शिका पौरन देराखशान्देह, भारतातील वीणा बक्षी, इटलीमधील इमा दांते, कानडाच्या लुईस अर्चमबोउल्त, फ्रांसच्या निकोल ग्रासिया, नेदरलंडच्या नानुक लिओपोल्ड, सर्बियाच्या जेलेना बाजिक जोसीस, फ्रांसच्या इव्हा पेर्वोलोविक, बेल्जियमच्या डेल्पीन लेहेरीसी, कानाडाच्या चोल रोबिचाउद, इनग्रिड विनेगर, फ्रांसच्या काटेल क़ुइलिवेर, अर्जेन्टिनाच्या लूइसा प्यूएझो, रशियाच्या अलेक्सझाड्रा स्ट्रेलयाना, चिलीच्या मार्सेला सैद, फिलिपिन्सच्या हानाह अस्पिया, जर्मनीच्या अना झोहरा बेर्राचेद, इंडोनेशियाच्या मौली सूर्या, जर्मनीच्या मार्गरेटा व्हान ट्रोटा, डेन्मार्कच्या सुसान बीर, फ्रांसच्या क्लाअर डेनिस, पोलंडच्या मल्गोर्झाता स्झूमोवस्का, फ्रान्सच्या अक्षेल रोपेर्त, मेक्सिकोच्या क्लौडिया सांते लूस, ग्रीसच्या ओल्गा मलेआ, पेंनी पनियाटोपौलू,एलिना पसकौ, मारिया डोउझा, भारतातील रुथ झाबवाला, सुमित्रा भावे या बत्तीस दिग्दर्शिकांच्या चित्रपटांचा समावेश या महोत्सवात होता. फक्त महिलांचेच विषय न हाताळता सामाजिक, राजकीय विषयांवर आधारित चित्रपट या दिग्दर्शिकांनी हाताळलेले आहेत. निर्मात्या म्हणूनही असंख्य महिलांची नावे या महोत्सवाच्या निमित्ताने पुढे आली.
काही चित्रपटांनी निराशा केली
इफ्फीमध्ये असेही काही चित्रपट होते कि त्यांची निवड कोणत्या आधारावर केली गेली अशी शंका अनेकांच्या मनात येउन गेली . ना चांगल्या कथेचा बेस,सुमार दिग्दर्शन आणिक गोष्टींच्या उणीवा यामुळे चित्रपट रसिकांना आवडला नाही. चित्रपट सुरु असतानाच अनेकजण उठून जायचे. निवड समितीवर तोंडसुख घेणारेही अनेकजण इथे भेटले. भरगच्च कार्यक्रम, चांगले चित्रपटांचे पुन्हा प्रक्षेपण न होणे, तिकीट पद्धत, हॉल भरला म्हणून आत न सोडणे, व्यवस्थापनात ढिसाळ पणा या साऱ्यामुळेहि अनेकजण त्रस्त झाले. सर्वात जास्त त्रास झाला तो तिकीट काढण्याच्या व्यवस्थेचा आणि तिकीट नाही म्हणून लावाव्या लागलेल्या भल्या मोठ्या रांगेचा. तिकीट पद्धत कशासाठी? हा प्रश दर वर्षी उभा राहतो पण त्यावर उपाय काही निघत नाही.
गर्दी खूप पण दर्दी कमी
जगभरातून- देशभरातून वेगवेगळ्या राज्यांतून आलेले चित्रपट समीक्षक, आस्वादक यांच्याबरोबरीने सिनेमा स्कूलमधील असंख्य विद्यार्थी इफ्फीसाठी आले होते. जवळजवळ सर्व चित्रपट ‘हाउसफूल’ व्हायचे इतकी गर्दी व्हायची. पण सिनेमा सुरू झाल्यानंतर केवळ १० ते १५ मिनिटे बसून लगेच उठून जाणारे अनेकजण बघायला मिळाले. ज्या सिनेमामध्ये सेक्सने भरलेली भरपूर दृश्य आहेत अशा सिनेमांना जास्त गर्दी हे समीकरणच बनून गेले होते. सिनेमा स्कूलचे विद्यार्थी नेमकं सिनेमातील काय बघायला आले होते असा प्रश्न पडत होता. चांगल्या सिनेमांकडे पाठ आणि भरपूर ‘हॉट सीन’ असलेल्या सिनेमांना गर्दी अशी जाणवणारी परिस्थिती यावर्षीच्या महोत्सवात होती.
Subscribe to:
Comments (Atom)
